Goa Politics: खरी कुजबुज, टॅक्सीचालकांचा खेळ...

Khari Kujbuj Political Satire: कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल हेही असेच उत्‍साही आमदार. त्‍यामुळे त्‍यांनीही या शिमग्याच्‍यावेळी ‘घोस्‍त’ काढलाच.
Goa Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

टॅक्सीचालकांचा खेळ...

राज्यातील टॅक्सी चालकांनी आपल्या मागण्या अनेकदा मांडल्या. प्रत्येक वेळी त्यांनी वाहतूक मंत्र्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून दिली. पण गंमत म्हणजे, टॅक्सी चालकांनी मागण्या मांडल्या की मंत्र्यांना ते आठवतच नाही. त्यामुळे आमचे ऐकूनही दुर्लक्षच करायचे असेल, तर आम्ही आता शांत बसणार नाही, असा इशारा टॅक्सी चालकांनी दिला आहे. आता हे फक्त बोलायचे, की मंत्र्यांना खरंच जागं करायचं, हे लवकरच स्पष्ट होईल. पण सध्या मात्र टॅक्सी चालक आणि सरकार यांच्यातील हा ‘आठवण-विस्मरण’ खेळ चांगलाच रंगताना दिसतोय. ∙∙∙

काब्राल रमले शिमग्यात!

सध्‍या शिमग्याचा उत्‍सव सुरू झाल्‍याने सगळीकडेच उत्‍साही वातावरण आहे. अशा वेळेस कुठल्‍याही राजकारण्‍याचा उत्‍साह यावेळी उतू गेला तर त्‍यात नवल काही नाही. कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल हेही असेच उत्‍साही आमदार. त्‍यामुळे त्‍यांनीही या शिमग्याच्‍यावेळी ‘घोस्‍त’ काढलाच. शिमग्यात काब्राल ढोल वाजवितानाचा फोटो सध्‍या व्‍हायरल झाला आहे. मडगावातील शिमगोत्‍सवाची मिरवणूक ज्‍यावेळी संपली, त्‍यावेळी काही मडगावकर सकाळचा चहा पित होते. केपेतही झालेल्‍या शिमगोत्‍सवाची मिरवणूक संपेतोवर पहाटेचा कोंबडा आरवला. या पार्श्‍वभूमीवर काब्रालबाबांनी कुडचडेची शिमगोत्सव मिरवणूक कुठल्‍याही परिस्‍थितीत रात्री १२ वाजेपर्यंत संपणार असे जाहीर केले होते. पण तेथेही उत्तर रात्रीचा दीड वाजलाच. ∙∙∙

मांद्रे मतदारसंघ कोणाचा?

मांद्रे मतदारसंघावर दावा सांगणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. भाजपला वाटते मांद्रे त्यांचा बालेकिल्ला आहे, काँग्रेसला वाटते येथील माणसं त्यांच्या पाठीशी आहेत, तर मगो कार्यकर्त्यांना खात्री आहे, की मांद्रे त्यांचाच गड आहे. पण गंमत अशी, की मतदार मात्र या दाव्यांवर चांगलेच नाराज झाले आहेत. आमचा मतदारसंघ कोणाचा, हे ठरवायचा अधिकार फक्त आमचा, असा रोखठोक संदेश मांद्रेकरांनी दिला आहे. सगळे पक्ष मांद्रेला आपले मानत असतील, तर आम्हांला निवडणुकीत मतदानासाठी का बोलावता? असा प्रश्न आता मतदार विचारू लागले आहेत. मतदारसंघ हडपण्याच्या स्पर्धेत राजकीय पक्ष भांडत बसले असले, तरी मतदार मात्र आपला निर्णय योग्य वेळी दाखवून देण्याच्या तयारीत आहेत. ∙∙∙

मायकल लोबोंची ओढ...

कळंगुटचे आमदार मायकल लोबोंची राजकीय महत्त्वकांक्षा कुणापासून लपून राहिलेली नाही. अशातच, बुधवारी पुन्हा लोबोंनी म्हापसा मतदारसंघावर भाष्य केले. लोबोंच्या दाव्यानुसार, म्हापसा शहरात कचऱ्याची बिकट परिस्थिती आहे! म्हापशाच्या शेजारील मतदारसंघातील लोक म्हणे, शहरात ये-जा करताना कचरा रस्त्याकडेला फेकतात. तसेच म्हापशातील स्थानिक आमदारांना शहरासाठी विकासकामे करण्याची खूप व्याप्ती आहे. जोशुआ यांनी मदत मागितल्यास त्यांना सल्ला देण्याची माझी तयारी आहे, असेही लोबो म्हणाले. तसेच उन्हात उतरुन, लोकप्रतिनिधींनी कामे केली पाहिजेत, असे त्यांचे मत. याचाच अर्थ लोबोंनी अप्रत्यक्षरित्या जोशुआंवर तोंडसुख घेतले. त्यामुळे उपसभापती जोशुआ हे लोबोंच्या या भूमिकेकडे कसे पाहतात, हे वेळप्रसंगी समजेल. परंतु, सद्यस्थितीत लोबोंचे म्हापसा शहरावरील राजकीय प्रेम दिवसेंदिवस वाढत चालले असून आगामी विधानसभेत लोबो किंवा त्यांच्या कुटूंबातील एखादी व्यक्ती म्हापसा मतदारसंघावर दावा केल्यास कुणालाच आश्चर्य वाटणार नाही, एवढे नक्की ∙∙∙

