Goa vs Rajasthan: रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामात गोव्याचा पहिला सामना राजस्थानविरुद्ध होत असून या सामन्याचा गुरुवारी तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवसाखेर राजस्थानने 71 षटकांत 6 बाद 245 धावा केल्या आहेत. दरम्यान, गोव्याकडून अर्जुन तेंडुलकर आणि मोहित रेडकर यांना विकेट्स मिळाल्या.
गोव्याने पहिला डाव 547 धावांवर घोषित केल्यावर राजस्थानचा संघ फलंदाजीला उतरला. त्यांच्याकडून अभिजीत तोमर 9 धावांवरच धावबाद झाल्यानंतर यश कोठारी आणि महिपाल लोमरोर यांनी 128 धावांची भागीदारी करत राजस्थानला चांगली सुरुवात दिली. मात्र यश 96 धावांवर मोहित रेडकरच्या चेंडूवर बाद झाला.
पण, त्यानंतरही महिपालने सलमान खानबरोबर अर्धशतकी भागीदारी केली. अखेर ही भागीदारीही रंगू लागली होती. पण, याचवेळी अर्जुन तेंडुलकरने महिपालला 63 धावांवर आणि त्यानंतर काही वेळाने सलमान खानला 40 धावांवर बाद केले.
सलमान बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात मोहितने कर्णधार अशोक मनेरिया आणि कमलेश नागरकोटी यांना बाद करत राजस्थानला दुहेरी धक्के दिले. त्यामुळे दिवसाअखेरीत राजस्थानने 6 विकेट्स गमावल्या.
आता चौथ्या दिवशी राजस्थान फॉलोऑन टाळणार का हे पाहावे लागेल. राजस्थानचा संघ अद्याप 302 धावांनी पिछाडीवर आहे.
गोव्याचा पहिला डाव घोषित
या सामन्यात गोव्याने पहिला डाव 174 षटकांत 9 बाद 547 धावांवर घोषित केला. गोव्याकडून सुयश प्रभुदेसाईने शानदार कामगिरी करताना द्विशतक झळकावले. त्याने 29 चौकारांसह 416 चेंडूत 212 धावांची खेळी केली.
तसेच या खेळीदरम्यान त्याने 6 व्या विकेटसाठी अर्जून तेंडुलकरबरोबर 221 धावांची भागीदारीही केली. अर्जूनने देखील त्याला साथ देताना वैयक्तिक शतक झळकावले. त्याने 207 चेंडूत 16 चौकार आणि 2 षटकारांसह 120 धावांची खेळी केली. तसेच गोव्याकडून स्नेहल कौठनकरनेही 59 धावांची खेळी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.