मिलिंद म्हाडगुत
फोंड्यात मतदान संपल्यावर समिश्र वातावरण दिसत होते. नगरपालिकेचे प्रभाग हे साधारण हजार लोकसंख्येच्या आसपास असल्यामुळे मतदान चांगले होणे हे साहजिकच आहे. त्यात परत मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यातही उमेदवारांचे कार्यकर्ते वा नातेवाईक मशगुल दिसत होते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली. पण तरीही गेल्या काही पालिका निवडणुकांसारखा यावेळी उत्साह दिसत नव्हता. त्याचे पर्यावसान काही प्रभागांत मतदान कमी होण्यात झाले.
बुथवर मतदारांची विभागणी करून मतदानाची सोय केल्यामुळे पूर्वीसारख्या मोठ्या-मोठ्या रांगा ही दिसत नव्हत्या. त्यामुळे यावेळी अगदी शिस्तीत मतदान झाल्याचे दृश्य दिसत होते. मात्र, काही कार्यकर्ते फोंड्यातील वाहतुकीची वर्दळ असलेल्या रस्त्यावर टेबल मांडून बसल्यामुळे काही प्रभागांत वाहतुकीला अडथळा येताना दिसत होता. असे असले तरी शांततापूर्वक मतदान झाले असेच म्हणावे लागेल.
बाचाबाची वा तू तू मै मैचे प्रकार अभावानेच आढळले. आता मतदान झाल्यामुळे रिंगणात असलेल्या 43 उमेदवारांचे भवितव्य पेटीत सीलबंद झाले आहे. त्यामुळे आता नजरा लागल्या आहेत त्या उद्या होणाऱ्या निकालकडे. जरी निकाल उद्या असला तरी कोण जिंकणार आणि कोण हरणार याचे आराखडे मतदान संपल्यावरच बांधले जात होते.
काही उमेदवारांनी तर आपला विजय गृहीत धरून टाकलेला दिसत होता. मतदार राजाही आता धूर्त झाला असून आपण कोणाच्या बाजूने आहोत याचा तो थांगपत्तासुद्धा लागू देत नसल्याचे दिसत होते.
मतदानावर नेत्यांचे लक्ष
फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, रायझिंग फोंडाचे नेते डॉ. केतन भाटीकर, काँग्रेस नेते राजेश वेरेकर हे मतदान केंद्रावर फिरून मतदानाचा आढावा घेताना दिसत होते. राजेश वेरेकर तर प्रभाग ११ व १२ चे मतदान केंद्र असलेल्या सेंट मेरी स्कूलकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठाण मांडून बसल्याचे दिसत होते.
नातेवाईकांत चुरस
१ यावेळी प्रथमच जवळच्या नातेवाईकांत चुरस लागल्याचे दृश्य दिसत होते. याबाबत सर्वात जास्त प्रभाग १० चर्चेत होता. इथे विद्यमान नगरसेवक शांताराम कोलवेकर यांची पत्नी दीपा या भाजप पॅनेलतर्फे रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधात असलेल्या रायझिंग फोंडाच्या मनस्वी मामलेदार यांना पाठिंबा देत आहेत.
शांताराम यांचे चुलत बंधू तथा गेल्या दोन निवडणुकीतील त्यांचे प्रचार प्रमुख गौरेश कोलवेकर. एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेल्या या दोन बंधूंची चर्चा प्रभाग 10च्या दुर्गा भाट येथील मतदान केंद्रावर सुरू होती. या प्रभागात 76% मतदान झाल्यामुळे अटीतटीची लढत झाल्याचे संकेत मिळत आहेत.
२ प्रभाग ४ मध्ये विद्यमान नगरसेवक व्यंकटेश नाईक यांना आपलीच भावजय नगरसेविका चंद्रकला नाईक यांच्याशी सामना करावा लागत असल्यामुळे तोही एक चर्चेचा विषय बनलेला दिसत होता.
प्रभाग ५मध्ये नगराध्यक्ष रितेश नाईक यांना त्यांचे नातेवाईक श्रवण नाईक हे आव्हान देत असल्यामुळे तोही एक कुतूहलाचा विषय बनला होता. अशाप्रकारे नातेवाईकच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाणकार सांगत होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.