

मडगाव: वास्को येथे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चंद्रशेखर सरोज यांच्या कुटुंबीयांना ४३.४० लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश मडगाव मोटार अपघात न्यायाधिकरणाने दिला. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी राम प्रभूदेसाई यांनी हा निकाल दिला. वास्को येथील एफ. एल. गोम्स रोडवर रात्रीच्या अंधारात चुकीच्या पद्धतीने उभ्या करण्यात आलेल्या ट्रकला मोटारसायकल धडकून झालेल्या भीषण अपघातात ३३ वर्षीय चंद्रशेखर सरोज या कामगाराचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी मयताच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या दाव्यावर सुनावणी पूर्ण करून न्यायालयाने आपला निवाडा जाहीर केला. न्यायालयाने मयताची पत्नी, चार मुले आणि वृद्ध आई यांच्यासाठी एकूण ४३.४० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश संबंधित वाहनाचा चालक, मरीनलिंक्स शिपिंग एजन्सीजचे मालक आणि न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी यांना संयुक्तपणे दिले आहेत. ही रक्कम अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून ९ टक्के वार्षिक व्याजासह अदा करावी लागणार आहे.
अपघाताची घटना १४ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास टिळक मैदान, वास्को येथे घडली होती. चंद्रशेखर सरोज हे आपल्या प्लॅटिना मोटारसायकलवरून जात असताना, रस्त्यावर कोणताही इंडिकेटर किंवा पार्किंग लाईट न लावता उभ्या असलेल्या ट्रेलर ट्रकला त्यांची मोटारसायकल पाठीमागून धडकली.
यात झालेल्या गंभीर दुखापतींमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. विमा कंपनीने मृत व्यक्तीने हेल्मेट घातले नव्हते आणि निष्काळजीपणे वाहन चालवले, असा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष आणि पोलिसांनी नोंदविलेला पंचनामा ग्राह्य धरून न्यायालयाने ट्रक चालकाचा निष्काळजीपणा सिद्ध झाल्याचे नमूद केले.
पत्नीला १४.९० तर मुलांना प्रत्येकी ५.५० लाख
मृत चंद्रशेखर हे दैनिक मजुरीवर काम करत होते. त्यांचे मासिक उत्पन्न २० हजार रुपये गृहीत धरून न्यायालयाने नुकसानभरपाई निश्चित केली. पत्नी दुर्गावती देवी यांना एकूण १४.९० लाख रुपये देण्यात येणार आहेत.
चार मुलांच्या नावे प्रत्येकी ५.५० लाख रुपयांची रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत दीर्घकालीन मुदतठेव स्वरूपात ठेवण्यात येणार असून, ते सज्ञान झाल्यानंतर त्यांना ती रक्कम मिळणार आहे. आई शारदा सरोज यांना साडेसहा लाख रुपये मुदतठेव स्वरूपात देण्याचे न्यायालयाने आदेश दिले. तसेच, ही रक्कम जिल्हा न्यायालयाच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने विरोधी पक्षांना दिले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.