Goa Tourism: बंगळुरू येथील 18 युवकांचा गट काल मंगळवारी सकाळी कळंगुटमध्ये उतरला. त्यावेळी बागा येथे कार्यरत असलेल्या ‘डेव्हिल्स’ क्लबमध्ये युवतींचे आमिष दाखवून त्यांना जबरदस्तीने नेण्यात आले आणि जबर मारहाण करण्यात आली.
एवढेच नव्हे तर ओलीस ठेवून त्यांची ऑनलाईन आर्थिक लुबाडणूक करण्यात आली. याबाबत आज बुधवारी कळंगुट पोलिसांत रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकूण १ लाख २१ हजारांची लुबाडणूक झाल्याचे या पर्यटकांनी तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, पोलिसांनी डेव्हिल्स क्लबच्या मालकासह, बाऊन्सर रेम्बो ऊर्फ रेमंड व वीरेंद्र शिरोडकर या तिघांविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या पर्यटकांपैकी प्रवीण कुमार जैन (२५) आणि रवी प्रताप सिंग (४०) हे दोघे काल रात्री साडेआठच्या सुमारास कळंगुट किनाऱ्यावर फेरफटका मारण्यास गेले असता रेम्बो ऊर्फ रेमंड या संशयिताने त्यांच्याशी जवळीक साधली.
तसेच दोघांनाही विदेशी युवतींचे आमिष दाखवून अडगळीच्या जागेतून डेव्हिल्स नाईट कल्बवर आणले. यावेळी तेथे उपस्थित एका तरुणीने त्यांच्या मनगटावर ‘डेव्हिल्स’ नाव असलेला पट्टा बांधला व मुख्य दरवाजातून त्यांना आत नेले.
खोलीत प्रवेश करताच तेथील स्वागतकक्षात युवती पुरविण्याचे आमिष दाखविण्याबरोबरच खाण्या-पिण्याच्या बिलापोटी त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात आली. शेवटी बिले फेडताना खिशातील रोकड संपल्याने ऑनलाईन पेटीएमवरून सुमारे 80 हजारांची रक्कम जबरदस्तीने उकळण्यात आली.
यावेळी पुरावा नष्ट करण्यासाठी तेथील बाऊन्सरनी दोघांपैकी एकाचा महागडा मोबाईल फोडून टाकला. रात्री उशिरा प्रवीण आणि रवी यांनी तेथून आपली कशीबशी सुटका करून घेतली.
एका संशयिताचा राष्ट्रीय पक्षाशी संबंध!
या प्रकरणात 80 हजारांचा ऑनलाईन व्यवहार झालेल्या वीरेंद्र शिरोडकर या स्थानिक व्यक्तीचे बँक तपशील पोलिस तपासून पाहत आहेत. वीरेंद्र शिरोडकर ही व्यक्ती एका राष्ट्रीय पक्षाशी संबंधित आहे.
मात्र त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पडद्यामागील अनेकांचा भांडाफोड होणार असल्याचा विश्वास कळंगुटचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी व्यक्त केला.
रेम्बो सापडला, बाऊन्सर फरार
ताब्यात घेतलेल्या रेम्बोची पोलिसांनी कसून चौकशी केली असता कळंगुट परिसरात त्याचे खरे नाव ‘रेमंड चार्ली हाऊस’ असल्याचे उघड झाले. संशयित रेम्बो ऊर्फ रेमंड चार्ली हा मूळचा उत्तर प्रदेशातील झाशी या जिल्ह्यातील असून त्याची रवानगी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.
या प्रकरणातील सहभागी पैलवान ऊर्फ बाऊन्सर या फरार संशयिताचा कळंगुट पोलिस कसून शोध घेत आहेत. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन तसेच पर्वरीचे उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंगुटचे पोलिस निरीक्षक परेश नाईक पुढील तपास करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.