Goa Language Politics: गोमंतकीय भाषावादाची वृद्धावस्थेकडे वाटचाल? 'राजभाषा करा नाहीतर खुर्ची खाली करा'नंतरही निर्धार समितीचा तिसरा पर्याय कुठे हरवला?

Goa Konkani Marathi Language Dispute: एका वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत मराठी अकादमीच्या अध्यक्षांनी राजभाषेविषयी सांगितलेले तर्कट ऐकावे.
Goa Konkani Marathi Language Dispute
Goa Language PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

एका वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत मराठी अकादमीच्या अध्यक्षांनी राजभाषेविषयी सांगितलेले तर्कट ऐकावे. मराठीला राजभाषा दर्जा का हवा, यात त्यांनी सांगितलेले कारण मराठी अकादमीच्या भिंतीवर फ्रेम करून लावायला हवे.

यंदा श्रावणसरींचा नेहमीचा आनंद  अनुभवता आला नाही, तरी श्रावण महिन्यात दोन दिवसांच्या विधानसभा अधिवेशनामुळे थोडे मनोरंजन झाले. तशातच. मराठी राजाभाषा निर्धार समितीने सरकारसाठी तिसरा पर्याय न ठेवता ‘राजभाषा करा नाहीतर खुर्ची खाली करा’ असे फक्त दोनच पर्याय देत. विधानसभेवर मोर्चा नेला. मोर्चा चांगला झाला पण मुख्यमंत्र्यांनी चतुर्थीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या मुलाखतीत ‘राजभाषा कायद्यात बदल होणार नाही’ असे जाहीर करून निर्धार समितीच्या दोन्ही पर्यायांना केराची टोपली दाखविली.

Goa Konkani Marathi Language Dispute
Goa Onion Price: कांदा पुन्हा रडवू लागला! पणजी बाजारात किलोमागे 70 रुपये, फलोत्पादन महामंडळाकडून 58 रुपयांत विक्री

तशी आमची निर्धार समिती हुशार, चतुर्थीनंतरचा काळ हा निवडणूक डावपेच नियोजनासाठी महत्वाचा वेळकाळ, त्यामुळे  येथे व्यत्यय नको म्हणून, त्यांनी तिसरा पर्याय जाहीर केलाच नाही. मुख्यमंत्र्यांच्या विधानावर जळजळीत प्रतिक्रिया वैगेरे यायला हव्यात असे   निर्धार समितीला, ज्येष्ठ नागरिकांना वाटत होते, पण तसे काही झाले नाही. एकंदरीत गोमंतकीय भाषावाद आता  वृद्धावस्थेकडे वाटचाल करीत आहे, याची जाणीव व्हायला लागली आहे.

जेव्हा ऐंशीच्या दशकात जे भाषा आंदोलन झाले, तेव्हा आम्ही अकरावी-बारावीत होतो, त्यामुळे प्रत्यक्ष सहभाग नसला तरी भाषा आंदोलन कसे झाले होते याची माहिती आहे. वैद्यकीय क्षेत्रात असल्याने या आंदोलनात सक्रीय मोगी-प्रेमींना प्रत्यक्ष भेटण्याचा योग पुढील काळात आला. तशातच, गोमंतक  मराठी भाषा परिषदेची जबाबदारी आल्यावर, अगदी सत्तरीच्या दशकातील  भाषावादाचे  दस्ताऐवज माझ्याकडे आले. प्रत्यक्ष पाहिलेले भाषा आंदोलन, आज हयात असलेले व नसलेले तेंव्हाचे दोन्ही बाजूचे सक्रिय आंदोलनातील नेते व गोमंतक  मराठी भाषा परिषदेकडे असलेले स्वतःचे दस्ताऐवज लक्षात घेता, यापुढे भाषा आंदोलन एक पुराणकथा बनून राहणार आहे.

