
Cancer Symptoms in Women: हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे रविवारी (३१ ऑगस्ट) निधन झाले. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या वर्षभरापासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.
'पवित्र रिश्ता', 'उतरण', 'कसम से', 'चार दिवस सासूचे' आणि 'साथ निभाना साथिया' यांसारख्या अनेक मालिकांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या प्रियाने मुंबईतील मीरा रोड येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाची बातमी दुःखद असली तरी, कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांना ओळखणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव तिची कहाणी करून देते. योग्य वेळी निदान झाल्यास उपचाराचे चांगले परिणाम मिळू शकतात.
प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरची लक्षणे वेगवेगळी असली तरी, काही सामान्य संकेत आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करू नये:
अचानक वजन घटणे: कोणताही प्रयत्न न करता अचानक वजन कमी होणे.
सतत थकवा: पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही सतत अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे, विशेषतः रक्ताच्या कॅन्सरमध्ये हे दिसून येते.
दीर्घकाळ वेदना किंवा डोकेदुखी: कारण नसतानाही शरीरात सतत वेदना होणे किंवा डोकेदुखी थांबत नसणे.
सतत ताप येणे: लिम्फोमासारख्या रक्ताच्या कॅन्सरमध्ये हे लक्षण दिसून येते.
त्वचेतील बदल: त्वचेवर नवीन तीळ, डाग किंवा रंगात बदल दिसणे.
जखम न भरणे: विशेषतः तोंडात किंवा त्वचेवरील जखम दीर्घकाळ बरी न होणे.
असामान्य रक्तस्त्राव: उलट्या, मूत्र किंवा शौचातून रक्त येणे.
काही कॅन्सर महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात, जसे की स्तन, गर्भाशय, गर्भाशयाच्या मुखाचा (सर्वाइकल) आणि गर्भाशयाच्या आतील आवरणाचा (एंडोमेट्रियल) कॅन्सर. यांची सुरुवातीची लक्षणे अशी असू शकतात:
मासिक पाळी नसतानाही रक्तस्त्राव: मासिक पाळीच्या मध्यात किंवा मेनोपॉजनंतर असामान्य रक्तस्त्राव होणे.
सतत पोट फुगणे किंवा पोटदुखी: हे अंडाशयाच्या (ओव्हेरियन) कॅन्सरचे लक्षण असू शकते.
भुकेत बदल: लवकर पोट भरल्यासारखे वाटणे किंवा दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ मळमळ होणे.
स्तनांमध्ये बदल: गाठ जाणवणे, आकारात अचानक बदल, निपल मधून स्राव येणे किंवा त्वचेचा पोत बदलणे.
कॅन्सरचे लवकर निदान झाल्यास ते शरीरात पसरण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपचार करणे शक्य होते. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी आणि शरीरातील बदलांवर लक्ष ठेवल्यास अनेक जीव वाचवता येतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.