
वास्को: जुन्या बसस्थानकावरील बसचालकांच्या बेशिस्तपणाबद्दल काही सामाजिक कार्यकत्यांनी आवाज उठविल्यावर वाहतूक पोलिस जागे झाले. दोन वाहतूक पोलिसांनी बुधवारी (ता.४) सकाळी बसस्थानकावर हजेरी लावून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. तथापि त्यांचा हा प्रयत्न तकलादू होता, हे दुपारी स्पष्ट झाले. यादरम्यान वाहतूक पोलिसांनी दुचाकीवाल्यांकडून मात्र दंड वसूल करून आपला कोटा पूर्ण केला.
येथील जुन्या बसस्थानकावरील बसवाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याने नागरिकांना व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील बसचालकांमध्ये शिस्त यावी, वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक पोलिस कक्ष, वाहतूक (Transportation) विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
या बसस्थानकावर पूर्वी कदंब शटल सर्व्हिस व अंतर्गत भागांत, मडगाव वगैरे ठिकाणी जाणाऱ्या खासगी मिनीबस उभ्या केल्या जात होत्या. त्यामुळे तेथे होणारी वाहनांची कोंडी लक्षात घेऊन तत्कालीन आमदार कार्लुस आल्मेदा यांनी शटल बस सेवेचे बुथ कुन्हा चौकात हलविले. त्यामुळे मिनीबसवाल्यांना बसस्थानकावरील पूर्ण जागा मिळाली. मात्र, त्यामुळे शिस्त येण्याऐवजी बेशिस्तपणा वाढला असल्याचे दिसत आहे. या गोष्टीला वाहतूक पोलिस विभागाचे अधिकारी पूर्णपणे जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया ऐकण्यासमिळत आहेत.
पूर्वी याठिकाणी वाहतूक पोलिस उभा राहून वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवत होता. त्यामुळे मिनीबसचालक वेड्यावाकड्या तसेच दुहेरी रांगा करून बसगाड्या उभ्या करीत नव्हते. मात्र, आता या बसस्थानकावर वाहतूक पोलिस नजरेस पडत नसल्याने बसगाड्या वेड्यावाकड्या व दुहेरी रांगा करून उभ्या केल्या जातात. त्यामुळे इतर वाहनांना मोठा अडथळा होतो.
या बसस्थानकावर एका बाजूला बसगाड्या तर दुसऱ्या बाजूला दुचाकी उभ्या असतात. त्यामुळे हा रस्ता वाहनांसाठी अरुंद झाला आहे. त्यातच बसगाडीवाले व काही दुचाकीवाल्यांमधील बेशिस्तपणा इतरांना डोकेदुखी ठरत आहे. काही दुचाकीचालक व कारचालक आपली वाहने दुचाकीच्या मागील बाजूस उभी करून तेथे ज्यूस पिण्यासाठी जातात. त्यामुळे कदंब बस, ट्रक, इतर वाहनांना अडथळा निर्माण होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.