ICC World Cup 2023 Semi-Final Equation:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी न्यूझीलंडने अखेर चार सलग पराभवानंतर विजयाची चव चाखली. गुरुवारी बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडने 5 विकेट्सने विजय मिळवला.
हा सामना दोन्ही संघांचा वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना होता. न्यूझीलंडचा हा 9 सामन्यामधील 5 वा विजय होता, त्यामुळे त्यांचे 10 गुण झाले आहेत.
त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडने गुणतालिकेतील चौथ्या क्रमांकावर दावेदारी मजबूत केली आहे. त्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीत पोहण्याच्या आशाही मजबूत झाल्या आहेत.
उपांत्य फेरीत भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी स्थान पक्के केले आहे. पण चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात स्पर्धा आहे.
आता न्यूझीलंडने त्यांचा अखेरचा साखळी सामना जिंकला असल्याने त्यांचे १० गुण आहेत. तर पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध आणि अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचे साखळी सामने खेळायचे आहेत.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांनी आत्तापर्यंत 8 सामन्यांपैकी प्रत्येकी 4 सामने जिंकले असून त्यांचे 8 गुण आहेत. त्यामुळे जर त्यांनी अखेरच्या साखळी फेरीत पराभव पत्करला, तर त्यांचे आव्हान थेट संपेल. पण विजय मिळवला, तर नेट रनरेट महत्त्वाचा असणार आहे. मात्र, नेट रनरेटमध्येही न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी त्यांना जवळपास चमत्काराचीच अपेक्षा करावी लागणार आहे.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार जर न्यूझीलंडला नेट रनरेटमध्ये मागे टाकून उपांत्य फेरीत पाकिस्तानला स्थान मिळवायचे असेल, तर त्यांना इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी केली, तर कमीत कमी 287 धावांनी विजय मिळवावा लागेल.
तसेच जर त्यांनी प्रथम गोलंदाजी केली, तर त्यांना इंग्लंडला 50 धावांच सर्वबाद करून 2 षटकात धावांचे लक्ष्य पूर्ण करावे लागेल किंवा 100 धावांत रोखत तीन षटकात धावांचे लक्ष्य पूर्ण करावे लागेल.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षाही कमी असल्याने त्यांच्यासाठी हे आव्हान आणखी कठीण आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी जरी उपांत्य फेरीचे दरवाजे अधिकृतरित्या बंद झालेले नसले, तरी त्यांच्यासाठी त्यातून आत जाणे जवळपास अशक्य आहे.
दरम्यान, जर न्यूझीलंडने उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला, तर त्यांचा सामना गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर असलेल्या भारताविरुद्ध मुंबईत होईल. विशेष म्हणजे 2019 वर्ल्डकपमध्ये देखील भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य सामना झाला होता. त्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत केले होते.
तथापि, वर्ल्डकप 2023 स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी गुणतालिकेत दुसरा आणि तिसरा क्रमांक निश्चित केला असल्याने त्यांच्यात दुसरा उपांत्य सामना होण्याचे निश्चित आहे. हा सामना कोलकाताला होईल.
मात्र, जर पाकिस्तानने जर समीकरणानुसार इंग्लंडला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली, तर भारताविरुद्ध त्यांचा सामना होईल. पण हा सामना मुंबईला न होता कोलकातामध्ये होईल आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य सामना मुंबईला होईल.
उपांत्य फेरीतील पहिला सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत आणि 16 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.