Goa Politics: खरी कुजबुज; आमदार असावा तर असा!

Khari Kujbuj Political Satire: मडगाव पालिकेत नवीन नोकरभरती करण्‍यासाठी जी प्रक्रिया हाती घेतली होती, ती यापूर्वी वादात सापडली होती.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

आमदार असावा तर असा!

असे आम्ही नव्हे, तर फातोर्डातील रहिवासी उघडपणे म्हणत आहेत. ते म्हणतात, की त्यांचे आमदार विजय सरदेसाई यांचे मतदारसंघावर बारीक लक्ष असते. हल्लीच आगामी ते म्म्हाड्ड लिंग जंक्शन रस्ता परिसरात एका बाजूने केबल घालण्यासाठी खोदला गेला, पण नमूद करण्यासारखी बाब म्हणजे कोणाचीच गैरसोय झाली नाही, कारण दोन दिवसांनी जितके खोदकाम झाले, तो भाग केबल घालून तो बुजविला गेला. आठवडाभरात त्यावर डांबरही घातला गेला, असे म्हणतात, आमदारांची तशी अट होती, नाहीतर नावेलीत लोकांना तब्बल वर्षभर तर घोगळ वसाहतीत चार वर्षे खोदलेल्या रस्त्यांचा त्रास लोकांनी सहन केला.

कोणाला मिळणार पालिकेत नोकरी?

मडगाव पालिकेत नवीन नोकरभरती करण्‍यासाठी जी प्रक्रिया हाती घेतली होती, ती यापूर्वी वादात सापडली होती. याचे कारण म्‍हणजे, ही प्रक्रिया राबविताना जी पारदर्शकता ठेवण्‍याची गरज होती ती ठेवली गेली नाही, असा आरोप करण्‍यात आला होता. त्‍यामुळे काही काळासाठी ही नोकरभरती अडकून पडली होती. पण आता ही नोकरभरती मार्गी लागणार असे सांगितले जाते. मडगाव पालिकेतील नोकरीची लॉटरी नेमकी कुणाला लागेल याबद्दल सध्‍या मडगावात उलट सुलट चर्चा चालू आहे. त्‍यामुळे ‘कौन बनेगा मडगाव पालिकेचा कर्मचारी?’ अशी स्‍पर्धा चालू झालेली तर नाही ना! असा संशय कुणाला आल्‍यास त्‍याला दोष देता येणार नाही.

Khari Kujbuj Political Satire
Goa Land Misuse: जमीन दिली शेतीसाठी, प्रत्‍यक्षात उभारली व्‍यावसायिक आस्‍थापने! ‘जमीन महसूल’च्‍या कलम 18 ‘क’चा 8 जणांकडून गैरवापर

‘त्‍या’ ग्‍वाहीचा विसर?

राज्‍यातील २६ टक्‍के जनतेला सद्यस्‍थितीत २४ तास पाणी मिळते, ५० टक्‍के जलवाहिन्‍या ४० वर्षे जुन्‍या असल्‍यामुळे पाण्‍याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते, त्‍यामुळे जनतेला आवश्‍‍यक तितका पाणी पुरवठा होत नाही, अशी विधाने पाणी पुरवठा खात्‍याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली. पाण्‍याशी संबंधित खात्‍यांची बैठक घेऊन या विषयांवर मार्ग काढला जाईल. शिवाय आणखी ३२५ एमएलडी क्षमतेचे प्रकल्प पुढील पाच महिन्‍यांत पूर्ण होतील. त्‍यामुळे नागरिकांना आवश्‍‍यक तितके पाणी मिळेल, अशी ग्‍वाहीही त्‍यांनी दिली. परंतु, या खात्‍याचा कारभार हाती घेताच ‘पाणी नेमके कुठे मुरते’ याचा शोध घेऊन पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्‍याची जी ग्‍वाही त्‍यांनीच दिलेली होती, तिचा त्‍यांना विसर पडला की आणखी काय? असा प्रश्‍‍न विशेषत: दरवर्षीच्‍या उन्‍हाळ्यात पाण्‍यासाठी तडफडणाऱ्या उत्तर गोव्‍यातील जनतेला पडला आहे.

