IPL 2023: अनेकदा टी20 क्रिकेट म्हटले की आक्रमक खेळ करणारे फलंदाज आणि विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल चर्चा होते. तसेच कसोटीत दमदार खेळ करणारे खेळाडू या प्रकारासाठी अनेकदा अनफिटही समजले जातात. पण इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल या जगातील लोकप्रिय टी20 लीगच्या 16 व्या हंगामात कसोटी स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहे. अशाच पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
अजिंक्य रहाणे भारताकडून तिन्ही प्रकारात खेळला असला, तरी त्याला कसोटी क्रिकेटने वेगळी ओळख दिली. त्याने कसोटीत भारतासाठी दमदार कामगिरीही केली. तसेच तो गेली अनेकवर्षी आयपीएलमध्ये खेळत असला, तरी त्याला कसोटी खेळाडू म्हणूनच बऱ्याचदा ओळखले जाते. रहाणेने कसोटीत 82 सामन्यांमध्ये 38.52 च्या सरासरीने 4931 धावा केल्या आहेत.
पण आयपीएल 2023 मध्ये रहाणे त्याची ओळख बदलताना दिसला. त्याने आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून आक्रमक खेळ केला. रहाणेने आयपीएल 2023 मध्ये 7 सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांसह 189 च्या स्ट्राईक रेटने 224 धावा केल्या आहेत. तसेच या हंगामात सर्वाधिक स्ट्राईक रेट असणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचेही नाव आहे. त्याने पुनरागमनाच्या सामन्यातच कमालीची गोलंदाजी करतान 19 धावांत 2 विकेट्स घेतल्या.
इशांत शर्मा तर गेल्या अनेक वर्षांपासून भारताकडून केवळ कसोटी क्रिकेटमध्येच खेळताना दिसला. तो कसोटीमधील एक चांगला गोलंदाज समजला जातो. पण त्याने गेल्या काही दिवसात कसोटी संघातूनही आपली जागा गमावली होती. विशेष गोष्ट अशी की इशांत 100 कसोटी सामने खेळणाऱ्या मोजक्या भारतीय खेळाडूंपैकी एक आहे.
पण तो देखील आयपीएल 2023 मध्ये दमदार कामगिरी करत आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी या हंगामात 4 सामने खेळताना 6 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 2021 नंतर 20 एप्रिल 2023 रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळताना आयपीएलमध्ये पुनरागमन केले होते.
तसेच 2 मे रोजी गुजरात टायटन्सला विजयासाठी शेवटच्या षटकात 12 धावांची गरज असताना इशांतने शानदार गोलंदाजी करत राहुल तेवतियाची विकेट तर घेतलीच, पण केवळ 6 धावाच दिल्या. त्याची कामगिरी ज्या प्रकारे होत आहे, ते पाहून जर कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी जयदेव उनाडकट पूर्ण फिट झाला नाही, तर इशांतला संधी मिळणार का हे पाहावे लागणार आहे.
मोहम्मद शमी भारताकडून बऱ्याचदा वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये नियमित खेळताना दिसतो. मात्र टी20 मध्ये त्याला फारशी संधी मिळत नाही. त्याने भारताकडून 63 कसोटी, 90 वनडे आणि 23 टी20 सामने खेळले आहेत. तसेच त्याला टी20 स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणूनही ओळखले जात नाही.
पण असे असले तरी तो आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना मात्र त्याच्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी खेळाडूंना संघर्ष करायला लावत आहे. अनेकदा त्याने इकोनॉमिकल गोलंदाजी करताना फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासूनही रोखलेले दिसते.
त्याने 2 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 11 धावाच देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने आत्तापर्यंत 9 सामन्यांमध्ये केवळ 3 वेळाच 30 पेक्षा अधिक धावा दिल्या आहेत. त्याने 6 सामन्यात 30 पेक्षा कमी धावा दिल्या आहेत. तसेच त्याने एकूण 17 विकेट्स घेतल्या आहेत.
आर अश्विन तर गेल्या अनेक वर्षांपासून कसोटीतील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी ओळखला जातो. तसेच तो फलंदाजीतही खालच्या फळीत चांगली कामगिरी करताना दिसतो. त्याने कसोटीत 92 सामने खेळताना 474 विकेट्स घेतल्या आहे आणि 3129 धावाही केल्या आहेत, पण तरी त्याने 2022 टी20 वर्ल्डकपमध्ये भारताकडून पुनरागमन केले होते. पण तरी त्याला त्यानंतरही फारशी टी20 क्रिकेटमध्ये संधी मिळालेली नाही.
असे असले तरी आयपीएल 2023 मध्ये तरी अश्विन चांगली कामगिरी करत आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना अश्विन केवळ गोलंदाजीच नाही, तर फलंदाजीतही कमाल करत आहे. त्याने आयपीएल 2023 मध्ये 144 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. त्याचबरोबर 13 विकेट्सही घेतल्या आहेत.
न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन कॉनवे कसोटीतील एक चांगला फलंदाज समजला जातो. त्याने न्यूझीलंडसाठी कसोटीत अनेकदा दमदार खेळी केल्या आहेत. या 31 वर्षीय खेळाडूने 16 कसोटी सामने खेळताना 4 शतके आणि 8 अर्धशतके करताना 1403 धावा केल्या आहेत.
दरम्यान, कॉनवे आयपीएल 2023 मध्ये मात्र चेन्नई सुपर किंग्समध्ये अप्रतिम कामगिरी करताना दिसला आहे. त्याने 9 सामने आत्तापर्यंत खेळताना 5 अर्धशतके केली आहेत. तसेच 144 च्या स्ट्राईक रेटने 414 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.