ICC Cricket World Cup 2023 venues: मंगळवारी भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहे. हे सामने एकूण 10 शहरात होणार आहेत. पण यावरून सध्या बराच वाद उफाळून येताना दिसत आहे.
वर्ल्डकप 2023 मधील सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरांमध्ये होणार आहेत. तसेच गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि हैदराबाद येथे 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होणार आहेत.
पण मोहाली, इंदोर, राजकोट, रांची आणि नागपूर या शहरांमध्ये वर्ल्डकप सामन्यांचे आयोजन करण्यात न आल्याने नाराजीचे सुर उमटत आहेत. यातील मोहाली हे नेहमीच भारतातील महत्त्वाच्या क्रिकेट ठिकाणांपैकी एक राहिले आहे. असे असताना या मैदानावर एकही सामना न ठेवण्यामागे राजकिय कारण असल्याचीही चर्चा होत होती.
पंजाबचे क्रीडा मंत्री गुरमीत सिंग मीत हायर यांनीही बीसीसीआयवर याबद्दल टीकाही केली. पण आता यावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्टीकरण दिले असून यामध्ये कोणतेही राजकारण करण्यात आलं नसल्याचं त्यांनी म्हटले आहे.
राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे की 'मोहालीमधील सध्याचे स्टेडियमवर आयसीसीच्या दर्जाचे नाही, त्यामुळे तिथे सामने खेळवण्यास नकार देण्यात आला.'
ते म्हणाले, 'गेल्यावर्षी विराट कोहलीचा १०० वा कसोटी सामना मोहालीच आयोजित करण्यात आला होता. मोहालीमध्ये मुल्लंपूर स्टेडियम तयार होत आहे. जर ते तयार झाले असते, तर तिथे वर्ल्डकपचा सामना झाला असता.'
'सध्याचे मोहालीमधील स्टेडियम आयसीसीच्या मानकांची पूर्तता करत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तिथे सामने होणार नाहीत, तिथे द्विपक्षीय मालिकांमधील सामने आयोजित केले जातील. हे रोटेशन पद्धतीवर अवलंबून आहे. इथे कोणत्याप्रकारे मुद्दाम गोष्टी करण्यात आलेल्या नाहीत.
'ठिकाणे ठरवण्यासाठी आयसीसीची मान्यताही गरजेची असते. तिरुअनंतपुरमला पहिल्यांदाच सराव सामने ठेवण्यात आले आहेत. यामध्ये कोणत्याही विभागाला किंवा केंद्राला दुर्लक्षित करण्याचा हेतू नव्हता. अनेक गोष्टी लक्षात घेतल्यानंतर स्टेडियम निश्चित करण्यात आले आहेत. अगदी ईशान्य विभागातील गुवाहाटीतही सामने आयोजित करण्यात आले आहेत.'
तसेच शुक्ला यांनी सांगितले की 12 ठिकाणे या वर्ल्डकपसाठी पहिल्यांदाच निश्चित करण्यात आली आहेत. ते म्हणाले, 'वर्ल्डकपसाठी 12 ठिकाणे पहिल्यांदाच निवडण्यात आली आहेत. या 12 ठिकाणांपैकी तिरुअनंतपूरम आणि गुवाहाटीला सराव सामने होणार आहे, बाकी 10 ठिकाणांवर साखळी सामनेही होणार आहेत.'
'अनेक सुविधा करण्यात आल्या आहेत. दक्षिण विभागातून चार ठिकाणे, मध्य विभागातून एक, पश्चिम विभागातून दोन आणि उत्तर विभागातून दोन ठिकाणे निश्चित झाली आहेत.'
'लखनऊमध्येही सामने आयोजित करण्यात आले आहेत. याआधी उत्तर प्रदेशला विश्वचषक सामन्याचे आयोजन करण्याची संधी मिळाली नव्हती. गुवाहाटीला संधी देण्यात आली आहे. दक्षिणेकडील अनेक ठिकाणे जोडण्यात आली आहेत.'
'वर्ल्डकप ठिकाणे निश्चित होण्यापूर्वी विचार केला गेला होता. आयसीसीने या ठिकाणांना मान्यता दिली आहे. ते पूर्णपणे आमच्या हातात नव्हते. आक्षेप घेणाऱ्या सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ही ठिकाणे निवडण्यासाठी आम्हाला आयसीसीची संमती आवश्यक असते.'
वर्ल्डकप 2023 साठी यजमान भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे संघ थेट पात्र ठरले आहेत. पण अजून दोन संघ सध्या झिम्बाब्वेमध्ये सुरु असलेल्या क्वालिफायर स्पर्धेतून मुख्य स्पर्धेत सहभागी होतील.
या वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीमध्ये सर्व सहभागी 10 संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे.
त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि कोलकाता येथे होणाऱ्या उपांत्य सामन्यांमध्ये विजय मिळवणारे संघ 19 नोव्हेंबरला अंतिम सामन्यात खेळतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.