Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस झोपेच्‍या मोडमध्‍ये

Khari Kujbuj Political Satire: कुडतरी मतदारसंघाचे आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स यांनी मतदारसंघाचा विकास होण्‍यासाठी भाजप सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला होता.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेस झोपेच्‍या मोडमध्‍ये!

सध्‍या काँग्रेस पक्षाचे काय झाले आहे हे कळण्‍यास कठीण झाले आहे. याचे कारण म्‍हणजे, गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पार्टी या दोन्‍ही पक्षांनी जिल्‍हा पंचायत निवडणुकीच्‍या दृष्‍टीने पावले उचलण्‍यास सुरुवात केलेली असताना काँग्रेसच्‍या गोटात अजूनही सामसूम आहे. वास्‍तविक सासष्‍टी तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्‍ला असे समजले जात होते. मात्र सासष्‍टीतही या पक्षाने अजून काहीही हालचाली केलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे काँग्रेस पक्षाने या निवडणुकीतून अंग काढून घेतले तर नाही ना? असा प्रश्‍न सर्वांना पडू लागला आहे. जर सासष्‍टीतही काँग्रेस झोपेच्‍या मोडमध्‍ये गेल्‍यास बाकी ठिकाणी परिस्‍थिती भयानक होणार याची कल्‍पनाही न केलेली बरी. ∙∙∙

रेजिनाल्‍डची दुसरी वाट

कुडतरी मतदारसंघाचे आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स यांनी मतदारसंघाचा विकास होण्‍यासाठी भाजप सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला होता. ही जरी गोष्‍ट खरी असली तरी आता आगामी निवडणूक त्‍यांना जिंकायची असेल तर भाजपबरोबर राहून काही फायदा नाही, याची जाणीव रेजिनाल्‍ड यांनाही असावी. याच पार्श्‍वभूमीवर येणारी विधानसभा निवडणूक रेजिनाल्‍ड कुठल्‍या पक्षातर्फे लढणार असा प्रश्‍न विचारला जात आहे. दोन दिवसांपूर्वी रेजिनाल्‍ड यांचे खंदे समर्थक असलेले रायचे माजी सरपंच लुईस कायतान क्‍वॉद्रूश यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला. त्‍यामुळे आता रेजिनाल्‍डही गोवा फॉरवर्डमध्‍ये जाणार तर नाहीत ना? या चर्चेने जोर धरला आहे. कदाचित कायतान लुईसला आधी गोवा फॉरवर्डमध्‍ये पाठवून नंतर आपणही गोवा फॉरवर्डमध्‍ये जायचे असा त्‍यांचा बेत तर नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

सौंदर्यीकरण कशासाठी?

मडगाव व फातोर्डा शहरातील कचरा टाकण्याच्या जागा स्वच्छ करून तिथे सौंदर्यीकरण करण्याची मोहीम मडगाव नगरपालिकेने राबवली आहे. मात्र कचरा टाकण्याच्या जागा स्वच्छ केल्या व तिथे सौंदर्यीकरण केले, तर त्या जागा स्वच्छ राहणार का? स्वच्छ करणे हे चांगलेच पण व्यर्थ करून तिथे सौंदर्यीकरण कशासाठी? मासळी बाजार, झोपडपट्ट्या, नाले कितीही स्वच्छ केले व तिथे सौंदर्यीकरण केले तर त्या जागा स्वच्छ होतील का? असे असते तर भारतासह गोव्यातही कुठेच अस्वच्छता पसरली असती का? फातोर्डातील एसजीपीडीए मासळी मार्केटप्रमाणे करण्याचा प्रयत्न होता. पण आता त्याची झालेली दुरवस्था व दयनीय स्थिती पाहता येते का? मासळी विक्रीसाठी नवीन इमारत बांधली आहे त्याचा परिसर पहा. तिथे किती दुर्गंधी पसरली आहे. अशा जागा स्वच्छ ठेवण्यासाठी प्रथम नागरिक जागृत होणे आवश्यक आहे. कावळ्याला कितीही दुधाने आंघोळ घातली तर तो पांढरा होणार का? असा प्रश्न लोक आता विचारू लागले आहेत. ∙∙∙

काँग्रेस ‘आरजी’ला ‘हात’ देणार?

