

भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं नातं अधिक घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण यंदा 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या सुखी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊही तिच्या आयुष्यात नेहमी साथ देण्याचं वचन देतो. राखीच्या दिवशी बहिणीला एखादी खास भेट देण्याचीही परंपरा आहे. त्यामुळे यंदा नेहमीच्या मिठाई किंवा पैशांऐवजी तिच्या आवडीचा आणि उपयोगी गिफ्ट देऊन हा दिवस अधिक खास करता येईल.
बहिणीला दागिने आवडत असतील तर चांदीची पैंजण हा एक आकर्षक पर्याय ठरू शकतो. पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या डिझाइनमध्ये पैंजण उपलब्ध असतात. विशेषतः विवाहित बहिणीसाठी ही भेट भावनिकदृष्ट्याही खास ठरू शकते. बजेटनुसार साधी किंवा डिझायनर पैंजण निवडता येईल.
तुमची बहीण कॉलेजमध्ये शिकत असेल किंवा तरुण असेल, तर तिच्या स्टाइलला साजेसा ज्वेलरी सेट निवडा. कानातले, ब्रेसलेट, अंगठी आणि पेंडंट असलेला कॉम्बो आकर्षक ठरू शकतो. तिच्या आवडीच्या रंगानुसार आणि कपड्यांच्या स्टाइलनुसार दागिने निवडल्यास भेट अधिक वैयक्तिक वाटेल. नावाचे किंवा आद्याक्षर असलेले पेंडंट दिल्यास या गिफ्टला आणखी खास टच देता येईल.
बहीण सौंदर्य आणि स्किनकेअरची आवड असलेली असेल तर तिच्यासाठी स्वतःची काळजी घेण्यास उपयोगी ठरणारे प्रोडक्ट्स निवडू शकता. फेसवॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लिप बाम किंवा सीरम यांचा छोटा सेट तयार करता येईल. मात्र तिची त्वचा आणि वापराच्या सवयी लक्षात घेऊन प्रोडक्ट्स निवडणे महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास ती आधीपासून वापरत असलेल्या ब्रँड किंवा प्रोडक्ट्सचीच निवड करा.
तुमची बहीण नोकरी किंवा कॉलेजसाठी दररोज बाहेर जात असेल, तर सुंदर आणि उपयोगी बॅग हा उत्तम पर्याय ठरू शकतो. लॅपटॉप किंवा टॅब ठेवण्यासाठी जागा, पुरेसे कप्पे आणि आरामदायी स्ट्रॅप असलेली बॅग तिच्या रोजच्या वापरासाठी फायदेशीर ठरेल. तिच्या कपड्यांच्या स्टाइलशी जुळणारा रंग आणि डिझाइन निवडल्यास गिफ्ट अधिक आवडण्याची शक्यता आहे.
लग्नानंतर घर, नोकरी आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये अनेक महिलांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. अशा वेळी स्पा किंवा वेलनेस सेंटरचे गिफ्ट व्हाउचर हा वेगळा पर्याय ठरू शकतो. तिला आराम करण्यासाठी काही तास स्वतःसाठी देता येतील. दुसरा पर्याय म्हणजे तिच्या दैनंदिन कामात मदत करणारे एखादे उपयुक्त घरगुती उपकरण. तिच्या गरजेनुसार निवडलेली अशी भेट केवळ महागडी वस्तू देण्यापेक्षा अधिक अर्थपूर्ण ठरू शकते.
रक्षाबंधनाच्या भेटीची खरी किंमत तिच्या भावनिक अर्थामध्ये असते. त्यामुळे गिफ्टसोबत बहिणीसाठी एखादं छोटंसं हस्तलिखित पत्र, फोटो किंवा तुमच्या दोघांचा एखादा खास आठवणींचा क्षण जोडला तर भेट आणखी संस्मरणीय होऊ शकते. महागडं गिफ्ट देण्यापेक्षा बहिणीला खरंच काय आवडतं आणि तिच्या दैनंदिन आयुष्यात कशाचा उपयोग होईल, याचा विचार करून भेट निवडणं अधिक महत्त्वाचं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.