Goa Accident: दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले, संतप्त जमावाने पेटवल्या दोन क्रेन, वातावरण तंग

सुकेकुळण-धारगळ येथील घटना; एक जण जखमी
Accident
AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या मोपा लिंक रस्त्याच्या कामावरील एका ट्रकने शुक्रवारी दुचाकीस्वार नामदेव नारायण कांबळी (वय ६३ वर्षे, रा. शेमेचे अडवण) यांना २०० मीटर फरपटत नेऊन चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तर दुचाकीवर मागे बसलेले काशिनाथ तुकाराम शेट्ये (वय ६४ वर्षे, रा. वारखंड) हे गंभीर जखमी झाले. ट्रकचालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, संतापलेल्या जमावाने तेथील दोन क्रेन पेटवल्‍या.

नामदेव कांबळी हे दुचाकीवरून मोपा विमानतळ येथून धारगळला जाताना या ट्रकने (क्र. एमएच-४६-बी २४४८) त्यांच्या दुचाकीला ठोकरले. यावेळी दुचाकीवर मागे बसलेले शेट्ये बाजूला फेकले गेले, तर चालक कांबळी यांना ट्रकने तब्बल २०० मीटरपर्यंत फरपटत नेले.

यात कांबळी यांचा जागीच मृत्यू झाला, तर शेट्ये गंभीर जखमी झाले. त्यांना म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे. हा अपघात सकाळी ११ वाजता घडला.

अपघाताची माहिती मिळताच तातडीने ग्रामस्थ जमा झाले. संतप्त जमावाने कामाच्या ठिकाणी असलेल्या दोन क्रेनना आग लावली. ती आग विझविण्यासाठी म्हापसा आणि पेडणे अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले.

मात्र, संतप्त ग्रामस्थांनी बंब अडवून आग विझवू दिली नाही. जोपर्यंत मृत आणि जखमींना नुकसान भरपाई आणि न्याय मिळत नाही, तोपर्यंत पोलिसांना कसल्याच प्रकारची हालचाल करू देणार नाही, तसेच मृतदेहही हटवणार नाही, अशी भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली होती.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

तुळसकरवाडी-शेमेचे अडवण येथील नामदेव कांबळी हे पेडणे शेतकरी सोसायटीचे निवृत्त कर्मचारी होते, तर वारखंड येथील काशिनाथ शेटये हे कदंब महामंडळाचे निवृत्त वाहक.

शेमेचे अडवण येथे रात्री साडे आठनंतर नामदेव यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, असा परिवार आहे.

Accident
मार्केट कॉम्प्लेक्सवरील मोबाईल टॉवरचा प्रस्ताव फेटाळला; मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा

परवाने नूतनीकरण नाहीच

या अपघाताला कारणीभूत असलेला ट्रकचालक वसंत यादव अद्याप फरार आहे. या अपघाताला कारणीभूत ठरलेला अशोका बिल्ड कंपनीच्या ट्रकचा इन्शुरन्स ३० जून २०२२ पर्यंतचाच आहे. परवाना २० एप्रिल २०२२ पर्यंतचा असून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र १२ एप्रिल २०२२ पर्यंतचे होते, अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे.

तोपर्यंत ‘काम बंद : आर्लेकर

आमदार आर्लेकर यांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु ते मागे हटले नाहीत. त्यावेळी आमदार आर्लेकर यांनी, जोपर्यंत नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत लिंक रस्त्याचे या ठिकाणचे काम बंद करू, असे आश्‍वासन दिले.

Accident
Goa River Marathon: गोवा रिव्हर मॅरेथॉन डिसेंबरमध्ये; रविवारी जागृतीनिमित्त वेर्णा येथे ‘प्रोमो रन’

आतापर्यंत 22 जणांचा बळी

राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणास सुरुवात केली, तेव्हापासून या रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडून आतापर्यंत 22 जणांचा बळी गेला असून त्याला कंपनी व कंत्राटदार जबाबदार आहे. या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी, यासाठी स्थानिकांनी पोलिसांत तक्रार नोंदवून उपजिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याकडे निवेदन सादर केले आहे.

..तर नामदेव वाचले असते!

ट्रकखाली स्कूटर आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला नामदेव यांचा मृतदेह तशाच अवस्थेत सोडून ट्रकचालक पळून गेला. जर अपघात झालेल्याच ठिकाणी त्याने ट्रक थांबवला असता तर कदाचित नामदेव कांबळी वाचले असते. ट्रकने धडक दिल्यानंतर नामदेव यांचे हेल्मेट व स्कूटरचे अवशेष सर्वत्र पसरले होते.

Accident
Mahanand Naik: गोव्याचा दुपट्टा किलर 14 वर्षांनंतर आला तुरूंगातून बाहेर, पिडितेने पोलिसांकडे केली मोठी मागणी

चार तासांनंतर मृतदेह हलविला :

कंत्राटदाराने नुकसानभरपाई देण्याची ग्वाही आमदार आर्लेकर आणि पोलिसांसमक्ष दिल्यानंतर पंचनामा करून मृतदेह चार तासांनी गोमेकॉत हलविला.

या बांधकामाचे कंत्राट अशोका बिल्डर कंपनीला मिळाले आहे. या कामामुळे धारगळ-सुकेकुळण येथे अनेक अपघात घडले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

अपघातांना सरकारच जबाबदार : कॉंग्रेस

अपघातस्थळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, प्रणव परब, ॲड. जितेंद्र गावकर, संजय बर्डे, कृष्णा नाईक, फर्नांडिस, गुरुदास पांडे, बेर्नाड रॉड्रिग्स यांनी भेट दिली.

लिंक रोड व अन्य बांधकामांसाठी परराज्यातील वाहने आणली जातात. सरकारच्या बेजबाबदारपणामुळेच हे अपघात होत असल्याचा आरोप अमित पाटकर आणि जितेंद्र गावकर यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com