

Bangladesh Cricket Team: क्रिडा विश्वातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आगामी 'टी-20 विश्वचषक 2026' मधून अधिकृतपणे माघार घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आता हे स्पष्ट झाले की, बांगलादेशचा संघ या स्पर्धेसाठी भारत दौऱ्यावर येणार नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेश क्रिकेट बोर्ड भारतामध्ये खेळण्यास नकार देत होते आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) सामने दुसऱ्या देशात हलवण्याची विनंती करत होते. मात्र, आयसीसीने ठिकाण बदलण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर बांगलादेशने आपण विश्वचषकातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 7 फेब्रुवारी 2026 पासून हा विश्वचषक रंगणार आहे, मात्र बांगलादेशच्या या टोकाच्या भूमिकेमुळे क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
आयसीसीने 21 जानेवारी रोजी बांगलादेशला शेवटचा इशारा दिला होता की, त्यांनी एकतर भारतात येऊन खेळण्याची तयारी दर्शवावी किंवा स्पर्धेतून बाहेर पडण्यास तयार राहावे. आपला अंतिम निर्णय कळवण्यासाठी आयसीसीने 22 जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती. या पार्श्वभूमीवर बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी खेळाडूंसोबत तातडीची बैठक घेतली आणि त्यानंतर आयसीसीची अट मान्य नसल्याचे सांगत स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुल यांनी आयसीसीवर गंभीर आरोप करताना म्हटले की, त्यांना विश्वचषक खेळायचा होता, पण भारतात खेळणे त्यांना मान्य नाही. आयसीसीने भारताच्या दबावाखाली निर्णय घेतल्याचा दावा करत त्यांनी क्रिकेटची लोकप्रियता कमी होत असल्याची टीकाही केली. बांगलादेशसारख्या मोठ्या क्रिकेट प्रेमी देशाला विश्वचषकापासून दूर ठेवणे हे आयसीसीचे अपयश असल्याचे त्यांनी नमूद केले.
या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी मुस्तफिजुर रहमान आणि आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील घडामोड असल्याचे मानले जाते. बीसीसीआयच्या सांगण्यावरुन केकेआरने मुस्तफिजुरला संघातून रिलीज केले, ज्याचा राग बांगलादेश क्रिकेट बोर्डाला होता. या एका घटनेनंतर बांगलादेशने आपला संघ भारतात न पाठवण्याचा पवित्रा घेतला आणि तेव्हापासून सातत्याने भारतामध्ये होणाऱ्या सामन्यांचा विरोध केला जात होता. आयसीसीने त्यांची वेन्यू बदलण्याची मागणी फेटाळल्यामुळे अखेर बांगलादेशने स्पर्धेबाहेर राहण्याचा मोठा निर्णय घेतला.
येत्या 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान होणाऱ्या या टी-20 विश्वचषकात एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. बांगलादेशचा समावेश अ गटात करण्यात आला होता, जिथे त्यांच्यासोबत इटली, वेस्ट इंडिज, नेपाळ आणि इंग्लंड यांसारख्या संघांचे सामने होणार होते. आता बांगलादेशने माघार घेतल्यामुळे आयसीसी या गटात एका नवीन संघाला संधी देण्याची दाट शक्यता आहे. यामुळे एका उदयोन्मुख संघासाठी विश्वचषकाची कवाडे उघडली असली, तरी बांगलादेशच्या माघारीमुळे क्रिकेट मधील राजकारण आणि खेळाडूंच्या वादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.