Goa Drug Case: 'त्या' स्विगी बॉयची कसून चौकशी सुरू, पोलिसांच्या हाती लागणार नवे धागेदोरे?
पणजी: वास्को येथे ‘स्विगी बॉय’ म्हणून काम करणाऱ्या राहुल उप्पलवित्री याला पकडल्यानंतर गांजा पुरवठादारांच्या मोठ्या नेटवर्कची माहिती मिळवणे पोलिसांनी सुरू केले आहे. राहुल या केवळ पुरवठादार होता तर त्याला अमली पदार्थ कोण पुरवत होता, त्याची माहिती मिळवणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागाने सुरू केले आहे.
राहुल याला पाच दिवसांची कोठडी मिळाल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. वास्कोपुरताच हा प्रकार मर्यादित आहे की याची व्याप्ती मोठी आहे याचा शोध पोलिस घेऊ लागले आहेत. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यास राहुल देत असलेली माहिती उपयुक्त ठरेल, असे पोलिसांना वाटते. या प्रकरणात आणखीन काही जणांना पकडण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.
राहुलकडून केवळ २२६ ग्रॅम गांजा जप्त झाला असला तरी ऑनलाईन पद्धतीने वस्तू वितरणाची सेवा बजावणारे अन्य कोणी राहुल सारखेच झटपट पैसे कमावण्याच्या मागे आहेत का, याचा माग काढला जात आहे. गांजा राहुल स्वतःहून ग्राहकाला पुरवत होता की, ग्राहकानेच पुरवठादाराला हा मार्ग सुचवला होता, याचाही शोध घेतला जात आहे.
दरम्यान, अमली पदार्थ विरोधी विभागाच्या अधीक्षक सुनीता सावंत यांनी या प्रकरणाची सर्व पोलखोल उद्या मंगळवारी करू, असे सांगितले. त्या म्हणाल्या, या प्रकरणात काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून त्यानुसार पोलिस कारवाई केली जात आहे. साऱ्याचा उलगडा कारवाई झाल्यावर केला जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.