
Vedanta Mineral Transport Bicholim Meeting
डिचोली: डिचोलीतील ‘वेदांता’च्या खाणीवरील खनिजप्रश्नी निर्माण झालेला ‘गुंता’ सुटण्याचे संकेत मिळाले आहेत. आज (सोमवारी) डिचोलीत झालेल्या बैठकीत रात्रपाळीत खनिज वाहतुकीला पर्याय म्हणून वेळ आणि खेपांची संख्या वाढवून द्यावी या ट्रकमालकांच्या प्रस्तावावर प्रामुख्याने चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
ट्रकमालकांच्या या प्रस्तावावर खाण खाते अंतिम निर्णय घेणार असून या प्रस्तावावर आता कोणता तोडगा बाहेर येतो आणि खनिज वाहतूक पूर्वपदावर कधी येते याकडे ट्रकमालक आणि कामगारांचे लक्ष लागून राहिले आहे. ट्रकमालकांचा प्रस्ताव विचारार्थ घेऊन या प्रस्तावाला खाण संचालकांनी मान्यता दिल्यास खनिज वाहतुकीचा गुंता सुटण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या बाजूने याप्रश्नी पिळगावमधील लोकांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. पिळगावच्या लोकांनी गुरुवारी मध्यरात्री खनिज वाहतूक रोखून धरली. त्यानंतर रात्रपाळीतील खनिज वाहतुकीला ‘ब्रेक’ लागला आहे.
खनिजप्रश्नी सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी आज (सोमवारी) आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीस उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, संयुक्त मामलेदार अभिजित गावकर, पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर तसेच ‘वेदांता’चे अधिकारी, ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष राजाराम गावकर, पिळगाव पंचायतीचे उपसरपंच सुनील वायंगणकर यांच्यासह मोहिनी जल्मी, शर्मिला वालावलकर, उमाकांत परब गावकर आणि चेतन खोडगिणकर हे पंच सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत रात्रपाळीतील खनिज वाहतुकीवरून निर्माण झालेल्या गुंत्यावर चर्चा करण्यात आली. रात्रपाळीस ट्रकमालक अनुत्सुक आहेत. त्याला पर्याय म्हणून खनिज वाहतुकीसाठी वेळ आणि खेपांची संख्या वाढवून द्यावी असा प्रस्ताव ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष राजाराम गावकर यांनी बैठकीत ठेवला. या प्रस्तावानुसार सकाळी ५.३० ते रात्री १० वाजेपर्यंत खनिज वाहतुकीस तसेच दर ताशी किमान ११० खेपा मारण्यास मुभा द्यावी असा ट्रकमालक संघटनेचा प्रस्ताव आहे. बैठकीनंतर हा प्रस्ताव खाण आणि भूगर्भ खात्याकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावासंबंधी पंचायत मंडळाने पिळगावमधील जनतेला कल्पना देऊन त्यांची समजूत काढावी, असेही या बैठकीत ठरविण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीवर सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही ‘वेदांता’च्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्याची माहिती मिळाली आहे.
बैठक फलदायी ठरण्याची शक्यता आहे. मध्यरात्री खनिज वाहतूक करण्याची ट्रकमालकांची इच्छा नाही. ट्रकमालकांनी दिलेल्या नवीन प्रस्तावावर बैठकीत चर्चा झाली. या प्रस्तावावर अंतिम निर्णय खाण आणि भूगर्भ खाते घेणार आहे. पिळगाव पंचायत मंडळाने जनतेमधील गैरसमज दूर करावा.
प्रेमेंद्र शेट, आमदार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.