दिगंबर कामत नाराज का झाले ?

'गोव्यातील मीडियाला काही धरबंदच राहिलेला नाही'
Why was Digambar Kamat upset?
Why was Digambar Kamat upset?Dainik Gomantak

गोवा: दिगंबर भाजपात जात आहेत असे वृत्त गोव्यातील सगळ्याच प्रसार माध्यमांनी दिल्यानंतर एरव्ही मीडिया फ्रेंडली असलेले दिगंबर कामत भलतेच नाराज झाले आहेत. गोव्यातील मीडियाला काही धरबंदच राहिलेला नाही, ते काहींच्या काही ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवू लागले आहेत असे वक्तव्य त्यांनी काल प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारल्यावर काहीशा घुश्श्यातच केले. प्रसारमाध्यमांनाही आता प्रश्न पडू लागला आहे, अशा अफवा दिगंबर कामत यांच्या बाबतीतच का बरे उठतात? आहे का कुणाकडे उत्तर?

Why was Digambar Kamat upset?
दिगंबर कामत: माझा निर्णय कार्यकर्त्यांना माहीत आहे...

मंत्रिपदेही रोटेशन तत्त्वावर करा

निवडणुकीत अनपेक्षितपणे भाजपला वीस जागा मिळाल्या. तेवढ्याने भागले नाही म.गो. व अपक्षांनी पाठिंबा दिल्याने भाजपने निवांतपणे सरकार घडविले. त्यामुळे मुख्यमंत्री अन्य आठ जणांची सोय झाली. त्याशिवाय सभापती-उपसभापती म्हणून आणखी दोघे गेले. आणखी काहींना महामंडळे, पीडीए वगैरे मिळतील, तरीही अनेकजण कोणत्याही पदाविना राहतील. त्यामुळे त्यांना ही ना ती जबाबदारी द्यावी म्हणून अधूनमधून त्यांच्या समर्थकांकडून मागण्या होत राहतील. त्यावर चांगला उपाय म्हणजे अशांची पंचायत व पालिकांत रोटेशन तत्त्वावर सरपंच - नगराध्यक्ष निवडले जातात, त्याप्रमाणे मंत्री म्हणून वर्णी लावली तर समस्या सुटेल असे मत भाजपात व्यक्त होत आहे. आतापर्यंत गोव्यात अनेक प्रयोग केलेल्या भाजपने हाही प्रयोग करून पाहण्यात गैर काय आहे? ∙∙∙

सासष्टीला इशारा

मंत्रिमंडळाच्या विस्तारात खऱ्या वाटाण्याच्या अक्षता कोणाला मिळाल्या असतील, तर ते आहेत आलेक्स रेजिनाल्ड. हे रेजिनाल्ड गेले दोन महिने मंत्री असल्याच्याच थाटात वावरत होते. रेजिनाल्ड यांना भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून विरोध होत असल्याचे आम्ही छापले होते, तेव्हा तुम्हाला लवकरच काय ते कळून येईल, अशी मल्लिनाथी रेजिनाल्ड यांनी केली होती.

सासष्टी तालुक्याला गरजेपेक्षा अधिक महत्त्व देऊन पथ्यावर पडत नाही, असा अनुभव भाजपला आला आहे. पर्रीकर मंत्रिमंडळात पाच वर्षे नावेलीचे तत्कालीन आमदार आवेर्तान फुर्तादो यांना मंत्री बनवण्यात आले, परंतु फायदा झाला नाही. भाजप मंत्रिमंडळात अनेकवेळा फिलीप नेरी सदस्य होते, त्याचाही फायदा सासष्टीत झाला नाही. आता तर नावेलीमध्ये भाजपचाच आमदार आहे. त्यामुळे रेजिनाल्डला मंत्रिपद नाकारून भाजपने एक चांगलीच गुगली सासष्टीवर टाकली आहे. तुम्ही जर भाजपपासून फटकून वागत असाल, तर तुम्हीच पाहून घ्या, असाच स्पष्ट संदेश रेजिनाल्डला मंत्रिपद नाकारून भाजपने सासष्टीला दिला आहे.∙∙∙

