पाळी : प्रियोळ मतदारसंघासह फोंड्यातील कुर्टीतील काही भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या खांडेपार नदीवरील बंधाऱ्याला मुर्डी - खांडेपार तसेच सोनारबाग - उसगाव येथील रहिवाशांनी तीव्र विरोध केला असून कोणत्याही स्थितीत हा बंधारा होणार नाही,
असे ठामपणे त्यांनी सांगितले आहे. गेले वर्षभर जलस्त्रोत खात्याकडून बंधाऱ्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र मुर्डी - खांडेपार आणि सोनारबाग - उसगाव दरम्यान हा बंधारा नको, असे स्थानिकांनी म्हटले आहे.
मुर्डी - खांडेपार ते सोनारबाग - उसगाव दरम्यान, पाणी साठवून ठेवण्यासाठी जलस्त्रोत खात्याने माती परीक्षण केले होते. राज्यात बऱ्याच ठिकाणी ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई होते, त्यामुळे अनेक ठिकाणी बंधारे बांधण्याचे नियोजन जलस्त्रोत खात्याने केले आहे.
या नियोजनानुसार खांडेपार - उसगावचा हा बंधारा सुमारे ८८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार असून या बंधारा प्रकल्पाचे कंत्राटही गोव्याबाहेरील एका कंपनीला देण्यात आले आहे.
या कंत्राटानुसार आता काम सुरू करण्यासाठी संबंधित कंपनीने पुढाकार घेतल्यानंतर हा विरोधाचा विषय तीव्रतेने समोर आला आहे. त्यामुळे हा बंधारा आता होईल की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जलस्त्रोत खात्याने खांडेपार तसेच उसगावच्या या बंधारा बांधण्याच्या कामी जनसुनावणी घेतली होती. गेल्या मेमध्ये या जनसुनावणीवेळी मुर्डी - खांडेपार आणि सोनारबाग - उसगावच्या लोकांनी तीव्र विरोध केला होता.
जलस्त्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी लोकांच्या शंकांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, पण महापुराचे काय, तुम्ही काय हमी देणार, असा प्रती प्रश्न स्थानिकांनी विचारल्यामुळे ही जनसुनावणी गुंडाळली होती.
बंधारा नसताना अनुभवला पूर!
दोन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये राज्यात महापूर आला होता. या महापुराचा फटका मुर्डी तसेच सोनारबाग, उसगाव आणि पाळी भागातील काही नदीकिनारी गावांना बसला होता. या महापुरात मुर्डी भागातील तीन घरे कोसळली होती,
तर अनेक घरांत पाणी घुसून सामानाची नासाडी झाली होती. उसगावात तसेच पाळीच्या भामई, रुमड, चावडी, कुंभारवाडा व इतर भागातील काही घरे कोसळल्याने मोठी हानी झाली होती. बंधारा नसताना जर एवढा महापूर येऊ शकतो, तर उद्या बंधारा बांधल्यानंतर काय करायचे, असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे.
बंधारे हवेतच !
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीतील एका कार्यक्रमात नदीवरील बंधारे महत्त्वाचे असून पाणी टंचाई सोडवण्यासाठी बंधारे बांधण्यासाठी सरकार आग्रही असल्याचे म्हटले आहे. बंधाऱ्यांना विरोध केला तर तो मोडून काढण्यात येईल, असा इशाराही दिला होता. त्यामुळे आता मुर्डी - खांडेपार व सोनारबाग - उसगावच्या बंधाऱ्याचे काय, असे प्रश्न उद्भवले आहे. तरीही महापुराचा धोका असल्याने दोन्ही गावच्या लोकांनी ठामपणे विरोध केला आहे.
राज्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जलस्त्रोत खात्याने प्रत्येकवेळी नियोजन केले आहे, वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज वाढत आहे, अशावेळी नदींवर बंधारे बांधून ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. जलस्त्रोत खात्याने त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही केली असून लोकांच्या समस्या जाणून घेऊनच,असे निर्णय घेतले जातात.
सुभाष शिरोडकर, जलस्त्रोत मंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.