

पणजी: जलसंपदा खाते उत्तर गोव्यातील तिळारी कालव्याच्या पाण्याचा प्रभावी व पूर्ण उपयोग होतो की नाही, याचा आढावा घेण्यासाठी व्यापक अभ्यास हाती घेणार आहे. तिळारी कालवा कमांड क्षेत्रातील सिंचन व्यवस्थेतील उणिवा शोधणे, सिंचन कार्यक्षमता वाढवणे, व्यवस्थापन प्रणाली मजबूत करणे तसेच कृषी उत्पादन क्षमता आणि ग्रामीण उपजीविका वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यात येणार आहे.
यासाठी विभागाकडून ‘उत्तर गोव्यातील तिळारी कालवा कमांड क्षेत्रातील पाण्याच्या सर्वोत्तम वापरासाठी प्रभाव मूल्यांकन व धोरणात्मक हस्तक्षेप अभ्यास’ करण्यासाठी सल्लागार नियुक्त केला जाणार असून, त्यासंदर्भात निविदा जारी करण्यात आली आहे.
या अभ्यासाद्वारे कालवा पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन मजबूत करणे, शाश्वत सिंचन पद्धतींना प्रोत्साहन देणे, पिकांची उत्पादकता वाढवणे तसेच आदिवासी व ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
निवडण्यात येणारी सल्लागार संस्था सहभागात्मक ग्रामीण मूल्यांकन, जीआयएस आधारित नकाशे तयार करणे, सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण तसेच संस्थात्मक पुनरावलोकन करणार आहे. यासोबतच कृषी सहकारी संस्था आणि जल वापरकर्ता संघटनांच्या क्षमता वृद्धीवरही भर देण्यात येणार आहे. निवडक गावांमध्ये सुधारित सिंचन प्रणालींच्या अंमलबजावणीसाठी प्रायोगिक प्रकल्प राबविण्याच्या शिफारशीही अभ्यासात अपेक्षित आहेत.
या अभ्यासाअंतर्गत बार्देश तालुक्यातील ३० गावे, पेडण्यातील १६ गावे आणि डिचोली तालुक्यातील १८ गावे अशा एकूण १०,९०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचा समावेश असणार आहे. सध्याची सिंचन व्यवस्था, पाण्याचा वापर, कालवा व त्यासंबंधित प्रक्रिया यांचे सखोल विश्लेषण करून पाण्याच्या अधिक कार्यक्षम वापरासाठी उपाययोजना सुचविणे, हा या अभ्यासाचा मुख्य उद्देश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.