

येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी या पक्षांच्या प्रमुखांनी युतीचे संकेत दिले. त्यासंदर्भात शनिवारी त्यांच्यात बैठकही होणार होती. राज्यातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी बैठकीबाबत शनिवारी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना फोनही केला. पण, सरदेसाई युतीच्या निर्णयाआधीच जाहीर केलेल्या उमेदवाराच्या प्रचारसभेत व्यस्त होते. दुसरीकडे, युतीचा घटक होऊ पाहणाऱ्या आरजीपीचे अध्यक्ष मनोज परबही आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा दारोदारी जाऊन प्रचार करत होते. त्यामुळे शनिवारची बैठक रविवारवर गेल्याचे काँग्रेस पदाधिकारी सांगत आहेत. शनिवारच्या या प्रकारांमुळे युती नेमकी कुणाला नको? या प्रश्नाचे उत्तर भाजप विरोधी मतदार शोधत आहेत. याच उत्तर कदाचित उद्या किंवा परवा होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीनंतर मतदारांना समजेल, पण त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल!∙∙∙
केवळ एक उमेदवार निवडणुकीला उभा केला, म्हणून लोक त्याला मते देत नाहीत. लोकांची मते मिळवण्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करावी लागते. लोकांच्या घरोघरी भेट द्यावी लागते. गोवा हे लहान असल्याने प्रत्येकाला उमेदवाराने आपल्या घरी यावे, ही अपेक्षा असते. आपण तीनदा फातोर्डा मतदारसंघात निवडून आलो, तो आपल्या लोकसंपर्कामुळेच. आपला विरोधक किंवा आरएसएसचा माणूस याचा आपण कधी विचारच केला नाही, तरी त्यांच्याकडे मते मागण्यासाठी गेलो, असे विजयबाब सांगतात. मते मिळवण्यासाठी व्यवहार्यचातुर्य अत्यंत गरजेचे आहे व ते विजयबाबकडे आहे. मतासाठी प्रयत्न कमी पडता कामा नये, असेच विजयबाब आरजीच्या नेत्यांना पण सांगू इच्छित आहेत.∙∙∙
गोवा सरकारची ‘माझे घर’ ही योजना भाजफ सरकार पेक्षाही दोतोर मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची आहे. या योजनेमुळे विरोधकांची अडचण झाली आहे, पण आश्चर्य म्हणजे अन्य कोणी मंत्री वा नेता समर्थन करताना दिसत नाही. पण मुद्दा तो नाही. या योजनेला काहींनी न्यायालयात आव्हान दिले आहे. खंडपीठाने सरकारला नोटिसाही जारी केल्या आहेत. आणखी कोणी असता तर गडबडला असता पण दोतोरांवर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही की ते अजिबात विचलित झालेले नाहीत. पूर्वीपेक्षा जास्त पोटतिडकीने ते या योजनेचे समर्थन करत असल्याने योजनेला विरोध करणारे बुचकळ्यात पडलेले दिसत आहेत.∙∙∙
गेल्या आठवड्यात दक्षिण गोव्यात एकाहून अधिक अपहरणाच्या तक्रारी पोलिसात नोंदविल्या गेल्या. त्या सगळ्या अल्पवयीनांबाबत असल्याने सर्वसामान्यांमध्ये खळबळ माजली स्वाभाविक होते. प्रत्येक बाबतींत सरकारवर आगपाखड करणाऱ्यांना त्यामुळे एक चांगले निमित्त मिळाले. त्याचा त्यांनी पुरेपूर फायदाही घेतला. पण पोलिस यंत्रणेने त्वरित हालचाल करून सदर अल्पवयीनांचा शोध लावला. त्यांना परत आणून पालकांच्या स्वाधीन केले. ती मुले म्हणे पालकांनी मोबाईलच्या अतिवापराबद्दल पालक रागावल्याने घरांतून पळून बिहारात राहणाऱ्या आजोबांकडे गेली होती. पालकांना त्याचा अंदाज होता. पण त्यांनी सद्यःस्थिती न सांगता पोलिसांत अपहरणाची तक्रार नोंदवली. त्यामुळे अनेकांना कांगावा करण्यास निमित्त मिळाले हे खरे.∙∙∙
सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी खड्डा हा शब्द १५ दिवसांनी ऐकू येणार नाही, अशी हमी घेतली आहे. याआधीही राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या अनेक घोषणा झाल्या. राज्यात एकही खड्डा दिसणार नाही, हे वाक्यही चेष्टेचे ठरले. आता पाऊस थांबला आहे. पर्यटन हंगामानेही गती घेतली आहे. त्यामुळे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी यंत्रणा कामाला लागेल, अशी अपेक्षा आहे. त्यातच मंत्र्यांनी १५ दिवसांचा अवधी मागितला आहे. पण ते १५ दिवस कधीपासून सुरु होतात अशी खोचक विचारणा करण्याचा मोह, मात्र याआधीचा अनुभव लक्षात घेता आवरता येत नाही हेही तितकेच खरे!∙∙∙
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांना पणजीतील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आवाहन केले होते. त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की गोव्यातील सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. पावसाळा लांबल्यामुळे रस्त्यांची कामे खोळंबली. पावसापुढे कोणाचेही शहाणपण चालत नाही, आपलेसुद्धा नाही, असे ते म्हणाले. पण जनमानसात देवाचा माणूससुद्धा असे सांगतो म्हटल्यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. ∙∙∙
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर काणकोणात विजयी झालेल्या माजी उपसभापती तथा माजी आमदार इजिदोर फर्नांडिस यांना नुकताच काँग्रेससोबत युतीत असलेल्या गोवा फॉरवर्डने प्रवेश दिला. त्यामुळे काँग्रेस नेते नाराज असतानाच, इजिदोर यांच्या हक्काची ६ हजार मते जिल्हा पंचायत निवडणुकीतील फॉरवर्डचे पैंगीणमधील उमेदवार प्रशांत नाईक यांना मिळवण्यासाठीच त्यांना पक्षात प्रवेश दिल्याचे पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई सांगत आहेत. त्याचवेळी पक्षांतराला आपला विरोध असल्याचेही ते म्हणत आहे. पण, राजकारणातील ‘चाणाक्ष’ विजय यांनी हा ‘डाव’ आताच का टाकलाय? हे काणकोणातील मतदारांना समजल्याची चर्चा सध्या तेथे जोरात सुरू आहे.∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.