पणजी: दुर्गापूजेच्या (NAVRATRI 2021) मुहूर्तावर तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) फूल काँग्रेसच्या (Congress) हातात देऊन राज्यात मोठी चळवळ सुरू करण्यासाठी तृणमूल काँग्रेस प्रयत्नशील आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपविरुद्ध सर्व विरोधकांची एकजूट करूनच यापुढे निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. काँग्रेसविना विरोधकांचे व्यासपीठ उभारले जाऊच शकत नाही, अशी घोषणा तृणमूल नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister of West Bengal Mamata Banerjee) यांनी कोलकातात केल्यामुळे काँग्रेस तृणमूल काँग्रेसच्या बरोबरीने राज्य विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) उतरेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष, मगो पक्षही तृणमूलबरोबर विधानसभा निवडणुकीत सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मगो पक्षाची प्रादेशिक पक्षांची युती बांधण्याची तयारी असली तरी आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड हे मगो पक्षापेक्षा काँग्रेस, तृणमूलसोबत जाणे पसंत करण्याची चिन्हे दिसत आहेत. पितृपक्ष संपून नवरात्र सुरू झाल्यानंतर तृणमूलचे नेते माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी राज्यातील सामाजिक, औद्योगिक, राजकीय घटकांशी संपर्क साधण्यास प्रारंभ केला आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यामुळे आगेकूच करण्याचे निश्चित झाले असल्याचे त्यांनी या घटकांना सांगितले आहे.
भाजपचे फूल व तृणमूलचे फूल असा गोंधळ निवडणुकीत झाल्यास त्याचा फटका दोघांनाही बसणार असल्यामुळे काँग्रेसच्या ‘हात’ या निवडणूक चिन्हाचाच वापर तृणमूलतर्फे जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचे वर्चस्व वाढणार असले तरी निवडणुकीत संयुक्त नेतृत्व असावे, असाही मतप्रवाह पुढे येत आहे.
आठ-दहा दिवसांत राज्यव्यापी चळवळ
माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांना पुढील राजकीय हालचाली कशा होतील, असे विचारता त्यांनी तृणमूल काँग्रेस येत्या आठ-दहा दिवसांत राज्यव्यापी चळवळ सुरू करणार असल्याची माहिती दिली. चळवळीत काँग्रेसला बरोबर घेणार का, असा प्रश्न केला असता, ही चळवळ भाजपविरोधी असेल. त्यामुळे सर्व विरोधकांनी बरोबर येणे अपेक्षित असल्याचा दावा त्यांनी केला. राज्याचे अर्थकारण कोलमडले असून, वाढती बेरोजगारी, महागाई तसेच इतर विषय घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपमुळे राज्याचे कसे नुकसान झाले आहे त्यासंदर्भात महत्त्वाचा दस्तऐवज तयार केला जात असून, तो जनतेकडे घेऊन जाऊ, असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.