काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालविला होता. त्या बुलडोझरची देशभर चर्चा होती. भाजपशासित राज्यातील ही कारवाई अनेक बाबींनी गाजली, त्यावेळी कारवाईवर ‘योगींचा बुलडोझर’ असे म्हटले जात होते.
आता गोव्यातही अशाच ‘योगींच्या बुलडोझर’ची गरज आहे. सांतिनेजमधील अतिक्रमणधारकाने कोणत्याही परवानगीविना केलेल्या बांधकामाविषयी आमदाराची भीती दाखविण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.
सांतिनेजमधील अतिक्रमणावर ‘गोमन्तक’ने सतत आवाज उठविला आहे. सरकारी जमिनीवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून ठाण मांडलेल्या आणि निर्ढावलेल्या ‘त्या’ दुकानमालकाकडून आता आमदाराची भीती दाखविली जात आहे.
आपल्याला आमदारानेच सांगितले असून, कोण काय करतो ते पाहतो, असे त्या आमदाराने आपणास सांगितले आहे, असे तो सांगत आहे. त्यामुळे महापालिका त्यावर कारवाई करणार का? असा सवालही आता नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिका अधिकाऱ्यांनी या प्रभागांतील अभियंत्याकडून या बांधकामाविषयीची अहवाल मागविला आहे. अनेक ठिकाणी सरकारी जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. कोमुनिदादच्या जमिनीही बळकावल्या आहेत. राजकीय वरदहस्तामुळे सरकारी जमिनीवर झोपडपट्ट्याही फोफावल्या आहेत.
विशेष बाब म्हणजे सांतिनेजमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी ताब्यात घेतलेल्या जागेवरही निडरपणे आपला व्यवसाय कित्येक वर्षे करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. त्याशिवाय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जमिनीत बेकायदेशीरपणे हॉटेल उभे राहते, त्याकडेही येथील अभियंते सोयिस्करपणे डोळेझाक करतात. त्यामुळेच तर गोव्यात अतिक्रमणाविरोधात सतत रिव्होल्युशनरी गोवन्सवाले आवाज उठवत असतात, असे दिसते.
कारवाई अपेक्षित
भंगारअड्डे, लोकवस्ती, बेकायदा व्यवसाय असे प्रकार सरकारी जमिनीवर करण्याचे धाडस करणारे गोव्याबाहेरील लोक असले तरी त्यांना कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय काहीच घडणार नाही. सांतिनेजमधील बांधकामाची दखल महापालिकेने घेतलेली आहे. त्यामुळे या बेकायदेशीर बांधकामावर महापालिका कारवाई करेल, अशी चिन्हेही आहेत.
परवानगीविना उभारणी : स्मार्ट सिटीतर्फे रस्ते स्मार्ट रस्ते तयार केले जाणार आहेत. त्यात विवांता हॉटेल ते काकुलो मॉलपर्यंतचा रस्ताही स्मार्ट होणार आहे. त्यामुळे ती अतिक्रमणे हटतील, असे स्पष्ट असतानाही त्या व्यावसायिकांनी कोणतीही परवानगी न घेता दुकानांची नव्याने उभारणी केली आहे.
राज्यातील अशा सरकारी जागेवरील अतिक्रमणावर योगींच्या बुलडोझरची नक्कीच गरज आहे, असेच म्हणावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.