रावराजे देशप्रभूंचा वैभवशाली राजवाडा

अतिथी वाडा-गेस्ट हाऊस बांधण्यासाठी तीन वर्षे लागली होती. 1905 साली या वाड्यांना इटालियन टाईल्स व मार्बल बसवण्यात आले.
रावराजे देशप्रभूंचा वैभवशाली राजवाडा
रावराजे देशप्रभूंचा वैभवशाली राजवाडाDainik Gomantak
Published on
Updated on

भव्य दिव्य सुनियोजित बांधकाम, आतले फर्निचर व त्यावरची वैशिष्टपूर्ण कलाकुसर, हे सारे कलात्मकरित्या करणारे कारागीर स्थानिक होते. बांधकामाकरिता कुठल्या वास्तुविशारदालाही पाचारण करण्यात आले नव्हते. वाड्याचे बांधकाम करणाऱ्या घराण्यातील पुरुषांनीच स्वत: वास्तुशास्त्राचा अभ्यास करून बांधकामे करून घेतली. अतिथी वाडा-गेस्ट हाऊस बांधण्यासाठी तीन वर्षे लागली होती. 1905 साली या वाड्यांना इटालियन टाईल्स व मार्बल बसवण्यात आले.

मुख्य वाड्याला लागूनच सुंदर दत्तमंदिर आहे . तेथील दत्ताचे स्थान प्रमुख वाड्याच्याही पूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. याच मंदिराच्या आवारात नगारखाना दिसतो. पूर्वीच्या लोकांकडे घड्याळे नव्हती. त्याना वेळेची माहिती मिळावी म्हणून दर तासाने येथून नौबत वाजवली जायची. ही प्रथा हल्लीपर्यंत होती.

रावराजे देशप्रभूंचा वैभवशाली राजवाडा
पेडणे येथील 'रावराजे देशप्रभू' यांच्या इतिहासाची साक्ष देणारा राजवाडा

देशप्रभू घराणे पेडण्यात कसे आले, याची अनेकांना उत्सुकता आहे. देशप्रभू ही आदिलशाही पदवी असून त्यांचे खरे आडनाव सामंत प्रभू होते. ते मूळ कुडाळचे राज्यकर्ते. आदिलशाही डबघाईत गेल्यावर देशमुखी व्यवस्थाही संपुष्टात आली आणि अनेक लहान मोठी संस्थाने निर्माण झाली. कुडाळ हे त्यातील एक. कुडाळ येथे 1666 साली जेव्हा भाऊबंदकी झाली तेव्हा एक भाऊ नारायण सामंत आपल्या परिवारासोबत, भूमिगत झाला व जुन्या काबिजातील हणजुणे येथे आला. येताना आपला कारभारी असलेला फडते याला सांगितले की, त्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याने शाही नाणे निधी सावंतवाडीच्या खेम सावंतांकडे सुपूर्द करून त्यांना कुडाळचे रक्षण करायला सांगणे.

त्यानुसार खेम सावंताकडे कुडाळला आले. पुढे कालांतराने ज्यावेळी छत्रपती संभाजी सावंतवाडीवर चाल करून येत असल्याची बातमी आली तेव्हा खेम सावंतांकडे पोर्तुगीजानी त्यांचे रक्षण करण्याच्या बदल्यात काही प्रदेशाची मागणी केली. तेव्हा सावंतांनी त्यांच्याकडे चालवायला असलेले कुडाळ संस्थानातील पेडणे, डिचोली व सत्तरी हे भाग पोर्तुगीजाना दिले. तह झाला पण काही कारणास्तव छत्रपती संभाजी आलेच नाहीत. पोर्तुगीजांनी मात्र मिळालेले प्रदेश परत करायचे नाकारले. शेवटी नारायण सामंत प्रभू यांनी आपल्याच संस्थानाचा एक भाग असलेल्या पेडण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि प्रमुख वाड्याची मुहूर्तमेढ रोवली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com