Sandeep Lamichhane: बलात्कार प्रकरणी नेपाळ कोर्टाचा मोठा निर्णय; संदीप लामिछानेला सुनावली 8 वर्षांची शिक्षा
Nepal Court: आशिया कप आणि दिल्लीकडून आयपीएलमध्ये खेळलेल्या या स्टार खेळाडूला बलात्कार प्रकरणात 8 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेपाळच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने स्टार क्रिकेटर संदीप लामिछाने याला बलात्कार प्रकरणात 8 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
शिशिरराज ढकल यांच्या खंडपीठाने आज सुनावणी घेतल्यानंतर नुकसानभरपाई आणि दंडासह 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाचे अधिकारी रामू शर्मा यांनी याला दुजोरा दिला. दरम्यान, संदीप हा एक फिरकी गोलंदाज आहे आणि तो नुकताच आशिया कपमध्येही खेळला होता. तो दिल्लीकडून आयपीएलमध्येही खेळला आहे. आयपीएलमध्ये तो 2018 आणि 2019 च्या हंगामात दिल्ली संघाकडून खेळताना दिसला होता.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तो जामिनावर होता
नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान संदीप लामिछाने याला नेपाळ न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. याप्रकरणी संदीपला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याची सुनावणीपूर्व कोठडीत रवानगीही केली होती. मात्र, 20 लाखांच्या जामीनावर संदीपची सुटका करण्यात आली होती. मात्र, बिग बॅश लीग आणि आयपीएलमध्ये खेळलेल्या संदीपला परदेशी लीगमध्ये भाग घेण्यासही न्यायालयाने बंदी घातली होती.
नेपाळ क्रिकेट असोसिएशनने निलंबित केले होते
दरम्यान, याप्रकरणी काठमांडूमध्ये अटक वॉरंट जारी केल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीला नेपाळचा तत्कालीन कर्णधार लामिछाने याला क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ (CAN) ने निलंबित केले होते. यानंतर लामिछाने याच्याविरोधात काठमांडू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे वृत्त आले होते. त्यावेळी, लामिछाने CPL 2022 मध्ये भाग घेण्यासाठी जमैका तल्लावाहसोबत वेस्ट इंडिजमध्ये होता. त्यानंतर क्लबने लामिछाने तात्काळ स्पर्धेतून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले होते. ऑक्टोबरच्या सुरुवातीला काठमांडूच्या विमानतळावर उतरल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले होते.
संदीपची क्रिकेट कारकीर्द
संदीप लामिछानेने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी नेपाळसाठी 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 2018 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या संदीपने आतापर्यंत खेळलेल्या एकूण 51 एकदिवसीय सामन्यांमध्ये 112 विकेट घेतल्या आहेत. यासोबतच टी-20 इंटरनॅशनलमध्ये या फिरकी गोलंदाजाने 52 सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.