Ponda Municipal Council Election 2023: फोंडा पालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आज (गुरुवारी) दोन प्रभागातील उमेदवारांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
प्रभाग 7 मध्ये विश्वनाथ दळवी यांच्यविरोधात उभे असलेले भारत पुरोहित यांनी तर प्रभाग 13 मध्ये माजी नगरसेविका विद्या पुनाळेकर यांच्या विरोधातील दर्शना नाईक यांनी उमेदवारी मागे घेतल्याने विश्वनाथ दळवी व विद्या पुनाळेकर हे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले.
भाजपचे संख्याबळ मतदानापूर्वीच दोन झाले आहे. कृषीमंत्री रवी नाईक यांच्यामुळेच भाजपला दोन्ही जागा मिळाल्याचे सांगण्यात आले. खुद्द पुरोहित यांनी रवी नाईक यांच्याच सांगण्यावरून आपण अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले.
अन् जादूची कांडी फिरली !
1 प्रभाग 13 मध्ये माजी नगरसेविका तथा मगो पक्षाच्या समर्थक विद्या पुनाळेकर यांनी यावेळेला उमेदवारी दाखल केली होती. विद्या पुनाळेकर यांच्याविरोधात भाजप गटाच्या दर्शना नाईक यांनी उमेदवारी दाखल केली होती.
मात्र, ऐनवेळी भाजपच्या वरिष्ठांकडून जादूची कांडी फिरली आणि दर्शना नाईक यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे विद्या पुनाळेकर बिनविरोध निवडून आल्या.
2 प्रभाग 13 मधून बिनविरोध निवडून आलेल्या विद्या पुनाळेकर यांनी थेट पणजीला जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी विद्या पुनाळेकर यांचे स्वागत केले व पक्षात प्रवेश दिला.
विश्वनाथ दळवीची हॅटट्रिक
विश्वनाथ दळवी यांची तिसऱ्यांदा फोंडा पालिकेवर निवड झाली आहे. विश्वनाथ दळवी यांनी नगराध्यक्षपदीही काम केले असून प्रभागातील कामांमुळे त्यांचा प्रत्येकवेळी बहुमताने विजय झाला आहे.
यावेळेला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कृषीमंत्री रवी नाईक, खासदार विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर यांच्यामुळेच आपला विजय निश्चित झाल्याचे दळवी सांगतात.
"आपण उमेदवारी कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, असे आपण जाहीर केले होते, मात्र फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांच्या आग्रहामुळेच आपण उमेदवारी मागे घेत विश्वनाथ दळवी यांचा मार्ग सूकर केला."
- भारत पुरोहित, उमेदवार
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.