नगरनियोजन खात्‍याचा विषय आला, की माजी नगरनियोजनमंत्री तथा विद्यमान आमदार, गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांच्‍यावर सडकून टीका करणाऱ्या रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍सचे (आरजी) अध्‍यक्ष मनोज परब यांनी आपण युतीबाबत सरदेसाईंच्‍या गोवा फॉरवर्डसोबत चर्चा करीत असल्‍याचे जाहीर करून टाकले. अहंकार विसरून इतर पक्षांनीही युतीसाठी पुढे आले पाहिजे. युतीबाबत आपण काँग्रेससह इतर पक्षांसोबतही चर्चा करणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. विधानसभेच्‍या गत पावसाळी अधिवेशनात आमदार सरदेसाईंनी आरजीच्‍या पोगो विधेयकाचे समर्थन केले होते. तेव्‍हापासूनच हे दोन्‍ही पक्ष एकत्र येण्‍याचे संकेत मिळत होते. परंतु, प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस ‘पोगो’ला समर्थन देत आरजीला ‘हात’ देणार का? असा प्रश्‍‍न काँग्रेस मतदार विचारत आहेत. ∙∙∙

जबरदस्त वाहतूक कोंडी

माझे घर योजनेसाठी राज्यभरातील जनतेला येण्यासाठी सरकारने गावागावांतून बस सोडल्या तरी त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते असे कार्यक्रम संपल्यानंतर दिसले. कार्यक्रमानंतर घरी परतण्यासाठी सर्वांची घाई चालली होती. गोवा विद्यापीठ संकुलातून जाणारा मार्ग बांबोळीच्या गोमेकॉत जाण्यासाठीही वापरला जातो. इस्पितळात जाणारे या मार्गावरील वाहतूक कोंडीत अडकून पडले. कार्यक्रमस्थळ वगळता इतर रस्त्यावर वाहतूक पोलिस तैनात करावे लागतील याचा विचारच केला गेला नसल्याने एकमेकांना मागे टाकण्यासाठी शर्यतीत उतरलेल्या बस चालकांसमोर सारी व्यवस्था हतबल झाली होती. वाहने अडकून पडली होती. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत या रस्त्यावरून पुढे जाणे दिव्य ठरत होते. मुंगीच्या गतीनेही वाहतूक पुढे सरकत नसल्याचा अनुभव बराच काळ अनेकांनी घेतला. राज्यभरातून शेकडो वाहने आणण्याचे नियोजन झाले पण परतताना कोणी आधी कोणी नंतर जावे, चारचाक्या कशा जातील याचा विचार न केल्याने सारी व्यवस्था वाऱ्यावर सोडली गेली आणि त्याचा फटका या कार्यक्रमाशी संबंध नसलेल्यांना सहन करावा लागला. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; युरीला जोर का धक्का

दिगंबर काय बोलले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी कार्यक्रमाच्या मंचावर आले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत तेथे काही तरी त्यांच्याशी पुटपुटले. ते काय बोलले असावेत याची चर्चा नंतर कार्यक्रमस्थळीच नव्हे तर हे दृश्य दूरचित्रवाणी संच आणि मोबाईलवर पाहणाऱ्यांनी सुरू केली. कामत यांचा अलिकडेच मंत्रिमंडळ समावेश झाला आहे. त्यांना वजनदार खाती मिळाली की नाहीत याविषयी उलटसुलट मते आहेत. कामत यांनी त्यावर भाष्य केलेले नाही. तरीही शहा यांना त्यांनी काय सांगितले असावे. त्याचा संबंध कशाशी असावा. काही सेकंदात अशी कोणती गोष्ट ते सांगू शकतील याची केवळ कल्पनाच करणे सर्वांच्या हाती होते. मात्र कार्यक्रम संपल्यावरही कामत काय बोलले असावेत हा प्रश्न चर्चेत होता. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: "अमित शहा, या भाजपचे ढोंग पाहा", काँग्रेसचा गृहमंत्र्यांना संदेश; 'म्हजे घर' योजनेवर प्रश्नचिन्ह

पाटकरांचे भाजप, आपवर टीकास्त्र

काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष बदलण्‍याच्‍या चर्चा सुरू झाल्‍यानंतर विद्यमान प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर खाडकन जागे झाले. काँग्रेसही भाजपच्‍याच पावलावर पाऊल टाकून चालत असल्‍यामुळे केंद्रातून कधी कोणता निर्णय येईल, याची खात्री नाही. हे माहीत असल्‍यामुळेच अध्‍येमध्‍ये ‘गायब’ होणारे पाटकर आता पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. विविध गटांच्‍या बैठका घेण्‍यापासून ते सोशल मीडियाद्वारे भाजप, आपच्‍या नेत्‍यांवर टीकास्त्र सोडण्‍याचा, त्‍यांना आव्‍हान देण्‍याचा सपाटा त्‍यांनी लावला आहे. पण, त्‍यांच्‍या पक्षाच्‍या कार्यकर्त्यांत पाटकर जाणार की राहणार? याचीच चर्चा सुरू आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com