दुपारची डुलकी!

सरकारी कार्यालयात दुपारच्या सत्रात कामांसाठी गेलात तर कर्मचारी वर्ग वामकुक्षीच्या स्थितीत आढळतात. दुपारी जेवण घेतल्यानंतर अनेकांना थोडा वेळ झोप घेण्याची सवय असते. एकदा सवय लागली, की ती सहजासहजी सुटत नाही. झोपेत असलेला सरकारी बाबू कधी उठणार व आपले काम केव्हा होणार? या प्रतीक्षेत ‘कॉमन मॅन’ बिचारा बाहेर ताटकळत उभा असतो. सरकारी कार्यालयात सिसिटीव्ही कॅमेरा लावलेले असले, तरी त्याची धास्ती या कर्मचाऱ्यांना नाही. कारण बहुतेक जण राजकीय वशिल्याने कामाला लागले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस आहे, तरी कोणाला हो?

Khari Kujbuj Political Satire
Goa Accident: गोव्यात रस्त्यांवरून चालणे ठरत आहे धोकादायक? 57 पादचाऱ्यांचा अपघाती मृत्‍यू; रस्‍ता सुरक्षेबद्दल जागृतीची मागणी

रेजिनाल्ड जागे झाले!

आपण विरोधी बाकावर होतो, तेव्हा आपण अनेक कामांना विरोध केला होता. त्यात बंदर व नद्याचे खाजगीकरण व राष्ट्रीयीकरणाचा समावेश होता. आता हे काम विरोधी आमदारांनी पुढे न्यावे असे कुडतरीचे सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सने सांगितले. या संदर्भात फातोर्डेचे आमदार विजयबाब सांगतात, की ‘बाजार उलगलो’ म्हणून एक कोकणीत म्हण आहे. त्यानुसार जे व्हावयाचे होते, ते सर्व घडून गेले. आता त्याबाबत रडून बसून काय फायदा? रेजिनाल्ड बाब नद्यांचे राष्ट्रीयीकरण व बंदराचे खाजगीकरण कधीच झाले आहे. आता त्याला विरोध करुन काय उपयोग? रेजिनाल्ड बाब आता जागे झाले. ते आता विरोधकांना कशाला साद घालत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी उघडपणे सरकारच्या विरोधात उभे रहावे, असे लोक म्हणत आहेत.

‘त्या’ ४ कोटींचे काय?

युनिटी मॉलसाठी सरकारने आत्तापर्यंत तब्बल २५ कोटी रुपये खर्च केले, असे मुख्यमंत्र्यांनी आंदोलन करणाऱ्यांना ठणकावून सांगितले आणि तेव्हापासूनच लोकांच्या डोक्यात हिशोब करणे सुरू झाले म्हणे. आता एवढे पैसे खर्च झाले आहेत, प्रकल्प रद्द केला, तर पैसे वाया जातील, असा युक्तिवाद मुख्यमंत्री करतात. पण मग लगेचच सोशल मीडियावर एक जुनी फाईल बाहेर आली, सौर ऊर्जेवर चालणारी ती बोट! लोकांच्या सेवेत आलीच नाही, पण सुमारे ४ कोटी रुपये सूर्यास्तासोबत बुडाले. ते पैसे कुणाकडून वसूल करणार? की ते पैसे वाया गेले नाहीत, असे प्रश्न आता लोक उपस्थित करू लागलेत. आता लोक म्हणतात, २५ कोटी वाया गेले तर प्रकल्प रद्द होत नाही, मग ४ कोटी वाया गेले तेव्हा? हा प्रश्न फिरू लागल्याने विरोधकांच्या कात्रीत सरकार चांगलेच सापडले आहे. काही जण तर म्हणतात, “बहुदा सरकारला कात्रीत पकडायचेच,” असा जनतेने सामूहिक संकल्पच केला आहे. आणि या कात्रीतून सुटण्यासाठी पुढचा खर्च किती कोटींचा होणार, याचीच सध्या उत्सुकता आहे!

कुंकळ्ळीत भाजपा मंडळ कुठे?