जसे गोव्यात सत्यनारायण पूजा घालायला मुहूर्त लागत नाही व निमित्यही लागत नाही, तसे दोन्ही बाजूनी भाषेच्या नावाने एखादी ‘पूजा-महापूजा’ अधूनमधून घातली जाईल. तीर्थप्रसाद घेण्यासाठी पुराणकथा संपण्याची वाट पहावी लागते, तसेच येथेही उपस्थित लोकांना तेच तेच पुराण ऐकल्याशिवाय गत्यंतर असणार नाही. जनमत कौल, शेजारील राज्यातील शिक्षकांनी कोकणीवर कसा न्याय केला, मराठीला पूर्ण राजभाषा दर्जा दिल्यास महाराष्ट्रातील लोक कशा नोकऱ्या गिळंकृत करतील यावर  प्रत्येकी  एक एक अध्याय कोकणीपूजेच्या पुराणकथेत असणार. पुराणवाचन, मग ते सत्यनारायण पूजेचे असो वा सत्यविनायक पूजेचे, त्यात सांगितलेल्या घटना वास्तवात घडतील असे वाटत नाही, तरी त्या पुरोहितांच्या तोंडून ऐकाव्या लागतात.

Goa Konkani Marathi Language Dispute
Goa Road Accidents: गोव्यात 'वीकएंड' ठरतोय जीवघेणा! ऑगस्टमध्ये 226 अपघात, 20 सप्टेंबरपर्यंत 188 जणांचा मृत्यू

याचे कारण म्हणजे तो एक विधीचा भाग बनून राहिला आहे. सत्यनारायण देवाचा  प्रसाद भक्षण केला नाही तर तर त्याचा कोप होऊन व्यापाऱ्याची धनाने भरलेली नौका बुडण्याची भीती सांगितली जाते, तसे कोकणीला ‘बोली’ म्हणणे  ‘देशद्रोहा’चा गुन्हा ठरतो, अशा आशयाच्या  भीतीवजा कथेचा या पुराणात समावेश केला जाईल. दुसऱ्या बाजूला, साहित्य -संस्कृती-इतिहास व कोकणी कटकारस्थान याचे पुराण मराठी पूजेत सांगितले जाईल. यापुढे ‘राजभाषा कशाशी काय खाते’ यांचा गंध दोन्ही बाजूच्या कुणालाही असणार नाही.

घाटावरचे  मराठी शिक्षक गोव्यात आणून भाऊसाहेबांनी कोकणीची प्रगती रोखली, असा अध्याय कोकणी पुराणात बऱ्यापैकी आताच रुजला आहे. गोव्यात पोर्तुगीज येण्याच्या  आधीपासून कोकणी मराठी आली याचा इतिहास सगळेच सांगतात, पण इंगजी  गोव्यात कधी आली, हे कुणी सांगत नाही. भाऊसाहेबांनी मराठी प्राथमिक शाळा सुरू केल्यानंतर ज्या  माध्यमिक शाळा सुरू झाल्या तेव्हा त्यासाठी लागणारे इंग्रजी शिक्षक भाऊसाहेबांनी केरळमधून आणले होते. त्यातील बहुतेक शिक्षक ख्रिश्चन धर्मीय असले तरी हिंदू बहुल शाळांमध्ये प्राथमिक शालेय मराठी माध्यामातून वर आलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाचे   धडे दिले. आता इंग्रजीवर भारतीय संस्कृतीवर आक्रमणाचे आरोप होत आहेत, तेव्हा या आक्रमणालाही कोकणी पुराणात भाऊसाहेबांना जबाबदार धरले जाणार आहे.

आज गोव्यात ‘महाराष्ट्रीयन’ लोकांची संघटना  गोव्यात नाही, पण केरळ, आंध्र व कर्नाटक राज्यातील निवासी लोकांच्या संघटना आहेत. गोवा मुक्तीनंतर प्रशासन व तांत्रिक विभागात काम करणाऱ्या लोकांच्या पुढील तीन पिढ्या येथले निवासी झाले आहेत. त्यांच्या आजच्या पिढीच्या मुलांना बऱ्यापैकी कोकणी कळते व स्पर्धात्मक परीक्षांत ते गोमंतकीय मुलांपेक्षा चार पावले पुढे आहेत. त्यामुळे सरकारी नोकरी भरतीत दहा कोकणी गुणांच्या भरवश्यावर मूळ गोमंतकीयांना नोकरी मिळते, ही पुराण कथा बनून राहणार आहे. अगदी ताजे उदाहरण देतो. माझ्या विभागात न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या तीन जागांसाठी गोवा लोकसेवा आयोगाने चार उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यात दोन गोमंतकीय व दोन केरळवासीय उमेदवार होते, तशातच एक जागा तर इतर मागास वर्गीयांसाठी राखीव होती.

