
पणजी: गोमंतकीयांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. कुणाला एक तास, कुणाला दोन तास तर कुणाला दिवसभरातही पाणी मिळत नाही. हे चित्र खुद्द जलसंपदा मंत्र्यांच्या मतदारसंघात दिसत आहे, जो चिंतेचा विषय आहे, अशा कठोर शब्दांत दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली.
फर्नांडिस म्हणाले, की दक्षिण गोव्याचा खासदार असलो तरी संपूर्ण गोव्याचे प्रश्न मांडणे हे माझे कर्तव्य आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी मी लढणार आहे. आज मी सार्वजनिक बांधकाम खात्याला भेट देऊन मुख्य अभियंत्यांशी चर्चा केली. त्यांनी माझ्याकडे पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली आहे. आठ दिवसांनंतर मी पुन्हा आढावा घेईन, असेही त्यांनी सांगितले.
कॅप्टन फर्नांडिस यांनी सरकारच्या पाणीपुरवठा धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, पाणी नाही; पण बंगले मात्र उभे राहतात. स्विमिंग पूल बांधण्यासाठी परवानग्या दिल्या जातात. निवडणुकीच्या आधी सरकारने मोफत पाणी देण्याची योजना जाहीर केली होती. मात्र, आज प्रत्यक्षात लोकांना पाणी मिळत नाही. हे सरकार निवडणुकीपुरतीच योजना जाहीर करते आणि नंतर जनतेला पूर्णपणे विसरते, असा आरोप करताना त्यांनी पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर अशाच प्रकारच्या घोषणा दिल्या जाण्याचा इशारा दिला.
ताळगावातील सेंट पॉल येथील मॉडेल्स संकुलामध्ये १० वर्षांपूर्वी मुबलक पाणीपुरवठा होत होता. मात्र, आता दिवसाला एक तासही पाणी मिळत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना पाण्याचे टँकर विकत घेण्याची वेळ आली आहे.
सांताक्रुझ मतदारसंघात तीन दशकांपूर्वी घातलेली जलवाहिनी बदललेली नाही. या भागात पाण्याची टाकीही नाही. त्यामुळे पाण्याचा दाबही कमी असतो. दररोज एकच तास पाणी सोडले जाते. मात्र, त्याचा दाब इतका कमी असतो, की या भागातील संकुलांना पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. स्थानिक आमदारांनी या वाहिनी बदलण्यासंदर्भात विधानसभेत आवाज उठविला होता, तेव्हा संबंधित मंत्र्यांनी आश्वासन देऊन दोन वर्षे उलटली तरी त्यात सुधारणा झालेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.