Calangute Panchayat: गोव्यातील कळंगुट हे गाव गेल्या काही दिवसांमध्ये येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून चर्चेत आहे. या पुतळ्याचा वाद आता थंड झालेला असतानाच पंचायतीच्या सचिवांची बदली केली गेल्याचे समोर आले आहे.
कळंगुट पंचायतीचे सचिव अर्जुन वेळीप यांची धारबांदोडा तालुक्यात आता बदली केली गेली आहे. विशेष म्हणजे, 20 जून रोजी हा वाद उफाळून आला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 21 जून रोजी ही बदली केली गेल्याचे समोर आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर ग्रामपंचायतीने सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत हा पुतळा दहा दिवसांत हटवावा, असे निर्देश संबंधित संघटनेला दिले होते. या ठरावावर सचिव अर्जुन वेळीप यांची सहीदेखील होती, असे सांगितले जाते. त्यामुळे या पुतळ्याच्या वादानंतरच वेळीप यांच्यावर कारवाई केली गेल्याचे सांगितले जात आहे.
ही रुटीन बदली आहे की यामागे काही राजकारण आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. तथापि, कळंगुट पंचायत सचिवांना बळीचा बकरा बनवले गेले आहे का, अशी चर्चा मात्र सुरू झाली आहे.
पुतळा उभारल्यानंतर ग्रामपंचायतीने तो हटविण्याबाबत निर्देश दिले होते. त्यामुळे संतप्त शिवप्रेमींनी दिवसभर कळंगुट ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडला होता. काही जणांनी पंयातीच्या कार्यालयावर दगडफेक देखील केली होती. तसेच सरपंच आणि सचिवांच्या गाड्याही फोडल्या होत्या.
जोपर्यंत सरपंच माफी मागत नाहीत तोपर्यंत येथून हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. अखेर सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी संध्याकाळी माफी मागून या विषयावर पडदा टाकला होता.
दरम्यान, शनिवारी या सर्व प्रकाराबात सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी म्हटले होते की, तेदेखील शिवप्रेमी आहेत. शाळेत मराठी विषय त्यांनी शिकला आहे. पुतळ्याला विरोध कधीच नव्हता. पण काही लोकांनी जाणीवपुर्वक या विषयाला हिंदू विरूद्ध कॅथलिक असे रूप देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.