
पणजी: वरचेवर होणाऱ्या हवामान बदलामुळे नागरिक हैराण झाले झाले आहेत. पहाटेच्या वेळी थंडी तर दुपारी असह्य उकाडा जाणवत आहे. परिणामी डोकेदुखी, सर्दी, ताप आदी आजारांनी डोके वर काढले आहे. दरम्यान, सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. डिचोली येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयात पेपर लिहिताना आज एका विद्यार्थ्याला अचानक भोवळ आल्यामुळे तेथे तारांबळ उडाली. वाढत्या तापमानामुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात आज कमाल ३४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली, जी सामान्य तापमानाच्या तुलनेत १.५ टक्क्यांनी अधिक आहे. किमान तापमानही मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. राजधानी पणजीत २२.४ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान होते, जे सरासरीच्या तुलनेत २.१ अंशांनी अधिक होते.
मागील काही दिवसांपासून दुपारी मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही थंडीचा जोर मंदावला असला तरी पहाटेच्या वेळी थंडी जाणवत आहे. पुढील ४८ तासांत राज्यात कमाल ३४ तर किमान २२ अंश सेल्सिअस तापमानाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच पहाटे काही प्रमाणात धुके व दव पडू शकतो.
डिचोली येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयात आज पेपर लिहिताना एका विद्यार्थ्याला भोवळ आली. त्याने आपला अर्धाअधिक पेपर लिहिला होता. विद्यार्थ्याला भोवळ येताच परीक्षा नियंत्रक तसेच पर्यवेक्षकांनी धावपळ करून १०८ रुग्णवाहिका मागवली. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली. नंतर या विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिका सोडविली. दरम्यान, या घटनेचा अन्य विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती परीक्षा केंद्रातून मिळाली.
राज्यातच नव्हे तर देशातच हवामानबदलांचा परिणाम जाणवू लागला आहे. गोव्यासह दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दिवसा प्रचंड उष्णता व रात्री थंडी जाणवत आहे. येत्या काही दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये आणखी हवामानबदल होतील, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.