सुरुवात चांगली झाली, की काम फत्ते होते. पालिका निवडणुका जवळ आल्या, मात्र कुंकळ्ळी पालिका क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्यांत पालिका निवडणुकीचा उत्साह दिसत नाही. भाजपाच्या गोटात सामसूम आहे. दुसऱ्या बाजूने युरी समर्थक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मात्र जोमाने कामाला लागलेले पाहायला मिळतात. प्रत्येक प्रभागात युरी समर्थ दोन दोन, तीन तीन इच्छुक उमेदवार आतापासूनच प्रचाराला लागलेले पाहायला मिळतात. गेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत गळ्यात भाजपाचा मफलर घालून बाळ्ळीत प्रचार करणारे नगरसेवक गप्प आहेत.भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विशाल देसाई यांचाही आवाज शीण झालेला पहायला मिळतो.भाजपची ही उदासीनता युरी आलेमाव यांच्या पथ्यावर पडणार हे निश्चित.

फोंड्यात दोघांचे भांडण तिसऱ्याचा...

फोंडा पोटनिवडणुकीवरून सध्या मोठे चर्वितचर्वण सुरू आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपचा उमेदवार कोण असेल, याचीच ही चर्चा आहे. विधानसभा निवडणूक पुढील वर्षी होणार आहे, त्यामुळे फोंड्याची सीट जिंकणे भाजपसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. भाजपकडून सध्या तरी रितेश आणि अपूर्व अशी दोनच नावे पुढे आली होती, पण आता माजी खासदार नरेंद्र सावईकर यांचेही नाव पुढे येऊ लागले आहे. रितेश आणि अपूर्वचे तिकिटावरून मनोमीलन झाले नाही तर कदाचित नरेंद्र सावईकरांना तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या तरी नरेंद्र बाब गप्प आहेत. शेवटी दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असा प्रकार होणार की काय? याचीच ही चर्चा सुरू आहे. त्यातही म. गो. आणि केतन भाटीकरांच्या बदलत्या भूमिकेबाबतही तर्क-वितर्क लढविणे सुरूच आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Russian Murder: एकाच नावाच्या दोन रशियन महिलांची का केली हत्या? मारेकऱ्याच्या आईशी कनेक्शन! खुनाचं गुढ उकललं!

उर्फानचा बर्थडे

गोवा हज कमिटीचे अध्यक्ष उर्फान मुल्ला यांचा वाढदिवस मंगळवारी झाला. मित्रमंडळी व हितचिंतकांनी त्याला ‘बर्थडे विश’ केली. या खेपेला त्यांनी आपला वाढदिवस तसा साधाच साजरा केला. मात्र पुढच्या वर्षी तो दणक्यात साजरा करण्याचा त्यांचा म्हणे प्लॅन आहे. कारण पुढच्या वर्षी ते पन्नास वर्षाचे होणार आहेत. उर्फानच्या राजकीय महत्वकांक्षा तशा बऱ्याच आहेत. कॉंग्रेस ते भाजप असा त्याचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास आहे. आता ते भाजपात बऱ्या‍यापैकी रूळले आहेत. ‘भिवपाची गरज ना’ असे ते म्हणतात. याचा अर्थ प्रत्येकाने आपल्या परीने घ्यावा. सुज्ञास अधिक न सांगणे नलगे. ∙∙∙

वीरेश बोरकरांचा यूके दौरा

२०२७ च्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आरजीचे आमदार वीरेश बोरकर सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. तिथे विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या दौऱ्यादरम्यान आमदार बोरकर विविध बैठकांना उपस्थित राहणार आहेत. हा दौरा अभ्यासदौरा असून इतर देशांची कार्यपद्धती समजून घेऊन ती गोव्यात कशी राबवता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी आपण यूकेला जात असल्याचे त्यांनी सांगितले होते. २०२२च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान यूकेतील गोमंतकीयांकडून बोरकर आणि आरजीला मोठा पाठिंबा मिळाला होता. पक्षाला यूकेमधून आर्थिक मदत करणारे दातेही आहेत. २०२७ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाहता, वीरेश बोरकर आणि आरजीसाठी हा यूके दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com