Borim Goa : सफर गोव्याची! निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव; साधेपणाच्या चांदण्यात न्हाऊन निघालेले 'बोरी'

Borim Village Goa: कार्तिक पुनवेला सांगोड उत्सव असतो. कवी बाकीबाब बोरकर यांनी माझा गाव कविता लिहून आमचा गाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेला.
Borim Village Goa
Borim Village GoaDainik Gomantak
Published on
Updated on

साठ वर्षाअगोदर माझ्या गावाला गर्द हरीत निसर्गाचे कोंदण होते. आम्हा बोरकरांचा गाव अर्थात बोरी. माझा जन्म जरी मडगावला झाला तरी आम्ही अधूनमधून बोरीच्या घरात येतच होतो. साध्या लयीचे गावपण मला मनोमन आवडायचे. आज बोरीला बायथाखोल येथे जे सर्कल आहे तिथे आमचे मूळ घर मूळ होते. राण्यांच्या बंडावेळी घरावर हल्ला झाला. म्हणून आजोबांनी तात्काळ श्री नवदुर्गा मंदिराजवळ त्या काळी १०० रुपयांना घर घेतले. ते अजून रस्त्याच्या बाजूला आहे. तिथे माझा मोठा भाऊ राहतो.

रामनवमी, कार्तिक पौर्णिमा, दसरा या मोठ्या सणांत सहभागी होण्यासाठी आम्ही मडगावहून बोरीला येत असू. कार्तिक पुनवेला सांगोड उत्सव असतो. कवी बाकीबाब बोरकर यांनी माझा गाव कविता लिहून आमचा गाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेला.

सांगोड उत्सव त्यांच्या आत्यंतिक आवडीचा. त्या दिवशी बाकीबाब सुंदर शाल पांघरून एका विलक्षण पावित्र्यात आमच्याकडे यायचे. माझ्या बाबांना बोलताना कविता ऐकवत. मध्येच पोर्तुगीज संवाद असत. माझे वय शाळकरी.

कविता त्या वेळी कधीच समजल्या नाहीत. ते अधेमधे आमच्याकडे रात्री मुक्कामाला असत. स्वादिष्ट गप्पा, कविता सादरीकरण रंगात यायचे. बाकीबाबांचे बारीक डोळे गावातील सण उत्सवांत, ऋतुप्रसंगी कैक गोष्टी टिपून घेत. सभोवताल ते न्याहाळतच असत. त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वलय होते.

गावात पाण्याचे स्रोत होते. शेत, माड, पायवाटा व मंदिराचे दिव्यत्व. गाव साधेपणाच्या चांदण्यात कायम न्हाऊन जात असे. आमच्या घराच्या पुढे जंगल मातलेले होते. आता तिथे घर, कॉलनी, गजबजाट झालेला आहे. बोरी गावचा चेहरामोहरा आज बदललेला आहे.

विकास, प्रगती, उन्नती नावाच्या लाटा इथपर्यंत कोसळत आहेत. कोसळती धारा, गावाचा एकंदर नूर पालटून टाकत आहे. कारण, आम्ही साठ वर्षाआधी या गावाच्या अंगणात, देवालयाच्या मंडपात खेळलो आहोत. करवंदे, चारां, चुन्नां, जगमां, जांभ व इतर रानफळे आम्ही सुट्टीत हुंदडत चाखली आहेत.

काजू, आंबे हे तर होतेच. वास्कोस्थित डॉ. प्रदीप बोरकर बोरीचे. ती नियमितपणे बोरीला येतात. ह्दयरोगतज्ञ डॉ. शिरीष बोरकर आमच्या घराजवळच राहतात. महान संवादिनी वादक तुळशीदास बोरकर बोरीचे. अन्य खूप प्रतिभावंत, विद्यावंत बोरीची ध्वजा फडकावत आहे.

Borim Village Goa
Borim: गजेश नाईक दोन पिढ्यांपासून बनवतात घुमट, शामेळ; गणेशचतुर्थीत आरती पथकांकडून वाद्यांना मोठी मागणी

गावात परिवर्तन होत आहे. वसाहती वाढल्याने बोरी गाव हा फोंड्याचे एक विस्तारलेले उपनगर होत आहे. कॉलेज आलेले आहे. गर्दी वाढलेली आहे. संध्याकाळी किंवा सकाळी साईबाबाच्या देवळाआधी रहदारीची कोंडी होते; कारण माझा गाव लोकांनी विस्तारत आहे. रूपरंग बदलत आहे. सोयीसुविधा वाढत्या. नवदुर्गेची सासाय आहेच; पण सौंदर्य, साधेपणा लुप्त तर होत नाही ना ही सल बोचते.

Borim Village Goa
Borim Bridge: भात लागवड करून बोरी पुलाला विरोध! लोटली शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; जागा संपादनास प्रतिकार

बाकीबाबांची कविता आठवते : -

निळ्या खाडीच्या काठाला

माझा हिरवाच गाव!

जगात मी मिरवितो

त्याचे लावुनिया नाव!

- सखाराम शेणवी बोरकर, भाषा अभ्‍यासक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com