

पणजी: तुये येथील विनावापर असलेल्या इस्पितळ इमारतीत दर आठवड्यातून एकदा बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातून (गोमेकॉ) बाह्य रुग्ण विभागासाठी एका विभागातून एक डॉक्टर पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सुरवातीला तीन बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहेत.
खात्रीलायकरित्या मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्यसेवा संचालनालयाकडून यासंदर्भात पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मंजुरी दिली आहे. पेडण्यात यासंदर्भात आंदोलन सुरू झाल्यानंतर ही इस्पितळ इमारत वापरात आणण्यासाठी सरकारी पातळीवरील हालचाली तीव्र झाल्या आहेत.
येथील बाह्य रुग्ण विभाग, फार्मसी आणि प्रयोगशाळांची साफसफाई तात्काळ सुरू करून त्या कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सध्याच्या सामाजिक आरोग्य केंद्र इमारतीतील बाह्य रुग्ण विभाग, प्रयोगशाळा आणि फार्मसी नवीन सुविधेत स्थलांतरित करण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाकडून तात्काळ राबवली जाणार आहे.
रुग्णांच्या विशेष गरजांचा विचार करता, सध्या तळमजल्यावर असलेले डायलिसिस युनिट पहिल्या मजल्यावर हलवून त्या जागेत एक्स-रे यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रक्रिया १५ दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय, गोमेकॉतील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा तुये येथील रुग्णांना उपलब्ध व्हावी, यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस डॉक्टरांची प्रतिनियुक्ती करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. रुग्णसंख्या वाढल्यास ही सेवा आणखी विस्तारली जाणार आहे.
भविष्यातील गरजा लक्षात घेता, रुग्ण खाटांसाठी आवश्यक ऑक्सिजन पाइपलाईन तसेच शस्त्रक्रिया कक्ष कार्यान्वित करण्यासाठी निविदा प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात येणार असून, ही कामे तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचबरोबर कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने मोबाईल टॉवर उभारणीसाठी संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहेत.
नवीन सुविधा सध्याच्या समाज आरोग्य केंद्रापेक्षा सुमारे दहापट मोठी असल्याने, अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता असून, परिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी, हाऊस किपिंग आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.
कृती आराखडा तयार: ही सुविधा लवकरच जनतेच्या सेवेत येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारी यंत्रणेने केलेल्या इमारतीच्या तपासणीनंतर असे आढळून आले की, तुये येथील सुविधा तात्काळ सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक किमान मूलभूत निकष पूर्ण करत आहे. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांच्या सहभागातून कृती आराखडा निश्चित करण्यात आला असून, कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आजवर ही इमारत गोवा साधनसुविधा विकास महामंडळाकडेच आहे, असा सर्वांचा समज होता. इमारतीशी संबंधित कागदपत्रांत गेल्या ऑक्टोबरमध्येच ही इमारत आरोग्य खात्याकडे हस्तांतरित केल्याचा उल्लेख आढळला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.