Assembly session आठव्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या 18 जुलैपासून सुरू होत असून ते 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मात्र, विरोधकांना सामोरे जाण्याचे धैर्य नसल्यानेच सरकारने पुन्हा 20 ऐवजी 18 दिवसांचे अधिवेशन बोलावले, असा हल्लाबोल विरोधकांनी केला आहे.
आठव्या विधानसभेतील हे पाचवे अधिवेशन असून ते १८ दिवस चालणार आहे. यासंबंधीची अधिसूचना आज काढण्यात आली. कोरोना महामारीनंतर अलीकडच्या काळात इतके दीर्घकाल चालणारे हे पहिलेच अधिवेशन असून यादरम्यान २२, २३, २९, ३० जुलै व ६ ऑगस्ट अशा पाच सुट्ट्या असतील.
या अधिवेशनासाठी विधानसभा सदस्यांकडून तारांकित आणि अतारांकित प्रश्न मागविले आहेत. गोवा विधानसभा सचिवालयाने आज जारी केलेल्या अधिसूचनेवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, सरकारला विरोधकांची भीती वाटते.
त्यामुळेच कामकाजाचे वेळापत्रक केवळ १८ दिवसांचे केले आहे. गोवा विधानसभेच्या अधिवेशनाचा काळ नेहमीच कमी केला जातो, असे सांगत गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी हे सरकार लोकशाहीला मानत नाही का, असा सवाल उपस्थित केला.
विरोधकांचा सामना करा!
१८ दिवसांचे अधिवेशन विरोधकांना मुद्दे मांडण्याची आणि भ्रष्ट भाजप सरकारचा पर्दाफाश करण्याची संधी देणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी न करता १८ दिवस विरोधी आमदारांना तोंड देण्याचे धैर्य दाखवावे, असे युरी आलेमाव म्हणाले
...हा तर लोकशाहीचा खून : सरदेसाई
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी कमी काळाची अधिवेशने लोकशाहीला घातक, असे वक्तव्य केले असतानाच गोव्याचे सभापती विधानसभेचे अधिवेशन २० वरून १८ दिवसांवर आणतात, हा निव्वळ लोकशाहीचा खून आहे, अशी प्रतिक्रिया विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली. गोव्याची लोकशाही दुय्यम स्वरूपाची आहे का, असा सवाल सरदेसाई यांनी ‘ट्विट’द्वारे सभापती रमेश तवडकर यांना विचारला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.