
राज्याचे एक दिग्गज नेते असलेले रवी पात्राव यांचा फोंड्यातील त्यांच्या विरोधकांनी धसकाच घेतला आहे. पात्रावचा वाढदिन उद्या गुरुवारी आहे, त्यामुळे त्यांचे चाहते आणि कार्यकर्त्यांनी यंदाचा वाढदिन जंगी करण्याचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीने सगळीकडे पात्रावचे बॅनर्स झळकले आहेत. पण काही नतद्रष्टांनी काही ठिकाणचे बॅनर्स रात्रीच्या वेळी चोरीछुपे फाडून टाकण्याचा प्रताप केला आहे. या प्रकारामुळे पात्रावचे चाहते आणि कार्यकर्ते संतप्त झाले असून हे काम विरोधकांचेच असल्याचा दावा केला जात आहे. रवी पात्राव हे फोंड्यात लोकप्रिय असून त्यांचा धसकाच त्यांच्या विरोधकांनी घेतला असून त्यामुळेच रात्रीच्यावेळी हे बॅनर्स फाडण्याचे प्रकार होत असल्याचे कार्यकर्ते म्हणाले. ∙∙∙
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोवा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विरोधक एकत्रित आल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा पाडाव होऊ शकतो, हे दाखवून दिले आहे. माजी अध्यक्ष विनोद फडके आणि चेतन देसाई या दुरावलेल्या मित्रांनी या निवडणुकीत एकत्रित येत सरकारच्या पाठबळावर निवडणुकीत उतरलेल्या परिवर्तन पॅनलला धूळ चारली आहे. त्यावरून आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी खोचक पोस्ट टाकली आहे. ‘त्रिफळाचित’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे फलंदाजाच्या रुपातील त्रिफळाचित झालेले छायाचित्रही या पोस्टला जोडले आहे. यावरून हे केवळ क्रिकेट नाही, तर २०२७ च्या निवडणुकीतही नक्कीच ‘परिवर्तन’ घडेल, असे म्हटले आहे. गिरीश यांना नेमके काय म्हणायचे आहे, हे नक्कीच अनेकांना उमगलेले असणार आहे. ∙∙∙
गोवा क्रिकेट असोसिएशनमध्ये थेटपणे आमदार नीलेश काब्राल नसले, तरी त्यांनी या संघटनेच्या निवडणुकीत बरीच मेहनत घेतली आहे. रोहन गावस देसाई हे कुचचड्यातून विधानसभेची निवडणूक लढवणार हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे २०२७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत प्रतिस्पर्ध्याचे हात बळकट होऊ द्यायचे नाहीत, असा हिशेब काब्राल यांनी घातला. त्यांनी बाळू फडके व चेतन देसाई गटाला हवी ती मदत केली. त्यामुळे काब्राल यांची ही खेळी यशस्वी झाली. आपल्याला राजकारणाची किती जाण आहे, याचे दर्शनही काब्राल यांनी यानिमित्ताने घडवल्याची चर्चा आहे. ∙∙∙
गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून काढल्यानंतर त्यांनी वारंवार माध्यमांसमोर सांगितले की, २०१९ मधील शिरोडा पोटनिवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. एसटी मतदारांना पटवून देण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली, अन्यथा विद्यमान आमदार सुभाष शिरोडकर हरले असते आणि त्यावेळी सरकार धोक्यात आले असते. पण, आता गंमत म्हणजे, गावडे यांनी शिरोडा मतदारसंघातील कोडार गावकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. येथे येऊ घातलेल्या ‘आयआयटी’ला गावकरी विरोध करत आहेत. रविवारी गावकऱ्यांनी बैठक घेऊन स्थानिक आमदार सुभाष शिरोडकर यांनी गावात यावे आणि आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी केली होती. पण मंगळवारी अचानक गोविंद गावडे गावात पोहोचले आणि गावकऱ्यांना थेट पाठिंबा दर्शविला. आता प्रश्न असा निर्माण होतो की, गोविंद गावडे शिरोडा मतदारसंघात रस घेऊ लागले आहेत का? जर होय, तर भाजप ही परिस्थिती कशी हाताळेल? कारण दोघेही भाजपचेच आहेत. की गावडे फक्त भाजप वरिष्ठ नेत्यांना दाखवून देत आहेत की, अनेक मतदारसंघांत ते पक्षाचे नुकसानही करू शकतात? ∙∙∙
सार्वजनिक बांधकामसारख्या (पीडब्ल्यूडी) वजनदार खात्याच्या मंत्रिपदाचा ताबा घेतल्यापासून दिगंबर कामत पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे धावत आहेत. विविध भागांत जाऊन रस्ते, पुलांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी प्रलंबित आणि आगामी प्रकल्पांबाबत ते वारंवार अभियंत्यांशी बैठका घेत आहेत. दर सोमवार आणि बुधवारी दिवसभर ते पर्वरीतील मंत्रालयात बसून काम करीत असतात. एकेकाळी वीजमंत्री म्हणून काम करताना त्या खात्याला ज्यापद्धतीने झळाळी आणली होती, तसेच काम ‘पीडब्ल्यूडी’मध्ये करण्याचा निर्धार त्यांनी आधीच व्यक्त केला आहे. पण, काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही न ऐकलेले रस्ते कंत्राटदार कामतांना ‘बधणार’ की त्यांचा ‘निर्धार’ खोटा करून दाखवणार, हे पुढील काळच सांगेल... ∙∙∙
आपण अधिकारपदी असताना कुठलाही बेकायदेशीर कारभार खपवून घेणार नाही, अशा प्रवृत्तीने वागणाऱ्या आणि त्यामुळे तथाकथित बेकायदेशीर बांधकामाच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत भरमसाठ नोटिसा जारी करणाऱ्या केपेतील त्या रामशास्त्री प्रभुणे बाण्याने वागणाऱ्या अधिकाऱ्याचेच स्वत:चे घर बेकायदेशीर असल्याचा पर्दाफाश करणारा एक व्हिडियो सध्या व्हायरल झाला असून कोण तरी ऐश्वर्या नावाची एक बाई या अधिकाऱ्याचा अगदी पंचनामा करत असल्याचे दिसून आले आहे. हा व्हिडियाे पाहिल्यास या अधिकाऱ्याच्या बाबतीत काहीच मनोहर नाही हेच आता दिसून येऊ लागले आहे. स्वत:च्या डोळ्यात मुसळ, असताना दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ शोधणाऱ्या त्या अधिकाऱ्याची वृत्ती आतातरी बदलेल का? ∙∙∙
कोडार आयआयटी प्रकरण आता चिघळण्याच्या वाटेवर आहे. कोडार - बेतोडावासीयांनी आयआयटीला विरोध करताना आपली बाजू स्पष्ट केली आहे, पण अजून कोमुनिदादने आपले म्हणणे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे कोडारवासीयांना पाठिंबा देण्याऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. सरकारी यंत्रणेने प्रकारावर मौन साधले आहे, तरीपण विरोध नोंदवण्यासाठी तीस दिवसांचा अवधी असल्याने कदाचित त्यानंतरच सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल, असेच दिसते. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.