Pranali Kodre
भारतात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळवला जाणार असून पुरुषांच्या क्रिकेटमधील हा 13 वा वनडे वर्ल्डकप आहे. या वर्ल्डकपचे वेळापत्रक आयसीसीने मंगळवारी जाहीर केले आहे.
या वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून 19 नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. पहिला आणि अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियवर खेळवला जामार आहे.
या वर्ल्डकपमधील 5 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान साखळी सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे मुंबई आणि कोलकाता येथे उपांत्य सामने पार पडतील.
ही वर्ल्डकप स्पर्धा एकूण 46 दिवस भारतातील हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरात पार पडणार आहे.
दरम्यान वर्ल्डकप 2023 मध्ये 46 दिवसात एकूण 48 सामने होणार आहेत. पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघात खेळवला जाणार आहे.
या वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीमध्ये सर्व सहभागी 10 संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे. त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. तसेच बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला अहमदाबादला होणार आहे.
तसेच गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि हैदराबाद येथे 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने झाले.