

डिचोली: दोन दिवसांपूर्वीच येथील मुस्लिमवाडा परिसरात फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती होते न होते, तोच आज रविवारी कारापूर येथे जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. डिचोली-साखळी मुख्य रस्त्यावरील कुळण-कारापूर परिसरात ट्रकच्या धडकेने ही जलवाहिनी फुटली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अकराच्या सुमारास डिचोलीहून साखळीच्या दिशेने जाणारा एक अवजड ट्रक कुळण येथील वळणाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला गेला. त्यावेळी रस्त्यालगत असलेल्या जलवाहिनीला ट्रकची जोरदार धडक बसली. या धडकेमुळे जलवाहिनी फुटली आणि त्यातून पाण्याचा प्रचंड लोट बाहेर पडला. मोठ्या दाबाने पाणी रस्त्यावर आणि आसपासच्या परिसरात वाहू लागले.
त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले.विशेष म्हणजे, अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळी न थांबता वाहनासह पळ काढला. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जलवाहिनी फुटल्यानंतर दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू झाले नव्हते. परिणामी कारापूरसह आसपासच्या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला.
अनेक घरांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध न झाल्याने नागरिकांची, विशेषतः गृहिणींची गैरसोय झाली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टंचाई जाणवत असताना अशा प्रकारे हजारो लिटर पाणी वाया गेल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
डिचोलीतील मुस्लिमवाडा परिसरात दोन दिवसांपूर्वीच जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्ती करून परिस्थिती पूर्ववत केली होती. मात्र त्यानंतर लगेचच कारापूर येथे घडलेल्या नव्या घटनेमुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर पुन्हा ताण निर्माण झाला आहे.
जलवाहिनी फुटल्यानंतर बराच वेळ पाणी रस्त्यावरून वाहत राहिल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. एकीकडे अनेक भागांत पाण्याची कमतरता जाणवत असताना अशा निष्काळजीपणामुळे पाणी वाया जात असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच अपघात घडवून पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेऊन नुकसान भरपाई वसूल करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.