

पणजी: फोंडा पोटनिवडणुकीची उमेदवारी न मिळाल्याने माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते विश्वनाथ दळवी यांची नाराजी कायम आहे. पुढील चर्चेसाठी ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतीक्षा करीत आहेत.
दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस-फॉरवर्ड युतीत दरी निर्माण झाल्याने त्याचा उमेदवारांच्या प्रचारावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माजी मंत्री तथा फोंड्याचे माजी आमदार रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या फोंडा विधानसभा मतदारसंघात येत्या ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून स्वत:ला उमेदवारी मिळेल, असा ठाम विश्वास विश्वनाथ दळवी यांना होता. परंतु, भाजपने ही उमेदवारी रवी नाईक यांचे ज्येष्ठ सुपूत्र रितेश नाईक यांना बहाल केली.
या निर्णयामुळे विश्वनाथ दळवींच्या कार्यकर्त्यांनी निराश होत त्यांच्या घरासमोर गर्दी केलेली होती. तर, पक्षाच्या या निर्णयामुळे आपल्याला धक्का बसला असून, पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याची भावना दळवी यांनी बोलून दाखवली. या नाट्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दळवी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. तरीही दळवींची नाराजी संपलेली नसल्याचे समोर आले आहे.
फोंडा पोटनिवडणुकीतील उमेदवारीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी आपली चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्यात परतल्यानंतर ते आपल्याशी चर्चा करतील असे नाईक यांनी आपल्याला सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करू, असे विश्वनाथ दळवी यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस आमदार युरी आलेमाव यांनी काँग्रेससोबत युतीत असलेल्या गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्यावर केलेल्या टीकेमुळे गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी, कार्यकर्ते खवळले आहेत. फॉरवर्डचे संघटन सरचिटणीस दुर्गादास कामत यांनीही शनिवारी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात युरी आलेमाव यांच्यावर टीकेची झोड उठवली. याबाबतची तक्रारही त्यांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे या दोन पक्षांतील दरी अधिकच रुंदावली आहे. त्यावर प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर आणि प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर काय निर्णय घेणार, याकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.