

पेडणे: तुये इस्पितळ ‘गोमेकॉ’शी सलग्न करण्याऐवजी ३० जानेवारी रोजी सरकारने सामुदायिक आरोग्य केंद्र नवीन हॉस्पिटल इमारतीत नेण्याचा प्रयत्न केला तर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तसेच संपूर्ण व्यवहार बंद पाडण्याचा इशारा तुये हॉस्पिटल कृती समितीच्या वतीने सदस्य देवेंद्र प्रभुदेसाई यांनी दिला.
तुये येथे नऊ वर्षांपूर्वी ‘गोमेकॉ’शी सलग्नित इस्पितळासाठी बांधलेल्या इमारतीमध्ये कामकाज सुरू करा, या मागणीसाठी गेले चार दिवस तुये हॉस्पिटल कृती समितीच्या नेतृत्वाखाली साखळी आंदोलन सुरू केले आहे. आज संध्याकाळी ६.३० वाजता पेडणे आयटीआय केंद्राजवळून मशाल मिरवणुकीला प्रारंभ झाला. तुयेच्या सरपंच अनिता साळगावकर यांनी मशाल प्रज्वलीत करून समितीचे निमंत्रक जुझे लोबो यांच्याकडे दिली.
या मशाल मिरवणुकीत युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, पंच, सरपंच, समाजसेवक विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मिळून सुमारे दीड हजारहून अधिक लोक सहभागी झाले होते.
‘गोमेकॉशी सलग्न इस्पितळ सुरू करात’, ‘आमका न्याय जाय’ अशा घोषणा देत, हातात विविध घोषणा फलक घेऊन आंदोलक दीड किलोमीटर अंतर चालून इस्पितळाच्या इमारतीपर्यंत पोहोचले. यानंतर मशाल यात्रेचे रूपांतर सभेत झाले.
किशोर नाईक गावकर म्हणाले, मुख्यमंत्री हे स्वत: डॉक्टर आहेत, तर आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी डॉक्टर आहेत. असे असताना त्यांना या इस्पितळाचे महत्त्व कळू नये याचे आश्चर्य वाटते. येथील लो२कांना ते ग्राह्य धरतात. मतदारांनी याचा जाब विचारला पाहिजे.
ॲड. महेश राणे म्हणाले, की सरकारने आता हे इस्पितळ सुरू करण्यास चालढकल केली तर या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी शंकर पोळजी, ॲड. तनोज अडवलपालकर, तुयेचे पंचसदस्य नीलेश कांदोळकर आदींचीही भाषणे झाली.
...तर कोट्यवधींचा खर्च कशाला?
समितीचे अध्यक्ष जुझे लोबो म्हणाले, की १ जानेवारी रोजी तुये सामूहिक इस्पितळातील औषधालय, प्रयोगशाळा व एक ओपीडी या इमारतीत हलवणार, असे आम्हाला समजले. या तीनच गोष्टी जर नव्या इमारतीत हलवणार असाल, तर कोट्यवधी रुपये खर्च करून ही इमारत का बांधली? असा प्रश्न लोबो यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.