हे  दोन केरळवासीय मागील सहा वर्षे गोव्यात आहेत  व त्यांना गोवा लोकसेवा आयोगाची कोकणी तोंडी परीक्षा देण्याइतपत कोकणी कळते. मुलाखतीचा निकाल आला तेव्हा केरळवासीय डॉक्टरची निवड झाली, आवश्‍यक गुण न मिळाल्याने रिक्त जागा असूनही गोमंतकीय डॉक्टरची निवड होऊ शकली नाही. आजही विद्यापीठासारख्या जागेवर गोमंतकीय लायक उमेदवार नसल्याने, देशभराचे लोक येऊन नोकऱ्या करीत आहेत, त्यांचा उल्लेख या पुराण कथांमध्ये होणार नाही.

Goa Konkani Marathi Language Dispute
Goa Politcs: काँग्रेसने 'गोवा रक्षण यात्रा' नव्हे, 'आमदार राखण यात्रा' काढावी; 'आप'चा खोचक सल्ला, पक्षांतरांवरून निशाणा

मराठी पुराण कथेत काय असणार, हे जाणून घेण्यासाठी दोन्ही  सरकारी  अकादमीच्या अध्यक्षांच्या एका वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत मराठी अकादमीच्या अध्यक्षांनी राजभाषेविषयी सांगितलेले तर्कट ऐकावे. मराठीला राजभाषा दर्जा का हवा, यात त्यांनी सांगितलेले कारण मराठी अकादमीच्या भिंतीवर फ्रेम करून लावायला हवे. त्याची भीती अशी की पुढे दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री येईल व मराठीचे स्थान नष्ट करेल, त्यांच्या मते राजभाषेचा दर्जा असेल तर त्या मुख्यामंत्र्याला  तसे करता येता येणार नाही. या अध्यक्षांना दुसऱ्या मुख्यमत्र्यांविषयी वाटणारी भीती व कोकणीवाल्यांना मराठीवाल्यांविषयी यात काही फरक नाही, कारण या सर्वांना भाषेपेक्षा भाषेच्या नावाने मिळणाऱ्या लाभाची जास्त काळजी आहे.

जेथे पोर्तुगीज मराठीचे वाकडे करून शकले नाहीत तेथे पुढील पन्नास वर्षांत तरी कुठलाही मुख्यमंत्री मराठीच्या वाटेला जाणार नाही, अशावेळी  मराठी अकादमीच्या अध्यक्षांना वाटणारी  भीती ही मराठीला संभाव्य धोक्याविषयी नसून, दुसऱ्या मुख्यमंत्र्यांपासून स्वत:च्या अध्यक्ष खुर्चीला  उद्‍भवणाऱ्या धोक्याची असावी. जेव्हा निर्धार समितीकडून, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर जळजळीत प्रतिक्रिया याव्यात, असे आवाहन करण्यात आले तेव्हा सरकारी मराठी अकादमीवर असलेल्याला निर्धार समितीच्या बऱ्याच  लोकांना  राजीनामा देऊन ‘जळजळीत’  निषेध नोंदविता आला असता, पण तसे कुणी केले नाही.

तात्पर्य, व्यक्ती असो वा विषय, सर्वांना एक वयोमर्यादा असते. बालपण, तारुण्य, गृहस्थ व शेवटी वृधत्व अशा स्थित्यंतरातून व्यक्तीला जावे लागणारे टप्पे कोकणी-मराठी वाद विषयाला लागू पडतात. कोकणी-मराठी वादविषय  गांभीर्याचा गृहस्थाश्रमी  टप्पा ओलांडून वृद्धावस्थेकडे वाटचाल करू लागला आहे, हे कटू पण सत्य आहे, निर्धार समितीचा  प्रयोग  परिणाम हेच सांगतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com