मराठा साम्राज्य

गोवा मंत्रिमंडळात मराठा समाजाला 25 टक्के हिस्सा प्राप्त झाला आहे. त्यामुळे अनेकांनी डोळे उंचावले तर आश्‍चर्य वाटायला नको. वास्तविक 27 टक्के असलेल्या ओबीसीच्या वाट्याला फारसे काही हाताला लागलेले नाही. यावेळी पहिल्यांदाच मराठा समाजाचे 7 सदस्य गोव्यात जिंकून आले आहेत. भाजपमध्ये 20 पैकी 5 जण मराठा समाजाचे आहेत. काँग्रेसचे राजेश फळदेसाई व अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये हेसुद्धा याच समाजातील आहेत.

भाजपमध्ये विश्‍वजीत राणे पती-पत्नी, स्वत: प्रमोद सावंत, सुभाष फळदेसाई व उल्हास तुयेकर अशी ही गणना आहे. त्यामुळे मंत्रिपदी सुभाष फळदेसाई यांची वर्णी लागणार नाही, असाच कयास बांधण्यात आला होता. त्यामुळेच त्यांना उपसभापतिपद बहाल करण्यात आले होते. सूत्रांच्या मते, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एकाच सदस्याचा मंत्रिमंडळासाठी आग्रह धरला, ते आहेत सुभाष फळदेसाई. त्यामुळे आता फळदेसाईंना उपसभापतिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. उपसभापतिपद हे विधानसभा अधिवेशनातच निवडले जात असल्यामुळे पुढचे अधिवेशन येईपर्यंत हे पद रिक्त राहणार आहे. भाजपचे मुख्यमंत्री, दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री विश्‍वजीत हे तर मराठाच आहेत. ∙∙∙

रवी नाईक व काब्रालचे अर्थशास्त्र!

जेव्हा जगावेगळा विचार मांडला जातो, तेव्हा विचार मांडणारे एक तर वेडे ठरविले जातात किंवा ट्रोल केले जातात. पृथ्वी सपाट नाही गोल आहे असे सत्य सांगूनही पृथ्वीचे खरे स्वरूप दाखविणाऱ्या विद्वानाला यातना सहन कराव्या लागल्या होत्या. मंत्री रवी नाईक व नीलेश काब्राल यांनी अशीच जगावेगळी मात्र वैचारीक विधाने केली आणि त्यांना नेटीजनकडून टीकेचे धनी व्हावे लागले. जर आखाती देश इंधन निर्यात करून गब्बर बनू शकतात, तर भारत देश विशेष करून गोवा पाण्याची निर्यात का करू शकत नाही? रवीचा विचार वाईट नाही, मग त्यावर टीका का? नीलेश काब्राल म्हणतात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत म्हणून पर्यायी इलेक्ट्रिकल वाहने घ्या यात वाईट काय? नीलेश व रवी राजकारणी म्हणून त्यांच्यावर टीका करूच, पण त्यांच्या अर्थशास्त्रावर विचार करण्यात काय हरकत आहे. ∙∙∙

भंडारी समाजाचे राजकारण

गोवा हे तसे पाहिले, तर सर्व देशासाठी सर्वच बाबतीत चांगले उदाहरण आहे, पण राजकारणी त्यात खो घालण्याचा सतत प्रयत्न करताना आढळतात. दिल्लीच्या एका पक्षाने भंडारी मुख्यमंत्री देण्याची घोषणा केली व आपल्याच पायावर धोंडा घालून घेतला. या एकंदर प्रकरणात त्या समाजाचे नेतेही अडचणीत आले, पण तेवढ्यावरून शहाणे होण्याची त्यांची तयारी नसावी. अन्यथा त्यांनी मांद्रेहून निवडून आलेल्या आपल्या समाज बांधवाला मंत्री करावे अशी मागणी केली नसती. कारण दोघा समाजबांधवांना यापूर्वीच मंत्रिपद मिळालेले आहे अशी चर्चा आहे. आता आणखी मंत्रिपद देऊन इतर समाजावर भाजपने अन्याय करावा असे त्यांना वाटते का? ∙∙∙

