भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध धरमशाला येथे झालेल्या कसोटी मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी मिळवलेल्या या विजयासह भारताने मालिकेतही 4-1 अशा फरकाने विजय मिळवला.
दरम्यान, धरमशालाला झालेल्या पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शुभमन गिल आणि जॉनी बेअरस्टो यांच्या बराचवेळ शाब्दिक वाद झाले, ज्यात सर्फराज खान आणि यष्टीरक्षक ध्रुव जुरेलनेही उडी मारली होती.
विशेष म्हणजे पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत पहिल्यांदाच दोन देशांच्या खेळाडूंमध्ये अशी स्लेजिंगची घटना पाहायला मिळाली.
झाले असे की तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला, त्यावेळी त्यांना 259 धावांची पिछाडी भरून काढायची होती. परंतु, इंग्लंडने पहिल्या तीन विकेट्स 10 षटकांच्या आतच गमावल्या होत्या. यावेळी 100 वा कसोटी सामना खेळणारा बेअरस्टो जो रुटसह इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता.
त्यावेळी 18 व्या षटकात गोलंदाजीसाठी कुलदीप यादव तयारी करत होता. त्याचवेळी स्टंप माईकमध्ये गिल आणि बेअरस्टो यांच्यात झालेली शाब्दिक चकमक कैद झाली. बेअरस्टो फलंदाजी करत असताना गिल स्लीपमध्ये उभा होता.
यावेळी बेअरस्टोने गिलला जेम्स अँडरसनने बाद केल्याची आठवण करून दिली. त्यावेळी बेअरस्टोने असा दावाही केला की गिलने अँडरसनला तो थकला असल्याचे म्हटले.
त्यावेळी गिलनेही त्याला प्रत्युत्तर देताना सांगितले की 'मग काय झालं, त्याने मला माझ्या शतकानंतर त्याने त्रिफळाचीत केले होतं'. त्याचबरोबर गिलने बेअरस्टोला त्याने या मालिकेत किती धावा केल्या, असं विचारत डिवचलं.
त्यावर बेअरस्टोनेही त्याला प्रत्युत्तर करत डिवचलं की'चेंडू स्विंग होताना तू किती धावा केल्या होत्या', त्यावेळी ध्रुव जुरेलने मध्यस्थी करत बेअरस्टोला शांत केले. त्यानंतर सर्फराजनेही यात उडी मारत म्हटले की 'थोड्या धावा काय केल्या, जास्तच उड्या मारत आहे.'
दरम्यान, यानंतर 18 व्या षटकातच चौथ्या चेंडूवर कुलदीपने बेअरस्टोला पायचीत केले. त्यानंतरही बेअरस्टो गिलला काहीतरी म्हणला, ज्यावर गिलनेही त्याला प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, सामन्यानंतर गिलला अँडरसनबरोबर झालेल्या संवादाबद्दल विचारल्यानंतर त्याने याबद्दल खुलासा करण्यास नकार दिला. त्याने ब्रॉडकास्टरला सांगितले की 'या गोष्टी आमच्या दोघांमध्येच राहिल्या, तर चांगलं आहे.'
दरम्यान, या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 218 धावा केल्या होत्या, तर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 477 धावा केल्या होत्या. तसेच इंग्लंडचा दुसरा डाव 195 धावांवर संपला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.