तानावडेंचे टायमिंग

भाजपचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हे टायमिंग साधण्यात एकदम पटाईत. केंद्रीययमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुलाच्या लग्नात ते मंगळवारी रात्री पोचले. तेथे केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासोबत त्यांनी फोटोसेशनही केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची सहा वर्षे पूर्ण केल्यानिमित्ताने त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ प्रदान केला. मध्यंतरी ते बंगळूर येथे भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांच्या विवाहसोहळ्यालाही ते उपस्थित राहिले होते. कोठे कोणत्या वेळी उपस्थित राहिले पाहिजे, याविषयीचे त्यांचे नियोजन चपखलच असते. ∙∙∙

फळदेसाई उवाच

राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मात्र सावध भूमिका घेणे पसंत केले आहे. मंत्रिमंडळ बदल बदल होणार की नाही या वादात न पडता एखाद्या खात्याचे काम मागे पडत असल्यास मुख्यमंत्री नवा चेहरा शोधू शकतात असे सांगून त्यांनी आपला सावध पवित्र अधिक बळकट केला. हे सांगताना त्यांनी जनतेचा कोणत्याही मंत्र्यावर राग नाही सरकार विषयी नाराजी नाही, असे सांगण्यासही कमी केले नाही. फळदेसाई हे मुख्यमंत्र्यांच्या अ्त्यंत जवळचे मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी माहिती असेल असे मानले जाते ∙∙∙

Goa Political Updates
Goa politics: मांद्रेच्या जागेवरुन भाजप - मगोप यांच्यात जुंपली; 'बालेकिल्ला कदापि सोडणार नाही', ढवळीकरांचा एल्गार

बाबूश यांचा त्रागा

पणजीचे आमदार आणि महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात हे स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये मार्गदर्शन करताना आणि आढावा घेताना यापूर्वी अनेकदा दिसून आले होते. अलीकडे मात्र स्मार्ट सिटी वरून ते उद्विग्न झाल्याचे दिसते. इमॅजीन स्मार्ट सिटी या सरकारी कंपनीचे अध्यक्ष राज्याचे मुख्य सचिव आहेत. त्या कंपनीकडे स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्याची जबाबदारी आहे. यामुळे अलीकडे स्मार्ट सिटी विषयावरून बाबुश यांनी थेट मुख्य सचिवांकडे बोट दाखवणे सुरू केले आहे. बाबुश पणजीचे आमदार तर त्यांचे पुत्र रोहित हे पणजीचे महापौर आहेत. यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्प च्या नावाखाली पणजीवासियांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांची दखल घेण्यापासून हे पिता-पुत्र मागे हटू शकत नाहीत. बाबूश हे सरकार मधील मंत्री असल्याने ते मुख्य सचिवांना स्मार्ट सिटी बाबत आदेश वजा सूचना का देऊ शकत नाहीत असा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे. उठसूठ स्मार्ट सिटी वरून मुख्य सचिवांकडे बोट दाखवून बाबूश यांना नेमका कोणाकडे अंगुली निर्देश करायचा आहे याची चर्चा मात्र ऐकू येऊ लागली आहे. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; ...तर विद्यार्थी नापास होतील की शिक्षण खाते?

पर्राची कलिंगड...

अलीकडे सर्वच लोकप्रतिनिधी सोशल मीडियाचा बऱ्यापैकी वापर करु लागले आहेत. कळंगुटचे आमदार मायकल लोबो हे चांगलेच आपल्या सोशल मीडियावर हँडलवर सक्रिय असतात. विविध रिल्स किंवा व्हिडिओ टाकून ते लोकांना आवाहन करताना दिसतात. अशातच, लोबोंनी आपल्या बागेतील पर्राचे फेमस कलिंगडचा व्हिडिओ टाकला. ते व्हिडिओत म्हणतात, की लोकांनी विशेषतः युवकांनी शेतीकडे वळून स्वावलंबी बनावे. तसेच पर्रातील कलिगंड हे खूपच चवदार व स्वादीष्ट असतात. कुणालाच या कलिंगडची बियाणे हवे असल्यास आम्ही ती पुरवू असेही त्यांनी म्हटले आहे. लोबो हे पर्राच्या कलिंगडावर अधून-मधून रिल्स किंवा पर्राची महती सांगत असतात. यापूर्वी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर पर्राच्या कलिंगडाचे कवित्व व गोष्टी सांगताना दिसायचे. कदाचित लोबो देखील आपल्या राजकीय गुरुंच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे चालले असावेत∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com