‘आ बैल मुझे मार’

तळावली येथे लावलेले रवी नाईक, सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे यांचे पोस्टर फाडण्यात आले. हे काम मडकईचे आमदार व आता होऊ घातलेले मंत्री सुदिन ढवळीकरांच्या कार्यकर्त्यांकडून झाले असावे असा कयास व्यक्त होत आहे. असे झाल्यास तो ‘आ बैल मुझे मार’ यातलाच प्रकार ठरेल. आता सुदिन ढवळीकर मंत्री झाल्यावर त्यांचे कार्यकर्ते पोस्टर लावतील त्यालाही तोच न्याच मिळू शकतो. ती आगामी शीतयुध्दाची ‘नांदी’ही ठरू शकते. त्यामुळे जे काही झाले ते योग्य झाले नाही असाच सूर फोंडा व मडकईतील लोक व्यक्त करताना दिसायला लागले आहेत. त्यात परत सुदिन व इतर तिघेहीजण एकाच मंत्रिमंडळात असल्यामुळे या शीतयुध्दाचा परिणाम फोंड्याच्या विकासावर तर होणार नाही ना? अशी शक्यताही काहींना भेडसायला लागली आहे. ∙∙∙

रेजिनाल्ड यांना शेवटी ठेंगाच

‘भिवपाची गरज ना’ असे म्हणत राहिलेले कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांना मंत्रिपदाच्या नावे शेवटी ठेंगाच दाखविण्यात आला आहे. रेजिनाल्ड यांना आपण सासष्टीचा प्रतिनिधी म्हटल्यावर मंत्रिपद आपल्याकडे चालत येणार असे त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना वाटले होते. मात्र, भाजपला सासष्टीची फारशी गरज नाही हे आता स्पष्ट झाले आहे. रेजिनाल्ड यांचे समर्थक असलेले आश्विनीकुमार नाईक यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून हीच व्यथा व्यक्त केआहे. दोतोर कितीही मित्र असला तरी भाजपच्या राजकारणात मैत्री, दिलेला शब्द यांना फारसे महत्व नसते ते एव्हाना रेजिनाल्ड बाबांना कळलेही असेल. ∙∙∙

Why was Digambar Kamat upset?
'गोवा सरकारने ई-बाईकसाठीच्या अनुदानाचा तपशील द्यावा'

नव्या दरबार हॉलमध्ये शपथविधी

गोवा जरी छोटे राज्य असले तरी राजकारण मात्र मोठे चालते. 28 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भव्य-दिव्य शपथविधी समारंभ झाला, त्यावेळी भाजपच्या 8 मंत्र्यांनी तसेच मुख्यमंत्री मिळून एकूण 9 आमदारांचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला. आता उद्या तीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे तो देखील भव्य दिव्यच असेल. कारण राजभवनातील नव्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे उद्या जे मंत्री शपथ घेतील ते नव्या दरबार हॉलमध्ये शपथ घेणारे पहिले मंत्री ठरणार आहेत. ∙∙∙

महापालिका बजेटचा खेळखंडोबा

पणजी महापालिका बैठक म्हणजे नेहमीच गोंधळ गडबड तसेच आरोप - प्रत्यारोप अशी असली तरी अखेर त्याचा शेवट हा खेळमेळीत होतो. आज महापालिकेचे बजेट मांडण्यात आले. विरोधी गटातील माजी महापौर व नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो व उदय मडकईकर यांनी बजेटमधील त्रुटी दाखवत तावातावाने बोलण्यास सुरवात केली. त्यातच काही सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनीही तोंडसुख घेतले. आयुक्त आग्नेल फर्नांडिस मात्र चिडीचूप होते, तर महापौर मात्र हसण्याशिवाय काहीच बोलत नव्हते. पणजी महापालिकेचा १०१ कोटीचा बजेट अवघ्या दीड तासांत मांडण्यात येऊन त्याला मंजुरीही दिली. रोहित मोन्सेरात यांना हे बजेट कितपत समजून ते उत्तर देऊ शकतात हाच मोठा प्रश्‍न होता. त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर उत्तर न देता सुधारणा करू असे सांगत ही बैठक संपवली. बजेट मंजूर झाल्याचा ठराव घेण्याआधीच राष्ट्रगीत सुरू झाले व महापौरांनी या बजेट बैठकीतून सुटका करून घेतली. ∙∙∙

