मडगाव: काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीला कंटाळून काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ आमदार व माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) काही काँग्रेस नेत्यांबरोबर तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश करणार अशा बातम्या असताना, माजी मंत्री मिकी पाशेको (Mickey Pashko) यांनी ‘असे कुचकामी म्हातारे पक्ष सोडून जात असतील तर पक्षासाठी ते चांगलेच’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
एका वेब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाशेको यांनी फालेरो यांचे नाव न घेता हे शरसंधान केले आहे. या मुलाखतीत त्यांनी म्हटले, मी कुणाचे नाव घेत नाही. मात्र ते कोण हे सर्वांना माहीत आहे. काँग्रेसमुळे हे लोक मंत्री आणि मुख्यमंत्री झाले, पण काँग्रेससाठी या नेत्यांनी कधी काही केले नाही. सध्या काँग्रेसची जी अधोगती झाली आहे त्याला हेच लोक कारणीभूत आहेत.
फालेरो यांनी आपण तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करणार की नाही याबाबत कसलीही स्पष्टता अजून दिलेली नाही. मात्र, अजून आपण तृणमूलच्या कुठल्याही नेत्याला भेटलेलो नाही असे म्हटले होते. या नव्या घडामोडीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिल्लीत धाव घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर पाशेको यांनी आज ही गरळ ओकली आहे. ते म्हणाले, काही जणांना सत्तेशिवाय राहता येत नाही. अशा माणसांनी नंतर पक्ष सोडण्याऐवजी आताच पक्षातून बाहेर पडलेले चांगले. मात्र त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे, सध्याचे जनमत काँग्रेस बरोबर आहे. त्यामुळे तृणमूल असो वा अन्य कुणी पक्ष. त्यांचा एकही आमदार जिंकून येणार नाही.
...तर युवा नेते येतील पक्षात
पाशेको यांना प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याकडे वेगळ्या अर्थाने पाहिले जाते. या मुलाखतीत पाशेको यांनी फालेरो यांच्यावर शाब्दिक हल्ला करताना, हे म्हातारे पक्षात असेपर्यंत आपल्याला संधी मिळणार नाही अशी युवा नेत्यांमध्ये भावना निर्माण झाल्याने काँग्रेसमध्ये कुणी येऊ पाहत नाही. जर हे म्हातारे जात असतील तर तरुण रक्ताचे कार्यकर्ते पक्षात येतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.