Ranji Trophy Goa: गोव्यासमोर तब्बल 23 वर्षांनी तमिळनाडूचे आव्हान! 'या' माजी विजेत्यांविरुद्धही होणार मॅच

बीसीसीआयने 2023-24 हंगामातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक व गटवारी जाहीर केली असून रणजी ट्रॉफीमध्ये तब्बल दोन दशकांनी गोवा आणि तमिळनाडू आमने-सामने असतील.
Goa Cricket Team
Goa Cricket TeamDainik Gomantak

Ranji Trophy 2023-24 Goa in 'C' group: भारतातील देशांतर्गत क्रिकेटच्या 2023-24 हंगामाला 28 जूनपासून दुलीप ट्रॉफी स्पर्धेने सुरुवात होत आहे. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दरम्यान या स्पर्धेत गोव्याच्या संघासमोर अनेक बलाढ्य संघांचे आव्हान उभे ठाकणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2023-24 हंगामातील देशांतर्गत विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक व गटवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, रणजी ट्रॉफी स्पर्धेत गोव्याचा एलिट ‘क’ गटात समावेश असून कर्नाटक, पंजाब, रेल्वे, तमिळनाडू, गुजरात, त्रिपुरा, चंडीगड या संघांचाही या गटात समावेश आहे.

कर्नाटक, पंजाब, रेल्वे, तमिळनाडू, गुजरात हे माजी विजेते संघ गटात असल्यामुळे गोव्यासाठी मोहीम अवघडच असेल. रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेला पाच जानेवारीपासून सुरवात होईल.

Goa Cricket Team
BCCI ची मोठी घोषणा! 2023-24 डोमेस्टिक क्रिकेट हंगामात होणार तब्बल 1846 सामने, पाहा टाईमटेबल

दोन दशकांनी गोवा-तमिळनाडू आमने-सामने

रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा विभागीय पातळीवर खेळली जात होती, तेव्हा तमिळनाडू संघ गोव्याचा दक्षिण विभागातील नियमित प्रतिस्पर्धी होता. दोन दशकांपूर्वी स्पर्धेचा ढाचा बदलला गेला आणि त्यानंतर उभय संघांत एकही सामना झाला नाही.

पुढील वर्षी जानेवारीत रणजी स्पर्धेला सुरवात होईल, त्यावेळी दोन्ही संघ तब्बल 23 वर्षांनंतर मैदानावर एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील.

गोवा व तमिळनाडू यांच्यात रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील शेवटचा सामना चेन्नईतील गुरुनानक महाविद्यालय मैदानावर झाला होता. नोव्हेंबर 2001 मध्ये झालेला हा सामना अनिर्णित राहिला होता.

तमिळनाडूने पहिल्या डावात 158 धावांची आघाडी घेतल्यानंतर त्यांनी दुसऱ्या डावात गोव्याचे 117 धावांत आठ गडी बाद केले, पण विजय हुकला होता. तमिळनाडूविरुद्धच्या 17 रणजी क्रिकेट सामन्यांत गोव्याला एकही विजय नोंदविता आलेला नाही.

Goa Cricket Team
अर्जुन तेंडुलकरचे IPL मध्ये पदार्पण! गोव्याकडून खेळतो डोमेस्टिक क्रिकेट, पाहा कशी आहे कामगिरी

गतमोसमात सहावा क्रमांक

गतमोसमातील (2022-23) रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील एलिट क गटातील आठ संघांत गोव्याला सहावा क्रमांक मिळाला होता. दोन विजय, दोन पराभव व तीन अनिर्णितमुळे गोव्याला 18 गुण नोंदविता आले होते.

बलाढ्य कर्नाटकविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला होता. गोव्याने केरळ व सेनादलावर विजय नोंदविले होते, पुदुचेरी व छत्तीसगडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता, तर कर्नाटकव्यतिरिक्त राजस्थान व झारखंडविरुद्धचे सामने अनिर्णित राहिले होते.

इतर स्पर्धेतील गटवारी

रणजी ट्रॉफीपूर्वी 16 ऑक्टोबरपासून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत गोव्याचा क गटात समावेश असून या गटात पंजाब, सौराष्ट्र, गुजरात, गोवा, रेल्वे, आंध्र, मणिपूर, अरुणाचल प्रदेश या संघांचाही समावेश आहे.

तसेच 23 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत गोव्याचा पंजाब, तमिळनाडू, मध्य प्रदेश, बंगाल, बडोदा, गोवा, नागालँड संघांसह ई गटात समावेश आहे.

गोव्याच्या सीनियर संघाची 2023-24 मधील गटवारी

  • सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 (16 ऑक्टोबरपासून): क गट : पंजाब, सौराष्ट्र, गुजरात, गोवा, रेल्वे, आंध्र, मणिपूर, अरुणाचल प्रदेश

  • विजय हजारे ट्रॉफी एकदिवसीय (23 नोव्हेंबरपासून) : ई गट : पंजाब, तमिळनाडू, मध्य प्रदेश, बंगाल, बडोदा, गोवा, नागालँड

  • रणजी ट्रॉफी (5 जानेवारीपासून) : एलिट क गट : कर्नाटक, पंजाब, रेल्वे, तमिळनाडू, गोवा, गुजरात, त्रिपुरा, चंडीगड

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com