रेती समस्येचे नवे कोडे

गोव्यातील एकेक समस्या सुटण्याचे नाव घेत नाही. खाणी बंद होऊन दशक उलटले, पण त्या सुरू करायचे नाव घेतले जात नाही. तसेच रेतीचेही आहे. सरकार रेती उत्खनन कायदेशीर करण्यासाठी पावले उचलत नाही. त्यामुळे बेकायदा रेती उत्खननाला प्रोत्साहन मिळत असून त्यात राजकारणी व त्यांचे हस्तक असल्याचा आरोप होत आहे. तेवढ्याने भागत नाही, तर उत्खनन परवाना मुदत संपल्यावर त्याचे नूतनीकरण होत नाही, तर बेकायदा माल गळ्यात बांधला जातो. रेती उत्खननही खाण खात्याच्या अखत्यारीत येते हेच तर त्या मागील कारण नव्हे? ∙∙∙

सुभाष समर्थक खूष झाले!

जे नशिबात असते ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असे म्हणतात. सांगे मतदारसंघाचे आमदार व विद्यमान उपसभापती सुभाष फळदेसाई हे तसे धाडसी, कष्टाळू व नशीबवान आमदार. मराठा समाजातून आलेल्या सुभाष यांनी एसटी मतदारसंघात विजयाचा झेंडा रोवला. सुभाष यांच्या मतदारसंघात त्यांना पाडण्यासाठी धनाचा पाऊस पडला, तरी सुभाष यांनी विजय हासिल केलाच. आता सुभाष यांना मंत्रिपद मिळणार अशी बातमी पसरल्यामुळे सांगेकर खूष आहेत. सांगेला अभावानेच मंत्रिपद मिळते. सुभाष यांच्या मंत्रिपदाची बातमी खरी ठरो अशी कामना सांगेकर करीत आहेत. ∙∙∙

सुदिनांचा उजाडला सु-दिन

मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकरांना आजचा दिवस सु-दिन ठरणार आहे. कारण हो ना करत त्यांचा अखेर मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. मंत्री रवी नाईक, गोविंद गावडे व भाजपच्या गोटातील काही आमदारांचा सुदिन ढवळीकरांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यास विरोध होता. भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे त्याचप्रमाणे अपक्ष आमदारांचा पाठिंबा देखील आहे. त्यामुळे सुदिन ढवळीकरांमुळे काही अडत नाही अशी चर्चा सुरू होता, परंतु यावर मात करत सुदिन ढवळीकरांनी मंत्रिमंडळात प्रवेश मिळवलाच. त्यामुळे आता फोंडा तालुक्याला चार मंत्री मिळण्याचे भाग्य लाभले आहे. ∙∙∙

Why was Digambar Kamat upset?
गोव्यात खाण काम बंदीचा एक बळी

ट्रोजनचा गिरीशवर निशाणा

भाजपमध्ये जाणार का? हा प्रश्न परत परत विचारला जात असल्यामुळे काल दिगंबर कामत भडकले. ती बातमी ऑनलाइन माध्यमातून प्रसिद्धही झाली. त्यावर पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी अफलातून ट्विट केले आहे. प्रसारमध्यमांवर कामत उगीच भडकले, ते तर कामत यांच्यावर गिरीशमुळे जी आपत्ती आली आहे तिच्यामुळे त्यांची घुसमट तर झाली नाही ना हे पाहात होते असे म्हटले आहे. ट्रोजनने हे ट्विट करताना एका दगडात दोन पक्षी मारले आहेत असे म्हणायचे. गिरीशवर जरा जास्तच खार खाऊन असलेल्या ट्रोजन यांनी एका ऑडीओतून गिरीश पैसे खात असल्याचा आरोप करीत नंतर हा ऑडीओच बनावट अशी भूमिका घेतली होती. हे सर्वांना माहीत असेलच म्हणा! ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com