

माझा जन्म, माझे बालपण ज्या गावात मी खर्या अर्थाने जगले तो सोन्यासारखा गाव म्हणजे सत्तरी तालुक्यातील सोनाळ. गावाच्या कडेकडेने वाहणारी नदी. नदीच्या काठावर वसलेली शेते-भाते, कुळागरे, वेळूची बने, काजू, आंबे, फणस इत्यादी इत्यादी तिच्या मायेच्या पंखाखाली पोसलेली.
सदाहरित जमीन, थंडगार वारा, झुळझुळ वाहणारे झरे, व्हाळ, ओहळ आणि कौलारू घरे. घरासमोर शेणाने सारवलेली अंगणे. गोठ्यात गुरे-वासरे, अंगणात कुत्री, मांजरे. झाडावर सुंदर पक्षी, झाडांच्या ढोलीतून सरडे, चान्या, कधी कधी चुकून एखादा सापही असे.
पण कधी कुणाला भीती नाही वाटली. सगळीकडे पायी चालत जाता जाता वाटेत भेटणारी गावातील माणसे. गप्पागोष्टी, मनमोकळे हसणे-खेळणे. या सर्व गावाला आपल्या कृपाशीर्वादाने एकत्र बांधून ठेवणारी ग्रामदेवता सातेरी!
गावातून शहराकडे जाणारा अरुंद कच्चा रस्ता. वाहने नव्हतीच. असलीच तर सायकल; तीही एखाद्याची. दुचाकी, चारचाकी नसल्यातच जमा. तालुक्याच्या गावातून गावाकडे येताना वाटेत नदी आणि ओढा लागत असे.
कित्येक वर्षे ओढ्यावर पूल बांधला गेला नव्हता. त्यामुळे सर्वांना चालतच जावे लागे. तरीही माणसे खूश होती. खूप प्रयत्न करून बऱ्याच वर्षांनी एकदाचा ओढ्यावर पूल बांधला आणि एकुलती एक बससेवा सकाळ, दुपार संध्याकाळ सुरू झाली.
गावात नव्याची नवलाई आली. येताना बरोबर खूप काही वेगळं वेगळं घेऊन आली. नवे वारे वाहू लागले. गावची मुले शिकली. नोकरी व्यवसायानिमित्त नियमित शहर गाठू लागली. वाहतूक वाढली हातात पैसा आला.
शेणमातीच्या घरांच्या जागी सिमेंट कॉंक्रीटची पक्की घरे झाली. प्रत्येकाच्या दारात दुचाकी, चारचाकी वाहने आली. गावात वीज आली, नळ आले. घरात फ्रिज वॉशिंग मशीन गीझर आले. आता ओहळ, नदी पाणवठ्यावर म्हणजे नदीवर तळ्यावर पाटावर जायला वेळच नाही.
नदीवरची आंघोळ, पाण्यात डुंबणे, पोहणे केव्हाच बंद झाले. बंद खोलीत शॉवरखाली आंघोळी उरकू लागल्या. परसातल्या ताज्या भाज्यांची जागा बाजारातल्या भाज्यांनी घेतली. त्यावर मात म्हणून ‘जंक फूड’ आले.
एवढ्याशा गावात दोन-तीन गाडे घातले गेले. बघता बघता चटपटीत प्लास्टिक बंद खाणे विकत घेण्यास गर्दी झाली. त्याशिवाय जगणे लोकांना कठीण वाटू लागले. पायी चालत जाणे तर बंदच झाले; पावले जड झाली. निरोगी निकोप शरीराची जागा आजाराने घेतली. गावात कोणी आजारी पडले तर झाडपाल्याचे औषध दिले जाई.
गावातच एखादी आजीबाई किंवा औषधांची माहिती असलेले जाणते लोक असत. लोक विश्वासाने त्यांच्याकडून निसर्गोपचार करून घेत असत. सुधारणेचे वारे आल्यापासून निसर्गातील झाडपाल्याच्या औषधाऐवजी महागड्या गोळ्या, इंजेक्शने प्रतिष्ठेची ठरली.
शेवटी व्हायचे तेच झाले. सतेज देहयष्टीची जागा कृश शरीराने घेतली. त्याला उसनी तरतरी आणण्यासाठी विविध महागडी प्रसाधने आली. चेहरा तुकतुकीत तेवढ्यापुरताच. सतेज निरोगी कांती दिसेनाशी झाली. निसर्ग आपल्याला सर्व काही देतो; अन्न, पाणी, सुंदर हवा, निसर्गोपचार, सुदृढ शरीर. पण आपणच करंटे नव्याच्या हव्यासापायी बावनकशी सोन्याला आम्ही लाथाडले.
आधुनिकता कुठपर्यंत योग्य आहे, याचा लेखाजोखा आम्हांला नाही करता आला. विनामूल्य भरभरून देणारा निसर्ग सोडून आम्ही विकतचे दुखणे केवळ आधुनिकतेच्या, सुधारणेच्या नावाखाली चुकीच्या मार्गाने अवलंबिले. त्याचेच दुष्परिणाम आज आम्ही भोगत आहोत. आयुष्य ओढत नेत आहोत. सरकारी नोकरीच्या मागे लागत आमची शेते आम्ही ओस पाडली.
थोडे आधुनिक थोडे पारंपरिक घेऊन सर्वांनी पुढे जायला हवे. नवे काय काय आणि किती प्रमाणात घ्यायचे याचे नियोजन असायला हवे. घराचे घरपण राखायला हवे. असे केले तर आपण नव्या जुन्याचा सुरेख संगम साधून प्रगतीकडे वाटचाल करू शकतो समाजाशी स्वतःला बांधून ठेवू शकतो. एवढे जरी केले तरी पुरेसे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.