

पणजी: आत्मसमर्पणासाठी अतिरिक्त वेळ मिळावा, यासाठी दाखल केलेला अर्ज म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्याने लैंगिक अत्याचार आणि बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेले तरुण तेजपाल यांना धक्का बसला आहे. अर्ज फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारी (ता. १४) कोलवाळ मध्यवर्ती कारागृह प्राधिकरणासमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे तेजपाल यांनी न्यायालयाला स्पष्ट केले.
६ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने म्हापसा सत्र न्यायालयाचा २०२१ मधील निर्दोष मुक्ततेचा निर्णय रद्द केला. तेजपाल यांना आपल्याच एका सहकाऱ्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवत १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आत्मसमर्पणातून सूट देण्यास नकार देत तीन आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, २०१३ मध्ये गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये सहकाऱ्यावर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात तेजपाल यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोलवाळमध्ये भोगणार शिक्षा!
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीनुसार तेजपाल यांनी सत्र न्यायालयात अर्ज करून मुदतवाढीची मागणी केली होती. परंतु, सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावल्यामुळे तेजपाल यांना १४ सप्टेंबर रोजी कोलवाळ कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी हजर राहावे लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.