

पणजी: वागातोर समुद्रकिनाऱ्यावर, विशेषतः ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंडी घालण्याच्या काळात, वन विभागाची पूर्ण देखरेख व कडक नजर असल्याचे गोवा वन विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला स्पष्ट केले आहे. या किनाऱ्यावर कासवांचे संरक्षण आणि त्यांच्या अंड्यांचे रक्षण करण्यासाठी सागरी गस्त व बचाव पथके तैनात करण्यात आल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली.
‘कॅमेलियन वाइल्डलाइफ ऑर्गनायझेशन’चे सचिव ॲरॉन व्हिक्टर फर्नांडिस यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर वन विभागाने प्रतिज्ञापत्र सादर केले. प्रतिज्ञापत्रात वन विभागाने गोव्यात मोरजी आणि गालजीबाग-काणकोण अशा दोन मुख्य सागरी रेंज तयार केल्याचे नमूद केले आहे. उत्तर गोवा सागरी रेंजचे तीन भाग करण्यात आले असून, वागातोर समुद्रकिनारा बार्देश राउंडमधील बीट क्रमांक २ अंतर्गत येतो.
वागातोर किनाऱ्यावर कासवांची घरटी शोधणे, अंड्यांचे जतन करणे, ती सुरक्षितपणे हॅचरीमध्ये हलवणे आणि संकटग्रस्त सागरी जीवांचा बचाव करण्यासाठी पथके चोवीस तास कार्यरत आहेत. ऑलिव्ह रिडले कासव ही प्रजाती वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या अनुसूची-१ अंतर्गत संरक्षित आहे. त्यामुळे कासवांना, त्यांच्या अंड्यांना किंवा घरट्यांना इजा पोहोचवल्यास कडक कायदेशीर कारवाई व खटला दाखल केला जाऊ शकतो.
राष्ट्रीय हरित लवादाच्या २०१७ च्या निर्देशानुसार, नियमभंगाची माहिती ‘गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणा’कडे पाठवली जाते. प्रत्येक उल्लंघनासाठी एक लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची व तो वसूल करण्याची तरतूद प्राधिकरणाकडे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.