India vs Australia, 5th T20I, ball hit umpire Virender Sharma:
भारत विरुद्ध ऑस्ट्र्लिया संघात रविवारी (3 डिसेंबर) टी20 मालिकेतील पाचवा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 6 धावांनी विजय मिळत मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. या सामन्यात अखेरच्या षटकात एक नाट्यमय घटना घडली.
बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला अखेरच्या षटकात विजयासाठी 10 धावांची गरज होती. या षटकात भारताकडून अर्शदीप सिंग गोलंदाजी करत होता.
यावेळी त्याने पहिल्या दोन्ही चेंडूवर कर्णधार मॅथ्यू वेडला धावा करू दिल्या नाहीत, तर तिसऱ्या चेंडूवर त्याला 22 धावांवर बाद केले. चौथ्या चेंडूवर जेसन बऱ्हेनडॉर्फने एक धाव काढली.
त्यानंतर अखेरच्या दोन चेंडूत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 9 धावांची गरज होती. यावेळी नॅथन एलिसने जोरदार शॉट खेळला. त्यामुळे वेगात चेंडू सरळ जात असताना आधी अर्शदीपने तो आडवण्यासाठी हात मध्ये घातला. पण त्याच्या हाताला चेंडू लागून तो थोडा वळला.
त्यावेळी पंच विरेंद्र शर्मा यांनी चेंडू पासून वाचण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र तो चेंडू त्यांच्या उजव्या मांडीला जोरात लागला. त्यामुळे चेंडूही आडला. जर तो चेंडू पंचांना लागून थांबला नसता, तर चौकार जाऊ शकला असता. जर तसे झाले असते, तर सामना अधिक रोमांचक वळणावर आला असता.
दरम्यान, सुदैवाने पंचांना चेंडू लागल्यानंतर गंभीर दुखापत झाली नाही. या चेंडूवर नॅथन एलिसला एकच धाव मिळाली. त्यामुळे भारताचा विजयही जवळपास निश्चित झाला. कारण अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला 8 धावांची गरज होती. पण शेवटच्या चेंडूवरही ऑस्ट्रेलियाने एकच धाव काढली. त्यामुळे भारताने 6 धावांनी विजय मिळवला.
दरम्यान, अखेरच्या षटकात पहिला चेंडू वाईड न देण्यावरूनही वेडचे लेगला उभे असलेल्या पंचांबरोबर मतभेद झाले होते.
या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 160 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने 53 धावांची खेळी केली, तर अक्षर पटेलने ३१ धावांची आणि जितेश शर्माने 24 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेऱ्हेनडॉर्फ आणि बेन ड्वारशुई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉटने 54 धावांची खेळी केली. तसेच ट्रेविस हेडने 28 धावांची आणि वेडने 22 धावांची खेळी केली. पण ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 8 बाद 154 धावाच करता आल्या. भारताकडून मुकेश कुमारने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.