World Cup Qualifiers 2023: वेस्ट इंडिज वर्ल्डकप 2023 मधून होणार बाहेर? माजी विश्वविजेत्यांसमोर असे आहे समीकरण

वेस्ट इंडिज सध्या World Cup 2023 क्वालिफायर स्पर्धेत खेळत आहे.
West Indies
West IndiesDainik Gomantak

World Cup Qualifiers 2023, Equations for West Indies : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे वेळापत्रक घोषित केले आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार असून 48 सामने खेळवले जाणार आहेत.

दरम्यान, वर्ल्डकप 2023 साठी यजमान भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे संघ थेट पात्र ठरले आहेत. पण अजून दोन संघ सध्या झिम्बाब्वेमध्ये सुरु असलेल्या क्वालिफायर स्पर्धेतून मुख्य स्पर्धेत सहभागी होतील.

दरम्यान, झिम्बाब्वेमध्ये सुरु असलेल्या क्वालिफायर स्पर्धेत दोन वेळचा विश्वविजेता संघ वेस्ट इंडिज देखील खेळत आहे. पण आता मुख्य वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा त्यांच्यासमोरील मार्ग कठीण बनला आहे.

क्वालिफायरमध्ये साखळी फेरीतून ए ग्रुपमधून झिम्बाब्वे, नेदरलँड्स आणि वेस्ट इंडिज हे तीन संघ, तसेच बी ग्रुपमधून श्रीलंका, स्कॉटलंड आणि ओमान हे तीन संघ असे मिळून सहा संघ सुपर सिक्स फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

त्यामुळे आता 29 जूनपासून सुरु होणाऱ्या सुपर सिक्समध्ये ए ग्रुपमधील संघांना बी ग्रुपमधील संघांविरुद्ध सामने खेळायचे आहेत, तर बी ग्रुपमधील संघांना ए ग्रुपमधील संघांशी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर गुणतालिकेतील पहिल्या दोन संघात अंतिम सामना होईल, तसेच या अंतिम सामन्यात पोहचणारे दोन्ही संघ वर्ल्डकप 2023 मुख्य स्पर्धेसाठीही पात्र ठरतील.

West Indies
World Cup Qualifiers 2023: दोन शतके अन् सुमारे 750 धावांनंतरही मिळाला नाही विजेता; अखेर थरारक सुपर ओव्हरने लावला निकाल

वेस्ट इंडिजसाठी का आहे मार्ग कठीण?

दरम्यान ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ए ग्रुपमधील झिम्बाब्वे आणि बी ग्रुपमधील श्रीलंका संघाचे सुपर सिक्स फेरीसाठी आधीच 4 गुण आहेत, कारण झिम्बाब्वेने ए ग्रुपमधून सुपर सिक्ससाठी पात्र ठरलेल्या नेदरलँड्स आणि वेस्ट इंडिजविरुद्ध आधीच साखळी फेरीत विजय मिळवलेला आहे, तर श्रीलंकेने बी ग्रुपमधील सुपर सिक्ससाठी पात्र ठरलेल्या स्कॉटलंडं आणि ओमानविरुद्ध विजय मिळवलेला आहे.

त्याचप्रमाणे स्कॉटलंड आणि नेदरलँड्स यांच्या खात्यात सुपर सिक्ससाठी प्रत्येकी 2 गुण आहेत, कारण स्कॉटलंडने सुपर सिक्समध्ये पात्र ठरलेल्या ओमानविरुद्ध आधीच विजय मिळवला आहे, तर नेदरलँड्सने वेस्ट इंडिजविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवलेला आहे.

याशिवाय वेस्ट इंडिज आणि ओमान यांच्या खात्यात सुपर सिक्ससाठी शुन्य गुण आहेत, कारण जरी ते सुपर सिक्ससाठी पात्र ठरले असले, तरी त्यांनी सुपर सिक्समध्ये पोहचणाऱ्या त्यांच्या ग्रुपमधील एकाही संघांविरुद्ध विजय मिळवलेले नाहीत.

याच गोष्टींमुळे आता वेस्ट इंडिजसाठी वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळणे कठीण झाले आहे. कारण आता त्यांना या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरायचे असेल, तर दुसऱ्या संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

West Indies
World Cup 2023 India: वेळापत्रक घोषित! 'या' दिवशी होणार श्रीगणेशा, 46 दिवस रंगणार थरार
CWC 2023 Qualifiers Super Six Points Table
CWC 2023 Qualifiers Super Six Points Table Screengrab: www.icc-cricket.com

दुसऱ्या संघांवर राहावे लागेल अवलंबून

मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरायचे असेल, तर वेस्ट इंडिजला सुपर सिक्समधील त्यांचे तिन्ही सामने जिंकावे तर लागतीलच, पण त्याचबरोबर अन्य संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. जर झिम्बाब्वे आणि श्रीलंकेने त्यांच्या तीन सामन्यांपैकी २ सामने जरी जिंकले, तरी वेस्ट इंडिज आणि ओमान या संघांचे आव्हान संपुष्टात येणार आहे.

तसेच जर किमान अन्य दोन संघांचे गुण वेस्ट इंडिजपेक्षा अधिक झाले, तरी त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आता वेस्ट इंडिजला आशा करावी लागणार आहे की ते त्यांचे सुपर सिक्समधील तिन्ही सामने जिंकतील आणि अन्य पाच संघांपैकी किमान चार संघांचे गुण त्यांच्यापेक्षा कमी असावेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com