Goa Congress: मांद्रे मतदारसंघात यंदा प्रथमच कॉंग्रेसचा उमेदवार असणार नाही. हा मतदारसंघ कॉंग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षाला देऊन एक मोठा तीरच मारला आहे. 1963 पासून विचार केल्यास मांद्रेत (Madrem) कॉंग्रेस उमेदवार नसण्याची ही पहिलीच वेळ.
मागच्या खेपेला कॉंग्रेसचे दयानंद सोपटे (Dayanand Sopate) यांनी माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा 7114 मतांनी पराभव केला होता. एखाद्या विद्यमान मुख्यमंत्र्याचा एवढा दारूण पराभव करण्याची ही पहिलीच वेळ असावी. कॉंग्रेसला (Congress) या मतदारसंघात एवढा मोठा विजय पूर्वी कधीच प्राप्त झाला नव्हता. त्यामुळे सोपटे ‘जाईंट किलर’ ठरले होते. पण 2019 साली सोपटेंनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यामुळे समीकरणे बदलली होती. बरेच कॉंग्रेस कार्यकर्ते सोपटेंसोबत भाजपकडे वळले होते. खरे तर पार्सेकरांचे या पराभवाची परतफेड करण्याचे मोठे स्वप्न होते. पण सोपटेंच्या भाजप प्रवेशामुळे या स्वप्नावर पाणी पडले.
2019 सालच्या पोटनिवडणुकीत पार्सेकरांना उमेदवारी दिली नाही आणि आताही त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. सोपटे-पार्सेकरांच्या संघर्षात कॉंग्रेस मात्र मागच्या बाकावर पोहचली आहे. 2019 साली झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे बाबी बागकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यावेळी लढत झाली ती सोपटे आणि अपक्ष जीत आरोलकर यांच्यामध्ये. आता जीत आरोलकर मगोपमध्ये गेले असून त्यांनी तेथे बराच नेट धरलेला दिसत आहे. त्यामुळे आताही येथे भाजप-मगोमध्ये लढत होईल, अशी चिन्हे दिसताहेत. पण यात कॉंग्रेस कोठेच दिसत नाही. त्यातच ‘रात्र थोडी आणि सोंगे फार’ या उक्तीप्रमाणे उमेदवारी एक आणि इच्छुक अनेक असे चित्र मांद्रेत दिसत होते. एकाला उमेदवारी दिली तर दुसरा बंड करेल, अशी भीती कॉंग्रेस श्रेष्ठींना वाटत असावी. कदाचित प्रत्यक्षात ते बंडात उतरले नसले तरी अप्रत्यक्षपणे ते विरोधकांशी हातमिळवणी करतील, अशी भीती कॉंग्रेसला वाटत असावी. हे सर्व गृहीत धरून कॉंग्रेसने आपल्या उमेदवारीचे बलिदान केले असावे. त्यामुळे हाताचा घात हा हाताच्या लोकांनीच केला आहे, असेच म्हणावे लागेल. पण त्यातून एक महत्त्वाचा मतदारसंघ कॉंग्रेसच्या हातातून निसटला आहे.
रमाकांत खलपांची पुन्हा उपेक्षा
खलपांची (Ramakant Khalap) कॉंग्रेसमधील उपेक्षा तर मागच्या पानावरून पुढे सुरूच आहे. माजी केंद्रीय मंत्री तसेच एकेकाळी मगोपचे सर्वेसर्वा असलेल्या खलपांची कॉंग्रेसमध्ये सुरू असलेली उपेक्षा ही खरोखरच धक्कादायक अशीच आहे. मगो पक्ष सोडलेले कधीच यशस्वी झालेले नाहीत, हे सुदिन ढवळीकरांचे उद्गार खलपांबाबत तंतोतंत खरे होताना दिसताहेत. आता खलप या कॉंग्रेसच्या उमेदवारीच्या बलिदानाला कसे प्रतिसाद देतात, का मूग गिळून गप्प बसतात तसेच इतर कॉंग्रेस कार्यकर्ते कोणती पावले उचलतात, याची उत्तरे येत्या काही दिवसांतच मिळणार आहेत, हे निश्चित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.