Sandeep Lamichhane Case: नेपाळ क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा माजी कर्णधार आणि उत्कृष्ट लेगस्पिनर संदीप लामिछाने अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात दोषी आढळला आहे. याप्रकरणी आज सुनावणी होणार होती आणि त्यावर आता निर्णय आला आहे. काठमांडू जिल्हा न्यायालयाने आपला निकाल देत संदीपला दोषी घोषित केले आहे.
संदीप भारताच्या T20 लीग आयपीएलमध्येही खेळला आहे. या लीगमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. या प्रकरणाची सुनावणी रविवारी सुरु झाली होती, त्यावर आज (शुक्रवारी) निर्णय आला. न्यायाधीश शिशिरराज ढकल यांच्या एकल खंडपीठाने यावर निर्णय दिला. मात्र, या प्रकरणात संदीपला किती वर्षांची शिक्षा होणार हे न्यायाधीशांनी सांगितलेले नाही. याबाबतचा निर्णय पुढील सुनावणीत येणार आहे.
दरम्यान, लामिछाने सध्या जामिनावर बाहेर होता. 12 जानेवारी रोजी पाटण उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. 21 ऑगस्ट रोजी काठमांडू जिल्हा न्यायालयाच्या वकिलांनी 17 वर्षीय मुलीवरील बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. फौजदारी संहिता 2074 च्या कलम 219 अन्वये संदीपला आरोपी करण्यात आले होते.
अल्पवयीन मुलीने 6 सप्टेंबर 2022 रोजी गौशाळच्या महानगर पोलिस परिमंडळात संदीपविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. संदीप सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोकडून खेळत होता. त्याला नेपाळ पोलिसांनी 6 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. आरोप झाल्यानंतर संदीपचे बँक खाते आणि मालमत्ता जप्त करण्यात आली.
संदीप दोन वर्षे आयपीएल खेळला. त्याने 2018 आणि 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले. संदीपने नेपाळसाठी 51 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने 112 विकेट घेतल्या आहेत. त्याने नेपाळकडून 20 टी-20 सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत. संदीप जगभरातील T20 लीगमध्ये खेळतो. तो ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्येही खेळतो. मात्र या प्रकरणानंतर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संदीपला किती वर्षांची शिक्षा होते हे पाहणे बाकी आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.