सरकारकडून मदतीचा हात कधी मिळणार? पूरग्रस्तांना प्रतीक्षा

गोव्यातील पूरग्रस्तांसमोर नानाविध समस्यांचे संकट, अजूनही भीतीच्या छायेखाली
गोव्यातील पूरग्रस्तांची पडलेली घरे
गोव्यातील पूरग्रस्तांची पडलेली घरेDainik Gomantak

डिचोली: पुराचा (Flood) तडाखा बसून वीस दिवस उलटलेत, मात्र पूरग्रस्त अद्यापही त्या तडाख्यातून पूर्णपणे सावरलेले नाहीत. पूरग्रस्तांना अद्याप सरकारी (Goa Government) मदतीचा हात मिळालेला नाही, की लवकर मिळण्याची आशाही वाटत नाही. त्यामुळे पूरग्रस्तांसमोरील समस्या वाढल्या असून, सरकारकडून नुकसान भरपाई कधी मिळणार, त्याकडे पूरग्रस्तांचे डोळे लागून राहिले आहेत. हातावर पोट असलेल्या काही कुटुंबासमोर तर मोठे संकट उभे ठाकले आहे. दुसऱ्याबाजूने जोरदार पाऊस (Rain) पडला की भीतीने काळीज धडधडायला लागते. असे पुराचा तडाखा बसलेल्या सारमानस-पिळगाव येथील मंगला उसपकर आणि नलिता कवळेकर या पूरग्रस्त गरीब महिलांनी सांगितले. (When will flood victims in Goa get help from government)

संततधारच्या अतिवृष्टीमुळे मागील 23 जुलै रोजी डिचोलीतील साळ, हरवळे, कारापूर, सारमानस आदी भागात पुराने तडाखा दिला. घरादारांनी पुराचे पाणी घुसल्याने मोठा हा:हाकार माजला. काही घरांची पडझड होतानाच, घरातील कडधान्य आदी सामनाची नासधूस झाली. शेती बागायतींचीही नासधूस झाली. काही पूरग्रस्तांना सामाजिक संस्थांकडून किरकोळ मदत वगळता, सरकारकडून तातडीने आर्थिक मदत मिळालेली नाही.

गोव्यातील पूरग्रस्तांची पडलेली घरे
Goa: सरकारने मांद्रे नदीचे काम हाती घ्यावे

घरादारांमध्ये पाणी

मांडवी नदीकाठी वसलेल्या सारमानस भागातही पुराचा तडाखा बसला. सारमानस येथील मंगला उसपकर आणि नलिता कवळेकर या दोन गरीब विधवा महिलांच्या घरातही पुराचे पाणी घुसून अर्धीअधिक घरे पाण्याखाली गेली. घरे शाबूत राहिली, तरी पावसाळ्यासाठी 'पुरुमेंत' केलेल्या सामना ची नाशाडी झाली. त्यामुळे हातावर पोट असलेल्या या कुटुंबांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पुरानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आमदार प्रवीण झांट्ये आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त सारमानस भागाची पाहणी केलीय. सरकारी अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा अहवाल तयार केला आहे. मात्र अद्याप भरपाई हाती पडलेली नाही. सेझा कंपनी आणि स्थानिक पंचायतीकडून किरकोळ कडधान्य वगळता, अन्य कोणतीच मदत मिळालेली नाही. घरात चूल तर पेटलीच पाहिजे. त्यामुळे आता आम्ही पुन्हा पोटामागे जात आहोत. असेही या महिलांनी सांगितले.

गोव्यातील पूरग्रस्तांची पडलेली घरे
Goa: अजूनही शेजाऱ्यांच्‍या घरातूनच चालतो संसार

डिचोलीत 1.43 कोटींचे नुकसान

पुराच्या तडाख्यात डिचोली तालुक्यात घरे आणि शेती-बागायतींचे मिळून एक कोटी 43 लाख 68 हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अहवाल उत्तर गोवा जिल्हाधिकारी प्रशासकीय यंत्रणेकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत नुकसान भरपाई देण्याचे सरकारने जाहीर केल्याने पूरग्रस्तांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

374 घरांना फटका

डिचोली तालुक्यातील साळ, हरवळेसह पिळगाव, आमोणे आदी अनेक भागात पुराचा तडाखा बसला होता. सुपाची कोंड-हरवळे साळ आदी काही गावांना तर पुराने वेढा दिला होता. पुराच्या तडाख्यात हरवळेसह अन्य भागात घरांची पडझड झाली आहे. तालुक्यात एकूण 374 घरांना पुराची झळ बसली. त्यात सगळ्यात जास्त आमोणे येथे 101 तर सुर्ला येथे 74 घरांचा समावेश आहे. पुराचा 1 हजार 735 जणांना फटका बसला. पुराच्या वेढ्यात अडकलेल्या हरवळे, सारमानस, भामई आदी भागातील 40 जणांची बचाव पथकाने सुरक्षितपणे सुटका करण्यात यश मिळवले.

आम्हाला सावरा

घरात पावसाचा 'पुरुमेंत' केला होता. पुराचे पाणी घरात शिरल्याने घरातील कडधान्य आणि इतर सामनाची वाताहात लागली. अजूनही त्यामुळे भीती वाटतं आहे. पूर आल्यानंतर शुक्रवारी रात्रीच आपण मुलांसह जवळच माठवाडा येथे माहेरी धाव घेतली. त्यारात्री त्याठिकाणी आसरा घेतला. सरकारने आम्हाला त्वरित मदत करून आम्हाला सावरावे.

-नलिता कवळेकर, गृहिणी, सारमानस.

सामान मातीमोल

जीएमसींत डॉक्टरकडे जाण्यासाठी शुक्रवारी सकाळी आपण घराबाहेर पडले. सारमानस गावाबाहेर पडण्याआधीच घरात पाणी भरल्याची खबर मिळाली. घराकडे धाव घेतली. तोपर्यंत पाणी घरात खेळत होते. सामान बाहेर काढण्याचीही फुरसत नव्हती. पाण्यात घरातील कडधान्य आदी सामान मातीमोल झालेय. कपाळावर हात मारून घरातील चिखल साफ करावा लागला. साफसफाई करताना घरात मोठा सापही आढळून आला. अजूनही घराभोवती साप नजरेला पडत आहेत. पुरानंतर डिचोलीच्या मामलेदारांनी आमचे पिळगावच्या सहकारी सोसायटी सभागृहात स्थलांतर केले. पोटापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

-मंगला उसपकर, गृहिणी, सारमानस.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com