
कुणावरही अन्याय झाला तर त्याच्या बाजूने धावत जाणारे, किमान तसा देखावा तरी करणारे बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी टॅक्सीवाल्यांच्या दादागिरीबद्दल अजून एक चकार शब्दही काढलेला नाही. अहमदाबाद येथील पर्यटक महिलेला टॅक्सीवाल्यांनी पाच किलोमीटर चालायला लावून अक्षरश: रडविले. यापूर्वी कित्येकदा व्हेंझी टॅक्सीवाल्यांची बाजू मांडण्यासाठी पोलिस स्थानकावर हजर राहिले. याच टॅक्सीवाल्यांना दोन सबुरीचे शब्द सांगण्याची धमक त्यांच्यात नाही का? यापूर्वी ज्या गोष्टी घडल्याच नाहीत, त्या गोष्टींचा भलताच बाऊ करून, पत्रकार परिषदा घेऊन आपण महिलांचे कैवारी असे भासविण्याचा प्रयत्न केलेल्या व्हेंझींना एका पर्यटक महिलेला टॅक्सीवाल्यांच्या दादागिरीमुळे जो मन:स्ताप सहन करावा लागला त्याबद्दल काहीच वाटत नाही का? ∙∙∙
‘रेशमी चिमटे काढणे’ अशी मराठीत एक म्हण आहे. ज्येष्ठ वकील व विद्वान राधाराव यांचा कोटी करण्यात व रेशमी चिमटे काढण्यात हात धरणारा कोणी नाही. सोशल मीडियावर राधाराव भाजप समर्थकांना डिवचणाऱ्या पोस्ट टाकतात. काल पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आशिया चषक स्पर्धेतून अंग काढून घेतल्याचे वृत्त ऐकताच राधाराव यांनी ताबडतोब फेसबुकवर एक पोस्ट टाकली. ‘पाकिस्तानने पैशाला नव्हे तर देशहिताला प्राधान्य दिले’ अशी ती पोस्ट होती. पण नंतर पाकिस्तानने गुडघे टेकले व त्यांचे ‘देशहित’ जगासमोर आले. आता राधाराव यांना ‘राष्ट्रविरोधी’ अशी विशेषणे लावली जातील. पण त्यांना आता या सर्व गोष्टींची सवयच झालेली आहे म्हणा! ∙∙∙
कृषीमंत्री रवी नाईक यांनी आपल्या वाढदिनी कला-संस्कृतीमंत्री रमेश तवडकर यांना कानमंत्र दिल्याचे समजते. ‘आपल्याला मंत्रिपद नकोच होते’, ‘आपल्याला मिळालेल्या खात्यांमध्ये दमच नाही’ अशी विधाने तवडकर यांनी केल्याचे प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर नाईक यांनी तवडकर यांना कानमंत्र देताना संयम राखण्याचे आवाहन केले आहे म्हणे. या वाढदिवस सोहळ्यात तवडकर यांनी रवी नाईक यांना शुभेच्छा दिल्या खऱ्या, मात्र त्याबदल्यात त्यांना महत्त्वपूर्ण कानमंत्र मिळाला, अशी कुजबूज उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. ∙∙∙
पोलिस हे जनतेचे रक्षक. मात्र अलीकडे पोलिस खात्यावर सर्व थरांतून टीका होऊ लागली आहे. त्यास कारणेही तशीच असतात. काल तर एका सामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाला. असो. ही बातमी सर्वांपर्यत समाज माध्यमांमुळे सर्वदूर पोहोचली. पोलिसांनी या हल्लेखोरांना पकडण्यासाठी जे कष्ट घेतले, ते नक्कीच कौतुकास्पद आहेत. शिवाय पोलिसांनी जी तत्परता दाखवली, त्याबाबतही कौतुक करावेच लागेल. खरे तर ते त्यांचे कामच आहे, पण अवघ्या काही तासांतच गुन्हेगारांना पकडण्यासही ‘डोकॅलिटी’ लागतेच ना! जसे पाठीवर हात ठेवून लढा असे म्हटले जाते तसे पोलिसांच्या पाठीवर हात ठेवून त्यांचे मनोबल वाढवले तर नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकतो. ∙∙∙
मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबतच्या वृत्तावर स्पष्टीकरण देण्यासाठी मंत्री रमेश तवडकर यांनी गुरुवारी चौथ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. परंतु, या वृत्ताचे खंडन करत असताना आपल्याला मंत्रिपद नकोच होते व तशी विनंती आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केली होती, असे सांगायला ते विसरले नाहीत. परंतु आपल्याकडे ‘संघटन कौशल्य’ असल्याचे ज्ञात असल्यामुळेच दिल्लीतून मंत्रिपद स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे आपण मंत्रिपद स्वीकारल्याचा पुनरुच्चार तवडकर यांनी केला. सभापतिपदाचा राजीनामा दिल्याच्या दिवसापासून तवडकरांनी ही आपली विधाने अजिबात बदललेली नाहीत. त्यामुळे मंत्रिपदासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतानाही त्यांना बाजूला ठेवून पक्षाने तवडकर यांनाच का मंत्री केले? असा प्रश्न आता खुद्द तवडकरांचे कार्यकर्तेच खासगीत विचारत आहेत. ∙∙∙
येत्या काही महिन्यांत नगरपालिका निवडणुका जाहीर होतील. पण म्हापशात आत्तापासूनच राजकारण तापू लागले आहे. या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी, राजकीय पक्ष आपले समर्थन असलेले पॅनल उभे करत असते. म्हापशात म्हणे एका राजकीय नेत्याने आपले पॅनल उभे करण्याची तयारी चालवली आहे. काही आजी-माजी नगरसेवकांना या नेत्याने जवळ करून काही प्रभागांसाठी आपले उमेदवार जवळजवळ निश्चित केले आहेत. मागील काही वर्षांपासून हा पुढारी म्हापशात आपले पाय पसरविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याला अपेक्षित यश अद्याप मिळालेले नाही. आता ही राजकीय अदृश्य शक्ती नेमकी कोण, याची म्हापसेकरांना जाणीव आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणूक ही काही राजकीय नेत्यांसाठी अस्तित्वाची लढाई असेल, असे संकेत मिळत आहेत. ∙∙∙
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना ‘घरवापसी’चे वेध लागले आहेत. त्यामुळे कुणाच्या नसल्या तरी सहावीतील विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. त्यांनी म्हणे त्यावेळी सहावीतील विद्यार्थ्यांना टॅब देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी त्यावेळी सहावीत असलेल्या विद्यार्थ्यांकडून खात्याने प्रत्येकी एकेक हजार रुपये घेतले होते. पण नंतर एकाएकी ती योजनाच रद्द केली गेली. आता त्यास इतकी वर्षे उलटली तरी विद्यार्थ्यांचे ते पैसे काही परत मिळालेले नाहीत. पार्सेकर सरांची ‘घरवापसी’ झाली व दिगंबर कामत यांच्याप्रमाणे तेसुद्धा मंत्री झाले तर आपले पैसे परत मिळतील अशी स्वप्ने ते विद्यार्थी रंगवत आहेत. ∙∙∙
गोवा क्रिकेट असोसिएशनवर चेतन देसाई आणि बाळू फडके यांच्या पॅनलने निर्विवाद विजय मिळवला. त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आज शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता ताळगावच्या कम्युनिटी सेंटरमध्ये मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. रोहन गावस देसाई हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) जीसीएचे प्रतिनिधीत्व करतील की नाही हे आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठरणार आहे. बीसीसीआयचे निवडणूक अधिकारी तोपर्यंत मतदारांची यादी निश्चित करतील. देसाई आणि फडके यांचा आनंदोत्सव साजरा होण्यास सुरवात होण्याआधी हा निकाल येणार असल्याने त्याचे सावट या विजयोत्सवावर असेल. रोहन गावस देसाई यांना बीसीसीआयचे मतदार म्हणून मान्यता मिळाली नाही तर चेतन-बाळूच्या पार्टीतील आनंद ओसंडून वाहेल. पण समजा रोहन यांना मतदार म्हणून मान्यता मिळाली तर तोच आनंदाचा जोश कायम असेल काय, हे समजलेच! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.